सगळेजण म्हणतात आमचे घर. मूर्ख म्हणतात माझे माझे शेवटी जड झाले ओझे, देश सोडून दिला. सगळी घरे भंगली, गावे उजाड झाली. घरामध्ये राहिली अरण्यातील श्वापदे! किडा, मुंगी, वाळवी, उंदीर त्यांचेच हे घर असे म्हणावे लागते आणि माणूस प्राणी मात्र मूर्खासारखे निघून गेले अशी घरांची स्थिती असते. जन्म म्हणजे दोन दिवसांची वस्ती. कुठेतरी राहावे आणि आत्म प्रचिती करून घ्यावी. देह आपला म्हटला तरी तो इतर सर्वांसाठी निर्माण झालेला आहे. डोके आपले असे आपण म्हणतो पण त्यात ऊवा होतात, केसांच्या मुळाशी कोंडा-चाई होते, एखादी जखम झाली तर त्यात किडे पडतात. पोटामध्ये जंत होतात. ते प्रत्यक्ष दिसतात! दाताला कीड लागते. डोळ्यात फूल पडते.
कानात मळ साठतो आणि गोमाशा आत शिरतात. गोचीड अशुद्ध रक्त सेवन करतात. डास चावतात, पिसू चावतात, भुंगे गांधील माशा डंख मारतात, गोम-जळवा रक्त पितात, विंचू-सर्प दंश करतात, जन्माला येऊन देहाचे रक्षण केले पण अकस्मात वाघाने पळवून गेले किंवा लांडग्याने खाऊन टाकले असे होते. उंदीर मांजर चावतात, कुत्री घोडे लचके तोडतात, माकडे डुकरे कासावीस करतात, उंट हल्ला करतात, हत्ती चिरडून टाकतात, बैल ठेचून मारतात, तस्कर तडतडा अवयव तोडतात, भुते झपाटतात, अशी या देहाची स्थिती असते. असं हे शरीर असतं आणि मूर्ख म्हणतो ते माझं शरीर आहे, परंतु ते इतरांचे खाद्य आहे असे दिसते. त्यामुळे देह परमार्थात लावला तर त्याचं सार्थक होतं नाहीतरी व्यर्थ जातं. नाना आघातामुळे मृत्युपंथाला लागते. असो. जे प्रापंचिक मूर्ख आहेत त्यांना परमार्थ सुख काही जाणता येत नाही त्या मूर्खांचे लक्षण पुढील कथेत निरूपण करतो.
इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास दशम समाप्त.
मूर्ख लक्षण नाम दशक दुसरे
ओमकार रूप असलेल्या एकदंत, त्रिनयन गजाननास नमस्कार असो! आपण कृपादृष्टीने भक्तजनांना अवलोकावे. वेदांची माता असलेल्या, ब्रह्माची कन्या श्री शारदेस नमन. स्फूर्तीरूपाने आमच्या अंतरात कृपावंत होऊन होऊन वास कर. सद्गुरूंच्या चरणांना वंदन करून रघुनाथांचे स्मरण करून ज्यांचा त्याग करायचा आहे अशी मूर्ख लक्षणे बोलत आहे. एक मूर्ख,एक पढतमूर्ख दोघांची लक्षणे ओळखून श्रोत्यांनी विवेक धरला पाहिजे. पुढील भागात पढतमुर्खाचे लक्षण सांगणार आहे. तरी सावधपणाने ऐकावे.
तसं पाहिलं तर लक्षण खूप आहेत मात्र त्यापैकी काही सांगतो ती लक्ष देऊन ऐका. जे प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही जे केवळ अज्ञानी आहेत त्यांची ही लक्षणे आहेत. ज्यांच्या उदरातून जन्म झाला त्या आईवडीलांना विरोध करून पत्नीलाच स्थान देतो तो एक मूर्ख. आपले सर्व नातेगोते सोडून स्त्रीच्या आधीन होतो व तिला मनातील गुप्त गोष्ट सांगतो तो एक मूर्ख होय. दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, सासऱ्याच्या घरी राहतो, कूळ न पाहता कन्या निवडतो तो एक मूर्ख. अहंकार धरून समर्थ व्यक्तीला आपल्यासमान मानतो व त्याच्यावर अधिकार गाजवू पाहतो तो एक मूर्ख. स्वतःची स्वतः स्तुती करतो, आपल्याच देशात असूनही विपत्ती भोगतो, वडिलांची कीर्ती सांगत राहतो तो एक मूर्ख होय. अकारण हसत राहतो, सांगूनही विचार करीत नाही, अनेकांशी वैर धरतो तो एक मूर्ख. आपल्या लोकांबाबत दुरावा धरून परक्यांशी मैत्री करतो, रात्रीच्या वेळी दुसऱ्याचे न्युन सांगतो तो एक मूर्ख. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७