भावार्थ दासबोध – भाग १० वा

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

या नरदेहाच्या आधाराने नाना साधनांची द्वारे उघडतात आणि मुख्य म्हणजे सारासार विचार करून अनेक जण मुक्त झाले आहेत. या नरदेहाचा मुळे अनेक उत्तम स्थानी पोहचले असून अहंकार सोडून स्वानंद सुख मिळवते झाले आहेत. नरदेह प्राप्त करून होऊन उर्ध्व गती मिळविल्याने संशय समूळ नष्ट झाला आहे. पशुदेहाला गती नाही असे सर्वत्र बोलले जाते, नरदेहीच परलोकाची प्राप्ती होऊ शकते. संत, ऋषीमुनी, साधू, समाधानी भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, सन्यासी, षडदर्शनी, तापसी, सर्व नरदेहामुळेच झाले आहेत, म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे. नाना देहांमध्ये वरिष्ठ आहे. त्याच्यामुळे यमयातनेचे संकट नष्ट होते.

नरदेह हा स्वाधीन असतो तो सहसा पराधीन नसतो परंतु परोपकार करून झिजवावा व कीर्ती संपादन करावी. घोडे, बैल, गाई, म्हशी, नाना पशु, दासी यांच्यावरील प्रेम नाहीसे झाल्यावर त्यांना कोणी विचारणार नाही. नरदेहाचे तसे नाही इच्छा असो किंवा नसो त्यांना बंधन घालता येत नाही. नरदेह पांगळा असेल तर उपयोग होत नाही किंवा थोटा असेल तर परोपकार करता येत नाही. नरदेह अंध असेल तर तो वाया गेला किंवा बहिरा असला तरी निरूपण ऐकता येणार नाही. नरदेह मुका असेल तर बोलता येणार नाही, अशक्त रोगी असला तरी त्याचा उपयोग होणार नाही.

नरदेह मूर्ख असला किंवा त्याला फेफरे, समंधाने ग्रासले असेल तरी तो निरर्थक जाणावा. असे काही नसेल तर चांगला नरदेह असलेल्याने परमार्थ मार्ग लगेचच अवलंबावा. नरदेह असूनही परमार्थ बुद्धी विसरले तर तर ते मूर्ख मायाजळी फसले असेच म्हणावे लागेल. माती आणून तिचं घर केलं ते माझे अशी मनामध्ये कल्पना केली पण ते इतरांचे हे कळलेच नाही. उंदीर म्हणतात घर आमचे, पाली म्हणतात घर आमचे, माशा म्हणतात घर आमचे, निश्चितपणे. कोळी म्हणतात घर आमचे, मुंगळे म्हणतात घर आमचे, मुंग्या म्हणतात आमचे, विंचू म्हणतात आमचे घर, सर्प म्हणतात आमचे घर, झुरळे म्हणतात आमचे घर, निश्चितपणे भ्रमर म्हणतात आमचे घर, भ्रमराच्या अळ्या सुद्धा म्हणतात आमचे घर! वाळवी म्हणते आमचे घर लाकडामध्ये, मांजर म्हणतात आमचे, कुत्रे म्हणतात आमचे घर, मुंगुसे म्हणतात आमचे घर, निश्चितपणे किडे म्हणतात आमचे घर, पांगुळ म्हणतात आमचे घर, पिसवा म्हणतात आमचे घर, निश्चितपणे ढेकूण म्हणतात आमचे घर, लाल मुंगळे म्हणतात आमचे घर, गांधील माशी म्हणते आमचे घर, अशा तऱ्हेने विविध खेड्यांचा प्राण्यांचा वावर घरामध्ये असतो त्याचा किती विस्तार सांगावा? सगळे आमचे घर आमचे घर असे निश्चितपणे म्हणत असतात. पशु म्हणतात आमचे घर, डास म्हणतात आमचे घर. घरातले म्हणतात आमचे घर. मित्र म्हणतात आमचे घर. ग्रामस्थ म्हणतात आमचे घर. तस्कर-चोर म्हणतात आमचे घर. राजकीय अधिकारी म्हणतात आमचे घर. अग्नि म्हणतो आमचे घर भस्म करील! (क्रमशः)

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.