समास दशक ७ समास २ ब्रह्मनिरूपण
जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्म निर्गुण निराकार,ब्रह्म निःसंग निर्विकार आहे, ब्रह्मास पारावार नाही असे साधू सांगतात. ब्रह्म सर्वव्यापक, ब्रह्म अनेकांत एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक शास्त्रात सांगितला आहे. ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित असणारे, ब्रह्म कल्पनारहित निर्विकल्प आहे. ब्रह्म हे दृश्यापेक्षा वेगळे आहे, ब्रम्ह शून्यापेक्षा निराळे आहे, ब्रम्ह इंद्रियांच्याद्वारे अनुभवता येत नाही. ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही, ब्रह्म मुर्खाला माहिती नसते, ब्रह्म साधूशिवाय अनुभवाला येत नाही. सर्वांपेक्षा ब्रह्म थोर आहे. ब्रह्मसारखे दुसरे सार नाही, ब्रम्ह सूक्ष्म आणि ब्रह्मदेवाला देखील अगोचर आहे. शब्दांनी ब्रह्म बोलले जाते त्यापेक्षा वेगळे आहे. विलक्षण आहे पण श्रवणाच्या अभ्यासाने ब्रह्म मिळवावे. ब्रह्माला अनंत नावे आहेत पण ब्रह्म नामातीत आहे. ब्रह्माला कोणताही दृष्टांत देता येत नाही. जेथे वाचा संपते तेथे देखील ब्रह्म प्राप्ती होत नाही, असं श्रुतीमध्ये वेदांमध्ये सिद्धांत वचन आहे.
कल्पनेने ब्रम्ह पाहायला गेले तर त्याची कल्पना करता येत नाही म्हणून त्याचं वर्णन करता येईल हे खोटं.आता मनाला अप्राप्त आहे ते प्राप्त कसे होईल हे विचाराल तर सद्गुरुशिवाय ते शक्य नाही. सगळी भांडारगृहे भरलेली आहेत पण हातात किल्ली नसल्याने ती अडकलेली आहेत. ती किल्ली मला मिळावी असा श्रोत्याचा वक्त्याला प्रश्न आहे. सद्गुरूकृपा हीच त्याची किल्ली आहे त्यामुळे बुद्धीमध्ये प्रकाश पडून द्वैत कपाटे एकदम उघडतील. तिथे अमर्याद सुख मिळते पण मनाला प्रवेश नाही. मन नसताना साधनाची युक्ती सापडते. मनाविना त्याची प्राप्ती होते, वासना नसताना तृप्ती होते, तिथे कल्पनेची व्युत्पत्ती चालत नाही. ते स्फुर्तीच्याही पलीकडचे आहे, मन बुद्धीला न समजणारे आहे, मी पणा सोडल्यावर लगेच मिळते. मी पणा सोडावा मग त्याला पाहावे त्या अनुभवामुळे सुख प्राप्त होईल. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान! त्याचा संग आपल्याला जडलेला आहे. तो संग सोडून निसंग झालेल्याला कल्पना न करता तिचा अधिकार प्राप्त होतो.
मी कोण हे माहीत नसणे याला अज्ञान म्हणतात, अज्ञान गेल्यावर परब्रम्ह मिळते. देह बुद्धीचे मोठेपण परब्रह्मापुढे चालत नाही. तिथे अहंकाराचे निर्वाण व्हायला हवे. उच्च, नीच, राया, रंक ते सगळे इथे एकाच मापाने मोजले जातात.ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळे, शूद्राचे ब्रह्म ओवळे असं आगळे वेगळं तिथे नसतं. तिथे राजाला उंच ब्रम्ह, परिवाराला खालचे ब्रह्म असा भेद त्याच्याकडे नसतो. सगळ्यांना मिळून तिथे एक ब्रह्म असते. तिथे अनेक ब्रह्म नाहीत. राजा आणि प्रजा सगळे तेथे जातात. स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्ही लोकीचे लोक त्यांना सगळ्यांसाठी विश्रांतीचे हे एकच ठिकाण आहे. गुरु-श पद मिळते तिथे भेदाभेद नाही फक्त त्यांनी देहबुद्धीचा संबंध तोडला पाहिजे. देहबुद्धीचा अंत झाल्यांवर सर्वांना एकच प्राप्ती होते, एक ब्रह्म द्वितीयं नास्ति असे श्रुती वचन आहे. ब्रह्माचे आणखी वर्णन ऐकुया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे