भावार्थ दासबोध -भाग ८३

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक ६ समास ८ दृश्य निर्णय
जय जय रघुवीर समर्थ. डोळ्यांमध्ये काही बाहुली नसते पण पाहिल्यावर ती भासते, डोळ्यांमध्ये प्रतिबिंब दिसते, ते खरे कसे? जितके बुडबुडे उठतात तितकी रूपे दिसतात, पण क्षणांमध्ये फुटून जातात, त्यामुळे ही रूपे खोटी असतात. हातात दोन चार लहान आरसे घेतल्यावर त्यात तितके चेहरे दिसतात. पण खरे तोंड एकच असते. नदीतीरावर गेल्यावर आवाज केला तर पुन्हा आवाज येतो. हा प्रतिसाद असतो. नदी सरोवर त्याच्या डोहात पशुपक्षी नर वानर राणा वृक्ष विस्तार दिसतात पण तिरावर पाहिले तर एकच दिसते.

शस्त्र झाडू जाता दोन दिसतात प्रत्यक्षात एक असते. धनुष्याचा टणत्कार केला असता दोन दोऱ्या दिसतात, प्रत्यक्षात एकच असते. मंदिरातील आरशात एक सभा असताना दुसरी पण दिसते. दिव्यांची रांग असली तर त्याच्या प्रकाशात अनेक सावल्या दिसतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. सत्यासारखेच दिसते पण ते खरे आहे असा विश्वास कसा ठेवायचा? माया ही खोटी गारुड विद्या आहे ती खऱ्यासारखी वाटते पण जाणत्याने ती खरी मानू नये. खोटे खऱ्यासारखे वाटते तरी मग त्याची पारख का करू नये?

अविद्येचे स्वरूप असेच असते. माणसाची गारुडविद्या बऱ्याच जणांना खरी वाटते पण शेवट पाहिल्यावर ती खोटी असल्याचे लक्षात येते. तशीच राक्षसांची माया देवालाही खरी वाटते, पंचवटीमध्ये रामाने मृगाचा पाठलाग केला तेव्हा असेच घडले होते. आधीची शरीर बदलून एकाचे अनेक होतात, सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूतून रात्री निशाचर जन्मतात, नाना पदार्थ-फळे घेऊन द्वारकेमध्ये प्रवेशलेल्या कपटरूपी दैत्यांना कृष्णाने मारले. रावणाने मायेचे शिर तयार केले असे अपूर्व कपट केले होते. कपट बुद्धी असलेले नाना दैत्य असतात ते देवालाही आवरता येत नाहीत. निर्माण होऊन त्यांचा शक्ती संहार करते.

अशाप्रकारे राक्षसांचे कपट विद्येचे सामर्थ्य अघटीत आहे. माणसाची गारुड विद्या, राक्षसांची गारुड विद्या ही भगवंताची एक विचित्र मायाच आहे. ते खऱ्यासारखे दिसते पण विचारले असता नसते. हा मिथ्याभास होय. खरे म्हणावे तरी ते नसते, खोटे म्हणावे तरी दिसते. दोन्ही पदार्थ विश्वास ठेवण्यास योग्य नाही असा मायेचा विचार आहे. साकार दिसते ते मायेचा मिथ्या विस्तार आहे, दिसते ते स्वप्नाकार आहे हे जाण! तरी तुला भासच खरा वाटला ही चूक घडली. दृश्य भास अविद्यात्मक आहे, तुझा देह तदात्मक आहे म्हणून हा अविवेक संचारला आहे. दृष्टीनें दृश्य पाहिले मग भासावर विश्वास बसला तरी लिंगदेह अविद्यात्मक आहे. अविद्येने अविद्या पाहिली, म्हनून गोष्टीवर विश्वास बसला. त्यामुळे संपूर्ण शरीरात अविद्या साठली. तीच काया म्हणजे आपण हे देहबुद्धीचे लक्षण आहे, यामुळे दृश्य हे प्रमाण झाले. इकडे देहाला सत्य मांनले तिकडे दृश्य सत्य हा निवाडा दिला,

या दोन्हीमुळे संदेह वाढला. देहबुद्धी बळकट केली आणि ब्रह्म पाहायला गेला तर परब्रह्मची वाट त्या दृश्याने अडवली असे होते. जो दृश्याला खरे मानतो तो तसा निश्चय करतो तो तो खूप मोठी चूक करतो. आता हे बोलणे असू द्या. देहबुद्धीची लक्षणे दृश्य आवडत असेल तर मी पणामुळे ब्रह्मप्राप्ती होणार नाही. अस्थींच्या देही मासाचा डोळा त्याने ब्रम्हाचा गोळा पाहीन म्हणतो तो जाणकार नव्हे तर आंधळा, केवळ मूर्ख. डोळ्यांना दिसते, मनाला भासते, तितके काळ गेल्यावर नष्ट होते. परब्रम्ह हे दृश्याच्या पलीकडे असते. परब्रम्ह हे शाश्वत असते. माया अशाश्वत असते. असे नाना शास्त्रांमध्ये निश्चितपणे सांगितलेले आहे. आता पुढे देहबुद्धीचे लक्षण निरूपण करीत आहे. त्यामध्ये चुकणारा तो मी म्हणजे कोण याची माहिती सांगत आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे. मग मिळविलेले समाधान अंगी बाणवावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दृश्यनिर्णय नाम समास अष्टम समाप्त,जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!