भावार्थ दासबोध
प्रिय वाचक,
स्वबोध ज्ञानेश्वरी नंतर अनेक वाचकांनी दासबोध निरुपण करण्याची मागणी केली.एक वचनी, एक पत्नी, एकबाणी श्रीराम म्हणजे आदर्श. श्रीराम भक्ती ही आजच्या युगात आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण दासबोध रोज थोडा थोडा समजून घेता यावायासाठी हे ‘भावार्थ दासबोध’ निरुपण केले आहे. तरी वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्या अशी विनंती आहे.
आपला,
पद्माकर देशपांडे.
मोबाईल – ९४२०६९५१२७
भाग १
स्तवन नाम दशक प्रथम, ग्रंथारंभ लक्षण नाम समास प्रथम
जय जय रघुवीर समर्थ.
श्रोते विचारत आहेत, हा कोणता ग्रंथ आहे. त्यात काय सांगितले आहे. ते श्रवण केल्याने काय प्राप्त होणार आहे. या ग्रंथाचे नाव दासबोध आहे. त्यात गुरुशिष्य संवाद आहे. त्यात भक्तिमार्ग विषद केलेला आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान, वैराग्याचे लक्षण, प्रामुख्याने अध्यात्म निरुपण सांगितले आहे. भक्तीमुळे निश्चितपणे देवापर्यंत पोहोचता येते, असा अभिप्राय या ग्रंथात व्यक्तकरण्यात आला आहे. मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती यांचा निश्चय यातसांगितला आहे. शुद्ध उपदेश, सायुज्यमुक्ती, मोक्षप्राप्तीचा निश्चय यात सांगितला आहे. शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती, अलिप्तपणा यांचा निश्चय यात सांगितला आहे.
मुख्य देवाची माहिती, मुख्य भक्ताचा निश्चय, जीवशिवाचा निश्चय यात सांगितला आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय यात सांगितला आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षणसांगितले आहे. मायोद्भव लक्षण, पंच भूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण सांगितले आहे. नाना कुशंका निवारण, नाना संशय निवारण, नाना प्रश्न, नाना आशंका फेडण्यात आल्या आहेत. असे बहुतेक सांगितले आहे, यापूर्वी सांगण्यात न आलेले ते सर्व या ग्रंथामध्ये स्पष्ट केले आहे.
दासांचा म्हणजे श्री समर्थांचा उपदेश दशक निर्माण करून विषद केला आहे, ज्या त्या दशकात विविध विषय मांडले आहेत.त्यासाठी नाना ग्रंथांचा आधार घेतला आहे. त्यात उपनिषदे, शास्त्र वेदांत श्रुती,आणि मुख्य म्हणजे आत्मप्रचिती यांना स्थान देण्यात आले आहे. नाना ग्रंथांचा आधार घेतल्याने त्याला खोटे म्हणता येणार नाही, आणि हे प्रत्यक्ष अनुभवास देखील येते. मत्सराने त्याला खोटे म्हटले तर सर्वच ग्रंथ, भग्वद्वाक्य अमान्य केले असे होईल. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पाण्डवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत अशा विविध ग्रंथांचा आधार यात घेतला आहे.त्यामुळे त्यात भगवंताचे वाक्य यथार्थपणे आले आहे हे निश्चित. भगवदवाचनावर अविश्वासदाखवील असा कोण पापी येथे आहे? यातील बोलणे भगवदवाक्याशिवाय केलेले नाही.
पूर्ण ग्रंथ पाहिल्यावाचून जो त्याला उगाच दूषण देईल, तो दुरात्मा मत्सराने करतो असे ओळखावे. अभिमानामुळे मत्सर जागृत होतो, मत्सरातून तिरस्कार निर्माण होतो त्यातून पुढे क्रोध विकार प्रबळपणे बळावतो. असा आतून नासला,काम क्रोधाने खवळला, अहंकारामुळे जीवभावास आला हे प्रत्यक्षच दिसते.काम क्रोधाने बरबटला, त्याला भला कसे म्हणावे? राहू देवता अमृत सेवन करूनही मृत्यू पावला त्याची कथा पुराणात आहे.
आता हे बोलणे आपापल्या अधिकाराप्रमाणे घेणे, मात्र अभिमान त्यागावा हे उत्तमातील उत्तम होय. मागे श्रोत्यांनी विचारले, ते या ग्रंथात सर्व सारांशाने सांगितले आहे. त्यामुळे सुगम मार्ग सापडेल, दुर्गम साधना करावी लागणार नाही, सायुज्यमुक्तीचे गुपित लक्षात येईल. अज्ञान, दुःख, भ्रांती नष्ट होईल, ताबडतोब ज्ञान प्राप्ती होईल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्यांनी अंगात वैराग्य बाणविले, विवेक आणि चातुर्य समजते अशा योग्याचे हे परमभाग्य आहे. भ्रांत, अवगुणी, अवलक्षणी असतील तेच सुलक्षणी,धूर्त, तार्किक, विचक्षण, वेळकाळ जाणणारे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील, पापी असतील ते पस्तावतील. भक्तीमार्गाचे निंदक वंदन करू लागतील. बध्द असतील ते मुमुक्षु होतील. मूर्ख असतील ते अतिदक्ष होतील. अभक्त असतील ते भक्तिमार्गाला लागून मोक्ष मिळवतील. नाना दोष नष्ट होतील. पतित असतील ते पावन होतील. केवळ श्रवण केल्याने प्राणी उत्तम गतीला लागतील. देहबुद्धीचे नाना धोके, संदेहाच्या शंका कुशंका, संसाराचे उद्वेग श्रवण केल्याने दूर होतील. अशी याची फलश्रुती आहे.
श्रवणाने अधोगती टळेल. मनाला विश्रांती, समाधान मिळेल. ज्याचा जसा भावार्थ त्याला तसा लाभ होईल. जे पुरुष मत्सर धरतील त्यांना तेच प्राप्त होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पथम
समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
दशक १ समास २ गणेश स्तवन नाम समास
जय जय रघुवीर समर्थ.ओंकार रूप असलेल्या,सर्व सिद्धी फळ देणाऱ्या, अज्ञान- भ्रांती नष्ट करणाऱ्या गणनायकास माझा नमस्कार असो. माझ्या अंतःकरणात यावे, सर्वकाळ वास्तव्य करावे, मज मुखदुर्बलास आपल्या कृपाकटाक्षाद्वारे वदवावे. आपल्या कृपेमुळे भ्रांतीचे पडदे दूर होतात आणि विश्वभक्षक काळ आपले दास्यत्व करतो. आपल्या कृपेमुळे विघ्ने गरीब होऊन थरथरा कापू लागतात, संकटे नाममात्र होऊन देशोधडीला लागतात. त्यामुळे आपले नाव विघ्नहर आहे ते आम्हा अनाथांचे माहेर आहे. त्यामुळेच हरिहर देखील आपल्याला वंदन करतात. मंगलनिधी अशा आपल्याला वंदन करून कार्य सुरु केले की आघात, अडथळे त्यात बाधा आणू शकत नाहीत.(क्रमशः)
जय जय रघुवीर समर्थ, जनस्थान ने दासबोध हा पवित्र ग्रंथ निरुपणासाठी घेतला या बद्दल सर्व प्रथम संपादक व टीम चे अभिनंदन. सध्या सर्वत्र जी अशांतता पहावयास मिळते अश्या वेळी, जनस्थान ने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. समर्थांच्या शब्दात शहाणे करावे जन, पतीत करावे पावन, पृथ्वी मध्ये भगवद जन वाढवावे, या निमित्ताने भगवद भजन व त्यातून एक चांगला संस्कार असलेला समाज घडो हीच समर्थ चरणी प्रार्थना व परत एकदा जनस्थान ला पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌷🌷