भावार्थ दासबोध -भाग ४७

निरुपण : पद्माकर देशपांडे 

0

दशक चौथा समास पहिला 
ब्रह्मा, विष्णू,महेश यांची स्थाने, इंद्रदेव ऋषीची स्थाने, वायु, वरूण, कुबेराची स्थाने, कशी असतात ते ऐकावे. नऊ खंड, चौदा भवने, अष्ट दिग्पाळाची स्थाने, नाना वने, उपवने कशी असतात ते ऐकावे. गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबरु, अष्टनायका, संगीत विचार कसा असतो ते ऐकावे. रागज्ञान, कालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्य ज्ञान, अमृतवेळ मुहूर्त वेळ, उत्तमकाळ, प्रसंगज्ञान कसे असते ते ऐकावे.

चौदा विद्या चौसष्ट कला, सामुद्रिक लक्षणे, सर्व कला, बत्तीस लक्षणे, नाना कळा कशा असतात ते ऐकावे. मंत्र, मोहरे, टोटके, सिद्धी, नानावल्ली, नाना औषधी, धातु, रसायन, बुद्धी, नाडी ज्ञान ऐकावे. कोणते दोष? कोणते रोग? कोणत्या रोगावर कोणते औषध? कोणत्या औषधामुळे कोणता रोग बरा होतो ही सगळी माहिती ऐकावी. रौरवादि कुंभपाक, नाना यातना, यमलोकात मिळतात, सुखदुःख स्वर्ग नरक कसा असतो ते ऐकावे. नवविधा भक्ती कशी असते?

चतुर्विध मुक्ती कशी असते? उत्तम गती कशी मिळते हे ऐकावे. पिंडब्रम्हांडाची रचना, नाना तत्वविवंचना, सारासार विचारबुद्धी कशी असते ते ऐकावे. सायुज्य मुक्ती कशी होते, मोक्षापर्यंत कसे जावे? यासाठी नाना मते शोधत जावी. वेदशास्त्र आणि पुराणे, महावाक्यांचे विवरण, तनु चतुष्टय निरसन कसे होते ते ऐकावे. असे हे सर्व ऐकावे मात्र त्यातील सार शोधून घ्यावे. असार ते त्यागावे. याला श्रवणभक्ती असे म्हणतात.

सगुण देवांची चरित्रे ऐकावी, निर्गुण आध्यात्म शोधावे ही श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. जयंत्या, उपोषणे, नाना साधने, मंत्र यंत्र जप ध्यान कीर्ती स्तुतिस्तवन भजन नानाविध ऐकत जावे. असे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे वेगळेपण सोडून भक्तीचे मूळ शोधावे. सगुण भक्तीचे निरूपण अशा तऱ्हेने केले आहे. पुढे कीर्तन भक्तीचे लक्षण सांगत आहे.  इती श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्ती निरूपण समास प्रथम समाप्त

श्रीराम समास दुसरा श्रोत्यांनी भगवतभजन विचारले ते नऊ प्रकारचे आहे. त्यामध्ये प्रथम असलेले श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती सांगतो. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी,योग्यरीत्या अखंड कथा सांगावी. भरपूर पाठांतर करावे, ग्रंथाचा अर्थ मनात साठवावा, निरंतर भगवत कथा करीत जावी. स्वतःच्या सुखा स्वार्थासाठी हरिकथा करावी हरिकथेविना राहूच नये. नित्य नवा अभ्यास करावा, विचारपूर्वक विषय मांडावा, हरी कीर्तनाने जगात कल्लोळ करावा. मनापासून कीर्तनाची आवड बाळगावी. त्यात गोडी निर्माण करावी. हरी कीर्तनासाठी नेहमी तत्पर रहावे. भगवंताला कीर्तन प्रिय आहे.

कीर्तनामुळे समाधान होते. कलियुगामध्ये हरिकीर्तन हाच एक उपाय आहे. परमेश्वराची विविध विचित्र ध्याने, त्याची अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती यांचे वर्णन करून कथा करावी. परमेश्वराचे यश,किर्ती, प्रताप, महिमा  आवडीने सांगावा. त्यामुळे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होतो. वक्तृत्व करून  त्याचा अन्वय लावावा,  टाळ्या वाजवीत नाम घोष करावा, त्यामध्ये पुराणातील गोष्टी आणि प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी यांचे वर्णन करावे.

टाळ, मृदंग, हरिकीर्तन, संगीत, नृत्य, तान, मान यांचा वापर करून कथा करावी. कीर्तन करताना श्रोत्यांचे लक्ष टिकवून ठेवावे.  खणखणीत कथा सांगून श्रोत्यांचे कान तृप्त करावे. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत, गाण्याने  त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेमाश्रु आले पाहिजेत. देवाच्या द्वारी लोटांगण घालावी, नमस्कार घालावे, दोहे, श्लोक, विविध छंद यांचा वापर करावा, वीररस निर्माण करावा, विनोदी प्रसंग वर्णन करावा. असं कीर्तन भक्तीचे वर्णन श्री समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात (क्रमशः) 
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!