
सर्व प्रयत्न थकल्यावर, सर्व तर्क थांबल्यावर, विवेक कमी पडल्यावर, शब्दांची बोबडी वळते,मनाची घाई कामी येत नाही. बोलकेपणामध्ये विशेष असलेला हजार मुखांचा शेषनाग देखील ही वस्तू शोधताना दमला पण त्याला ती काही सापडली नाही. वेदांनी सर्व प्रकाशित केले आहे, वेदरहित काही नाही, मात्र वेदही काही दाखवू शकत नाही. ती वस्तू संतसंगामुळे स्व अनुभवामुळे कळू लागते असा संतसंगाचा महिमा आहे. मायेची ही एक विचित्र कला आहे तिच्यामुळे वस्तूची ओळख पटत नाही मात्र संतच मायातीत बनण्याची, अनंताची वाट सांगू शकतात.ब्रह्माचे वर्णन करता येत नाही संत हेच त्याचे स्वरूप आहे त्यामुळे वेगळे काही बोलण्याची गरज नाही. संत हे आनंदाचे स्थळ आहे संत म्हणजे केवळ सुख आहे.
नाना संतोषाचे मूळ म्हणजे संत संत म्हणजे विश्रांतीची विश्रांती. संत म्हणजे तृप्तीची तृप्ती, भक्तीची फलश्रुती म्हणजे संत. संत म्हणजे धर्माचे धर्मक्षेत्र, संत म्हणजे स्वरूपाचे सत्पात्र किंवा संत म्हणजे पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत म्हणजे समाधीचे मंदिर, संत म्हणजे विवेकाचे भांडार किंवा संत म्हणजे सायुज्यमुक्तीचे माहेर. संत म्हणजे सत्याचा निश्चय, संत म्हणजे सार्थकाचा जय. संतांची कृपा म्हणजेच स्वरूपाचा साक्षात्कार! संत हे अत्यंत उदार, समर्थ, दानशूर असे असतात. त्यांनी दिलेला हा ज्ञान विचार शब्दांनी सांगता येत नाही.
अनेक राजे महाराजे चक्रवर्ती झाले आहेत, पुढेही होतील. पण कोणी सायुज्यमुक्ती देणार नाही. त्रैलोक्यात नाही असे दान संत सज्जन करतात. अशा संतांच महिमा काय वर्णन करावा! संत हे रवी, त्रिलोक्याहून वेगळे आहेत, वेद, श्रुतींना देखील ते आकलन होत नाहीत.त्यांच्यामुळे अंतरामध्ये परब्रह्म प्रकट होते. असा संतांचा महिमा आहे. जितके बोलेल तितके थोडेच आहे, कोणतीही उपमा देणे कमी पडेल. संतांमुळे मुख्य परमात्मा प्रगट होतो.इति श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे संत स्तवन नाम समास पंचम समाप्त.
दशक १, समास ६
आता भक्त, ज्ञानी, सज्जन,विरक्त,योगी, गुणसंपन्न अशा सत्यवादी श्रोत्यांना वंदन करू या! एक सत्वाचे आगर, एक बुद्धीचे सागर, एक श्रोता नाना शब्द रत्नांची खाणच जणू! जे नाना अर्थरूपी अमृताचे भोक्ते, प्रसंगी वक्त्यापेक्षा श्रेष्ठ वक्ते, नाना संशय दूर करणारे असे निश्चयी पुरुष असतात. त्यांची धारणाशक्ती अपार असते. त्याना ईश्वराचे अवतार किंवा बसलेले प्रत्यक्ष ईश्वर देखील म्हणता येईल!
अत्यंत शांत, सात्विक अशा ऋषी,ईश्वराचे प्रतिनिधी असलेले श्रोते सभामंडळास अत्यंत शोभा आणतात. त्यांच्या हृदयात वेदगर्भ राहतो, मुखात सरस्वती वास करते ते जे बोलतात त्यातून देवगुरु असल्याचा भास होतो. अग्नीप्रमाणे पवित्र, स्फूर्ती किरण देणारे दिनकर, ज्ञानात श्रेष्ठ असल्याने ब्रह्मांड बोध देणारे असतात. ते अखंड सावध असतात, त्यांना त्रीकालाचे ज्ञान असते,सर्वकाळ ते कोणताही अभिमान न बाळगता आत्मज्ञानात मग्न असतात. ज्यांच्या दृष्टीखालून गेलेले नाही असे काहीच नाही, सर्व गोष्टी ते मनाने जाणतात. आपल्याला जे जे काही आठवते ते त्यांना आधीच माहिती असते, त्यामुळे त्यांच्यासमोर ज्ञातेपण घेऊन काय सांगावे?(क्रमशः)
निरुपण: पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७


