कीर्तन भक्ती वर्णन
नाना नवरस शृंगारिक गद्य, पद्याचे कौतुकास्पद दाखले, नाना वचने, प्रास्तविक शास्त्राचा आधार देऊन बोलावे. भक्ती ज्ञान वैराग्याची लक्षणे, निती, न्याय, स्वधर्माचे रक्षण, साधनेचा मार्ग, अध्यात्माचं निरुपण यांची प्रांजळपणे माहिती द्यावी. प्रसंगी हरिकथा वर्णन करावे. सगुण भक्तीचे वर्णन करावे. निर्गुण भक्ति सांगावी. अध्यात्मविद्या स्पष्ट करावी. मनोरंजक पूर्वपक्ष सादर करून शेवटी निश्चयात्मक निरूपण करावे. अघळपघळ बोलू नये. वेदाचे पारायण करावे. लोकांना पुराण सांगावे.
माया ब्रह्माचे विवरण सांगोपांग करावे. ब्राह्मण्य रक्षण आदराने करावे. उपासनेची मार्ग सांगावे. गुरु परंपरा निर्धारपूर्वक कायम ठेवावी. वैराग्याचे रक्षण करावे. ज्ञानाचे लक्षण रक्षण करावे. दक्षतेने सर्व संभाळावे. कीर्तन ऐकताना शंका उपस्थित होतील सत्य समाधान होणार नाही, निती न्याय समजणार नाही असे बोलू नये. सगुण कथेचे नावच कीर्तन असून अद्वैत म्हणजे निरूपण. सगुणाचे वर्णन करून निर्गुणाची माहिती द्यावी. वक्तृत्वाचा अधिकार थोड्या लोकांना असतो त्यामुळे खरे बोलावे, अनुभवाचे बोलावे. सर्व नियम पाळून ज्ञान सांगावे. वेदाज्ञेनेचा भंग करू नये. लोकांना उत्तम मार्ग लाभेल असे सांगावे.
हे सर्व करीत असताना परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करावे त्याचे नाव आहे कीर्तन. ही दुसरी भक्ती आहे. कीर्तनामुळे मोठमोठे दोष निघून जातात, कीर्तनामुळे उत्तम गती प्राप्त होते, कीर्तनामुळे भगवंताची प्राप्ती होते याविषयी संशय नाही. कीर्तनामुळे वाचा पवित्र होते, कीर्तनामुळे मन पवित्र होते, कीर्तना मुळे प्राणिमात्र सदाचारी होतात. कीर्तनामध्ये परमेश्वर सापडतो, कीर्तनामुळे श्रोते-वक्त्यांचा संदेह नष्ट होतो, सदा सर्वदा हरिकीर्तन करीत राहावे असे नारदाने सांगितले आहे तेच नारायण सांगत आहे. असा हा कीर्तनाचा महिमा आहे. कीर्तनामुळे परमात्मा संतोष पावतो सर्व तीर्थे आणि परमात्मा हरी कीर्तनामध्ये वास करतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे किर्तनभक्ती नाम समास द्वितीय समाप्त
समास तिसरा मागे किर्तनाचे निरूपण केले. त्यामुळे सर्वजण पवित्र होतात.आता विष्णू स्मरण ही तिसरी भक्ती सांगत आहे. देवाचे स्मरण करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणाने समाधान मिळते. नियमितपणे सकाळी दुपारी सायंकाळी सर्वकाळी नामस्मरण करीत जावे. सुखदुःख किंवा आनंद असले तरी नामस्मरण वाचून राहू नये. सणावारी, दुःख असताना, पर्वकाळ असताना, गमन समई, विश्रांती घेताना, झोपताना नामस्मरण करावे. नाना संकटे, साकडे, कोडे, संसाराची खटपट, मनाला चुटपुट लागते तेव्हादेखील नामस्मरण करावे. चालताना, बोलताना, व्यवसाय करताना, खाताना, जेवताना, नाना उपभोग घेताना नाम विसरू नये.
संपत्ती असो किंवा विपत्ती जशी काळाची गती असेल तशी त्या वेळेस नामस्मरण स्थिती सोडू नये. वैभव, सामर्थ्य आणि सत्ता भाग्यश्री भोगत असताना देखील नामस्मरण सोडू नये. आधी अवदसा मग चांगली स्थिती किंवा अधिक चांगली स्थिती नंतर वाईट स्थिती कशाही प्रसंगी नाम सोडू नये. नामामुळे संकटे नाश पावतात, नामामुळे विघ्नांचे निवारण होते, नामामुळे स्थान प्राप्त होते, भूत पिशाच, नाना छंद, ब्रम्ह संबंध, मंत्रचळ, नाना दुःखे नामामुळे नष्ट होतात. नामामुळे विषबाधा नाहीशी होते, चेटूक नाहीसे होते, नामामुळे अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते. बाळपणी तरुण काळी, वृद्धापकाळी, कठीण काळी सर्व काळी अंतिम काळी नामस्मरण असावे. नामाचा महिमा शंकर जाणतो त्यामुळे जनांना तो उपदेश करतो. वाराणसी हे मुक्तीचे क्षेत्र आहे तेथे जाऊन रामाचे नाव नाव घेतले पाहिजे. नामस्मरण भक्तीचा पुढील भाग पुढील कथेत ऐका.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७