भावार्थ दासबोध -भाग ५६

निरुपण :पद्माकर देशपांडे

0

दशक पाचवा समास पहिला गुरुनिश्चय
जय जय रघुवीर समर्थ
जय जय श्रीराम
सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या सद्गुरूंचा जयजयकार असो.आपण परमपुरुष आत्माराम आहात.आपला महिमा अनिर्वाच्य असून तो वाचेने वर्णन करता येत नाही.वेदांना देखील जो लाभ सांगणे कठीण आहे आहे.जो शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही असा अलभ्य लाभ सत्शीष्यास आपल्यामुळे मिळतो.योगियांचे गुपित असलेले शंकराचे निजधाम असलेले विश्रांतीचे विश्राम स्थान असलेले परमगुह्य अगाध ब्रह्मज्ञान आपल्या योगाने आपोआप समजते आणि दुर्घट संसाराची पराधीनता राहत नाही.आता स्वामीजींच्या कृपेमुळे लडिवाळपणे गुरुशिष्यांची लक्षणे सांगतो त्याप्रमाणे मुमुक्षुनी गुरूला शरण जावे. गुरु हा सर्वांसाठी ब्राम्हण असून तो क्रियाहीन असला तरी याला अनन्यभावे शरण जावे.

या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला.विष्णूने गाईगुरे सांभाळली तर इतरांची काय कथा!ब्राह्मणाची वचने प्रमाण मानली तर शुद्र देखील ब्राह्मण होतात.ब्राह्मणाच्या मंत्रामुळे धातू आणि पाषाणामध्ये देवपण येते.ज्याची मुंज होत नाही तो निश्चितपणे शुद्र आहे. दोनदा जन्मतो म्हणून त्याचे नाव द्विज होय.सर्वाना ब्राह्मण पूज्य ही वेदाज्ञा आहे.वेदविरहित आहे ते भगवंतास अप्रिय आहे.योग याग व्रत दान तीर्थाटन कर्ममार्ग ब्राह्मणाशिवाय होणार नाहीत.ब्राह्मण म्हणजेच मूर्तिमंत वेद असून तोच भगवंत आहे.त्याच्या वाक्यामुळे मनोरथ पूर्ण होतात.ब्राह्मणाचे पूजन केल्याने वृत्ती शुद्ध होऊन भगवंताकडे मन लागते. त्याच्या तिर्थामुळे प्राण्याला उत्तम गती मिळते.लक्ष भोजन करण्यासाठी ब्राह्मणच योग्य.अन्य जणांना कोण विचारतो कोण?

भगवंताला भाव प्रमाण आहे इतरांना सत्याची चाड नाही.अशाप्रकारे ब्राह्मणांना देव देखील वंदन करतात तिथे मानवाची काय स्थिती!ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगाला वंद्य आहे.अन्य व्यक्तीचे पूजन केले जात नाही.लोकांपेक्षा वेगळे वागले,वेद नाकारले त्याला पाखंड मत असे म्हणतात.जे हरीहराचे दास आहेत त्यांचा ब्राह्मणावर विश्वास आहे.त्यांच्या भजनाने अनेकांना पावन केले आहे. मात्र ब्राह्मण हा देवाधीदेवाना पावत असला तरी सद्गुरु कशासाठी करायचा असं जर तुम्ही म्हणत असाल तरी निःसंशयपणे सद्गुरुवाचून स्वरूपज्ञान होऊ शकत नाही! धर्म कर्मामध्ये ब्राह्मण पूज्य असला तरी ज्ञान सद्गुरुवाचून होत नाही. ब्रह्म ज्ञान नसताना शीण होतो,जन्ममृत्यू चुकत नाही. सद्गुरुविना कधीही ज्ञान होणार नाही,अज्ञानी प्राणी जन्म-मृत्यूच्या प्रवाहात वहातच जातील.ज्ञानविरहित जे जे केले त्यामुळेच जन्म झाला म्हणून सद्गुरुची पावले दृढपणे धरावी.

ज्याला देव पहावा असं वाटतं त्याने सत्संग धरावा. सत्संग केल्याशिवाय देव पावत नाही.अनेक साधने असली तरी सद्गुरु नसेल तर ती वेडी करतात. गुरुकृपा नसेल तर दुःखीकष्टी होतो ही सगळी साधने व्यर्थ ठरतात. कार्तिकस्नाने,माघस्नाने, व्रत, उद्यापन, दाने, स्वतःला जाळून घेणे, झाडास उलटे टांगून खाली केलेला धूर पिणे, सूर्य ताप सहन करून तप करणे, पंचाग्नी साधन करणे, हरिकथा पुराण श्रवण, आदराने निरूपण, सर्व कठीण तीर्थ फिरतात. विविध दैवताची पूजा करतात, व्यवस्थित संध्या, दर्भासन, टिळे, माळा, गोपीचंदन, तसेच अर्घ्यपात्रे, संपुष्ट, गोकर्ण, मंत्र यंत्रांची तांब्याची पात्रे, नाना प्रकारची उपकरणे साहित्यशोभा होय. घण घण घंटा घंटा वाजतात, स्तोत्रे, स्तवने आणि स्तुती, आसने, मुद्रा, ध्यान, प्रदक्षणा, नमस्कार, पंचायतन पूजा करतात, मृत्तीकेची लींगे पूजतात. केळी, नारळ संपूर्ण यथासांग पूजा करतात इतका सगळं करूनही गुरू नसेल तर काही उपयोग नाही. असे समर्थ सांगत आहेत. जयजय रघुवीर समर्थ ..(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!