दशक पाचवा समास सहावा शुद्ध ज्ञानाचे वर्णन
जय जय रघुवीर समर्थ ..जिथं मूळातच काही नाही तिथे सर्वसाक्षित्व कसे येणार? म्हणून तुर्या अवस्था म्हणजे शुद्ध ज्ञान मानू नये. ज्ञान म्हणजे अद्वैत तूर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत म्हणून शुद्ध ज्ञान वेगळेच असते. शुद्ध ज्ञानाचे लक्षण म्हणजे आपण शुद्ध स्वरूपात असणे त्याला शुद्ध स्वरूपज्ञान असे म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावे. महावाक्यउपदेश केला, पण त्याचा जप केला जात नाही त्याचा विचारच साधकांनी केला पाहिजे. महावाक्य उपदेशाचे सार म्हणजे त्याचा विचार घेतला पाहिजे त्याचा जप केला तरी भ्रांतीचा अंधकार फिटत नाही.
महावाक्याचा अर्थ म्हणजे आपण स्वरूपच आहोत त्यामुळे त्याचा जप करीत बसणे हा वृथा शीण होय. महा वाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण असून शुद्ध अर्थ म्हणजे आपणच परब्रम्ह आहोत. आपलाच आपल्याला लाभ होतो. हे ज्ञान परमदुर्लभ आहे. जे आदि अंती स्वयंभू स्वतःच स्वरूप आहे. जिथून हे सगळ प्रगट होतं, आणि सर्व नाहीसे होते ते ज्ञान झाल्यावर ती बंधनाचा भ्रम नाहीसा होतो. मत आणि मतांतर जिथे निर्विकार होतात त्याला अतिसूक्ष्म विचार पाहता ऐक्य म्हटले जाते. हे या चराचराचे शुद्ध, निर्मळ स्वरूप आहे त्यालाच ज्ञान असं वेदांतात म्हटलं आहे. आपले मूळ स्थान शोधल्यावर अज्ञान यात सहजपणे नाहीसे होते, उडून जाते. त्याला मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात.
आपली स्वतःला ओळख पटल्यावर आपल्यामध्ये सर्वज्ञता येते. त्यामुळे एका ठिकाणची गोष्ट पूर्णपणे निघून जाते. मी कोण? असा हेतू धरून देहातीत पाहिलं असता आपण स्वरुपच होतो. पूर्वी अनेक थोर थोर होऊन गेले जे ज्ञानाने पैलपार गेले त्यांची वर्णने ऐका. व्यास, वशिष्ठ, महामुनी, सुखी समाधानी जनक, अधिक महाज्ञानी यांनी ज्ञान मिळवले. वामदेवआदि योगेश्वर, वाल्मीक अत्रीऋषी, ऋषेश्वर शौनकादि हे वेदांतमते अध्यात्मसार आहेत. सनकादिक, आदिनाथ, मीननाथ, गोरक्ष मुनी असे अनेक अनुभवी आहेत. सिद्ध, मुनी, महानुभाव या सगळ्यांनी ज्या ठिकाणी महादेव आत्मानंदात डोलत असतो तो स्वानुभव घेतला. असे हे अनुभवी म्हणजे वेद शास्त्रांचे सार आहेत. हे सिद्धांत धादांत विचार आहेत. त्याची प्राप्ती भाविकांना भाग्यानुसार होते. साधुसंत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान या सर्वांचे गुप्त ज्ञान काय आहे ते आता सांगतो.
तीर्थ,व्रत,तप, दान, धूम्रपान यांच्यामुळे जोडले जात नाही, पंचाग्नी, गोरांजने यांनी प्राप्त होत नाही, सकळ साधनांचे फळ ज्ञानाचा शेवट हा असून त्याने संशयाचे मूळ नाहीसे होते. छप्पन्न भाषा आणि तितकेच ग्रंथ आहेत, वेदांत वगैरे या सगळ्याचा अर्थ एकच आहे. जे पुराणांना माहिती नाही, जिथे वेदवाणी शिणल्या आहेत, तेच याक्षणी मी गुरुकृपेमुळे सांगत आहे. हृदयात वसलेल्या कृपामूर्ती सद्गुरुस्वामीच्या मुळे महाराष्ट्रीय मराठीतील ग्रंथामध्ये हे मी सांगत आहे. आता मला संस्कृत किंवा प्राकृत याच्याशी देणे घेणे नाही. माझा स्वामी कृपेसहीत माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे. वेदाभ्यास न करता, श्रवणाचे सायास न घेता, प्रयत्न करता मला अमृतमय प्रसाद सद्गुरूच्या कृपेमुळे मिळाला आहे. हा ग्रंथ मराठी भाषेत आहे, त्यापेक्षा संस्कृत श्रेष्ठ आहे, त्यात वेदांत हा थोर आहे. त्या वेदांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. असा वेदांमधील सार प्रकट झालेले आहे असा वेदांत, त्या वेदांताचाही मतीथार्थ असा गहन परमार्थ तो तू ऐक! असं समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत. हा भाग येथे समाप्त झाला पुढील कथा ऐकु यात पुढील भागात.जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७