भावार्थ दासबोध -भाग ४०

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

कुडमुडे जोशी काही तरी भविष्य सांगून देतो त्यामुळे धोका वाटतो.वाईट स्वप्नामुळे भीती वाटते याचे नाव अधिभौतिक.कोल्हा भुंकतो,कुत्रा रडतो,अंगावर पाल पडते,नाना चिन्हे नाना चिंता याचे नाव अधिभौतिक. बाहेर पडताना नाना प्रकाराने अपशकून निर्माण होणे, त्यामुळे मन विचलित होणे याचे नाव होते आधिभौतिक.प्राणी तुरुंगात सापडला, त्याला यातना देण्यात आल्या, नाना दुःख मिळाली याचे नाव अधिभौतिक.राजदंडामुळे चाबकाचे फटके मिळतात, कोंडून ठेवले जाते, दरीत लोटून मारतात, तापल्या तव्यावर उभे करतात याचे नाव अधिभौतीक. झाडाच्या पारंब्या फोक यांनी मारतात याचे नाव आधिभौतिक.

गुदद्वारी मेख मारणे, दारूच्या बुधल्यास बांधून आग लावणे, बडग्याने मारणे, चारी बाजूंना ताणून मारणे, बुक्क्या, गचांड्या, गुडघे मारणे याचे नाव अधिभौतिक. लाथा, चापट्या, दगड मारणे, कानफडात मारणे,शेण मारणे, नाना प्रकारचे मार म्हणजे आधिभौतिक. टांगणे, चाप लावणे, मागे हात बांधणे, झाडाच्या बुंध्याशी नालाकृती बांधणे, नाकात चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, गुळवणी तीक्ष्ण पदार्थ घालणे याचे नाव आधिभौतिक. पाण्यामध्ये बुचळतात, हत्तीपुढे बांधून टाकतात, त्याला डिवचून त्रास देतात याचे नाव आधिभौतिक.

कान कापतात,नाक कापतात, हात पाय कापतात, जीभ कापतात याचे नाव अधिभौतिक. बाणाने मारतात, सुळावर देतात, डोळे, वृषण काढतात, नखशीकांत अंगाचे कातडे काढतात याचे  नाव आधिभौतिक. पारड्यामध्ये घालतात, कडेलोट करतात, तोफेच्या तोंडी उडवतात याचे नाव अधिभौतिक. कानामध्ये खुंट्या भरतात, कातडी काढतात याचे नाव अधिभौतिक. टोचून मारणे, गळ्यामध्ये गळ घालणे,  सांडशी लावून ओढणे, याचे नाव आधिभौतिक.

शिसे पाजणे,विष देणे,शिरच्छेद करणे,पायाखाली घालणे त्याचे नाव आधिभौतिक.अंगावरील कपड्यांमध्ये सरडे,मांजरे भरणे,फाशी देणे नाना प्रकारे पीडा देणे याचे नाव अधिभौतिक. कुत्रे, वाघ, भूत, सुसर, शस्त्र याद्वारे त्रास देणे म्हणजे अधीभौतिक. शरीराच्या शिरा ओढून घेतात, टेंबे लावून भाजतात अशा नाना विपत्ती यांचे नाव आधिभौतिक. मनुष्यहानी, वित्तहानी, वैभवहानी, महत्त्वहानी, पशुहानी, पदार्थहानी यांचे नाव अधिभौतिक. लहानपणी आई मरते, तरुणपणी  बायको मरते, वृद्धपणी मुलगा मरतो याचे नाव अधिभौतिक.

दुःख दारिद्र्य आणि ऋण, परदेशात पळून जाण्याची वेळ, तिथेही नागवणूक, संकटे, तुटवडा याचे नाव अधिभौतिक. महामारी, आकांत, युद्धात पराजय, जिवलगांचा क्षय होणे याचे नाव अधिभौतिक. कठीण काळ आणि दुष्काळ, साशंक आणि वाईट वेळ, चिंतेने जीवाचे होणारे हाल याचे नाव अधिभौतिक. घाण्याच्या चरखाखाली सापडला, चाकाखाली सापडला, नाना अग्नीमध्ये पडला याचे नाव अधिभौतिक. नाना शस्त्रांनी भेदले, नाना श्वापदानी भक्षण केले, तुरुंगवासात पडला याचे नाव अधिभौतिक. दुर्गंधीमुळे श्वास कोंडणे, घाबराघुबरा होणे, नाना अपमानामुळे लाज वाटणे, नाना शोकांमुळे प्राणी झीजतो याचे नाव अधिभौतिक. असे दुःखाचे अपार डोंगर आहेत. श्रोत्यांनी ही लक्षणे आधिभौतिक तापाची आहेत हे लक्षात घ्यावे.  इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आधिभौतिक ताप निरूपण नाम समास सप्तम समाप्त.(क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!