दशक पाचवे समास तिसरा शिष्याचे वर्णन
जय जय रघुवीर समर्थ
दाताड वर करून कुत्र हाड चघळते त्याप्रमाणे विषयसुखाची तळमळ लागलेली असते.कुत्र्याच्या तोंडामध्ये पक्वान्न किंवा माकडाला सिंहासन द्यावे त्याप्रमाणे विषयासक्त माणसाला ज्ञान कसे पचेल? गाढव राखण्यामध्ये जन्म गेला तो पंडितांच्या सभेमध्ये गौरविला जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आसक्त माणसाला परमार्थ नाही.राजहंसांचा मेळा जमला तिथे डोमकावळा आला त्याचा विष्ठेच्या गोळ्यावर डोळा! तो स्वतःला हाऊस म्हणवतो.तसं सज्जनांच्या संगतीने विषयी लोक स्वतःला सज्जन म्हणतात मात्र मनामध्ये विषय असतात.
काखेमध्ये स्त्रीला घेऊन जातात आणि मला संन्यासी करा असे म्हणतात त्याप्रमाणे विषयी माणूस वाटेल तसे ज्ञान बडबडतो. असे हे पढतमूर्ख सुख आणू शकत नाहीत. नरकात जाण्यास योग्य प्राणी स्वतःच्या इच्छेने नरक भोगतात. वेश्येची सेवा करेल त्याला मंत्री कसे बनवावे? त्याप्रमाणे विषयांचा दास असलेला भक्तराज होऊ शकत नाही. विषयी लोक असतात त्यांना ज्ञान कुठून मिळणार? ते फक्त वाचाळ असून शाब्दिक बडबड करतात. असे शिष्य कनिष्ठामध्ये कनिष्ठ, अविवेकी आणि दुष्ट, खोटे, दुर्जन असतात. असे जे पापरूप, दोषी असतात त्यांना पश्चात्ताप झाला तरच प्रायश्चित्त मिळू शकते.
त्यांनी पुन्हा सद्गुरुला शरण जावे त्याला आनंदित करावे आणि त्याची कृपादृष्टी झाल्यानंतर पुन्हा शुद्ध व्हावे. स्वामी द्रोह घडल्यास तो अनंतकाळपर्यंत नरकामध्ये पडतो त्यावर स्वामीला सुखी करणे हा एकच उपाय असतो. स्मशानात गेल्यावर वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले त्यामुळे ज्ञान प्राप्त होणार नाही. क्षणिक भाव आणला, गुरूचा मंत्र घेतला, मंत्र घेऊन दोन दिवसाचा शिष्य झाला. असे उदंड गुरु केले, पाखंड शब्द शिकले, तोंडाळपणा केला तो महापाखंडी आहे! घटकेत एकदा रडतो आणि पडतो. घटकेत त्याला वैराग्य चढतं, झटक्यात त्याचा ज्ञातेपणाचा अहंकार येतो. एका क्षणी विश्वास धरतो, घटकेत कोणावर गुरुगुरतो असे पिसाटाप्रमाणे नाना छंद करतो.
काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, नाना विकार, अभिमान, कपटीपणा, तिरस्कार हृदयामध्ये नांदतात. अहंकार आणि देहाची आसक्ती आणि विषयाचा संग त्याच्यामुळे संसार प्रपंच आणि उद्वेग निर्माण होतो. चेंगट, उपकार विसरणारा, पापी, कुतर्की, कुक्रमी, संशयी, अभक्त किंवा शीघ्रकोपी, निष्ठूर, परघातक, हृदयशून्य आणि आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविचारी, दृढ संदेह धरणारा, आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती, दुर्वासना असलेला, अल्पबुद्धी, विषय कामना त्याच्या हृदयामध्ये वास करते असा, ईर्ष्या, असूया, तिरस्कार, निंदेस प्रवृत्त होणारा, देहाभिमान त्याच्यामध्ये असतो त्याला क्षुधा, तृष्णा, निद्रा आवरत नाही, त्याची कुटुंबाची चिंता कमी होत नाही, त्याला भ्रांती पडलेली असते. शाब्दिक बोल उदंड बोलतो, वैराग्याचा यांच्यामध्ये लवलेश सुद्धा नसतो. पश्चाताप करून तो साधनाचा मार्ग धरत नाही. त्याला भक्ती, विरक्ती, शांती नसते, सदवृत्ती, लीनता, दमन हे नसते. त्याच्यामध्ये कृपा, दया, तृप्ती, सुबुद्धी नसते.
शारीरिक कष्ट टाळतो, धर्माविषयी अत्यंत कृपण असतो. त्याचं हृदय आणि वर्तन बदलणे खूप कठीण असतं. त्याच्याकडे विनम्रता नसते. तो सज्जनांना अप्रिय असतो. रात्रंदिवस तो दुसऱ्याच्या कमीपणाचे वर्णन करत असतो. सदासर्वकाळ तोंडदेखलं बोलतो. कृती आणि विचार पाहता त्याचं वचन हे सत्य नसतं. दुसऱ्याला त्रास देण्यात तत्पर असतो. विंचू, विषारी प्राण्याप्रमाणे तो अंतःकरण भेदणारे शब्द वापरतो. आपले अवगुण झाकतो आणि दुसऱ्यांना कठोर शब्द बोलतो आणि खोटे गुणदोष दुसऱ्याला देतो. असं कुशिष्याचे वर्णन समर्थ रामदास स्वामी यांनी केलेले आहे. हा भाग संपला असून पुढील वर्णन ऐकू या पुढील भागांमध्ये. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७