दशक ५ समास ७
जय जय रघुवीर समर्थ.सृष्टीमध्ये जे काही चराचर आहेत ते चार भागांमध्ये विभागलेले आहेत म्हणून त्यांना चत्वार म्हंटले जाते. हे चार भाग म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. या चार प्रकाराशिवाय पाचवा प्रकार नाही. आता ते सर्व विषद करूया. बध्द म्हणजे कोण? मुमुक्षुचे लक्षण काय? सिद्धाची ओळख कशी जाणाववी? श्रोत्यांनी आता सावध व्हावे. बध्द, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध यांची माहिती पुढे सांगत आहे. अंधारामधील अंध व्यक्तीप्रमाणे ज्याला डोळे नसल्याने चारी दिशा शून्याकार वाटतात असा बद्ध असतो. भक्त, ज्ञाते, तपस्वी, योगी, विरक्त, संन्याशी यांना पाहूनही त्याला काही भावना निर्माण होत नाहीत. त्याला कर्म आणि अकर्म, धर्म आणि अधर्म, सुगम परमार्थ पंथ दिसत नाही. त्याला शास्त्र, सत्संगती, सत्शास्त्र, सत्पात्र, पवित्र असा सन्मार्ग दिसत नाही. त्याला सारासार विचार कळत नाही, स्वधर्माचा आचार कळत नाही,
परोपकार कसा असतो ते समजत नाही.त्याच्यापोटी भूतदया नसते. त्याची काया सुश्चीश्मंत नसते. तो मृदू वचनाने लोकांचे सांत्वन करण्यासाठी जात नाही. त्याला भक्ती आणि ज्ञान कळत नाही. त्याला वैराग्य आणि ध्यान कळत नाही. मोक्ष आणि साधन कळत नाही, त्याचे नाव बध्द. ठामपणाने देव समजत नाही, संतांचा विवेक कळत नाही, त्याला मायेचे कौतुक कळत नाही त्याला बध्द असे म्हणतात. परमार्थाची खुण कळत नाही. अध्यात्मनिरूपण कळत नाही, स्वतः स्वतःला जाणत नाही. जीवाचे जन्म मूळ कळत नाही, साधनाचे फळ कळत नाही, तत्त्व कळत नाही त्याला बद्ध असे म्हणतात. बंधन कसे असते ते कळत नाही मुक्तीचे लक्षण कळत नाही. वस्तू कशी विलक्षण असते ते कळत नाही त्याला नाव बध्द असे आहे. त्याला बोललेला शास्त्रार्थ कळत नाही ज्याला स्वतःचा स्वार्थ कळत नाही. संकल्पाने आपण कसे बांधले गेलो आहोत ते त्याला कळत नाही तो बद्ध असतो. ज्याला आत्मज्ञान नाही हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे. तीर्थ, व्रत, दान, पुण्य हे त्याच्याकडे काहीच नसते. ज्याच्याकडे दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मैत्री नाही, शांती नाही, क्षमा नाही त्याला बध्द म्हणतात. ज्ञानाविषयीची कमतरता असते, तिथे ज्ञानाची लक्षणे कशी दिसतील?
अनेक वर्षे कुलक्षणे दिसतात त्याचे नाव बध्द. नाना प्रकारचे दोष करताना अत्यंत आनंद वाटतो, बाष्कळपणाचा हव्यास असतो त्याचे नाव बध्द. खूप काम, खूप क्रोध, खूप गर्व, खूप मद, खूप द्वंद्व, खूप खेद त्याचं नाव बध्द. खूप दर्प, खूप दंभ, खूप विषय, खूप लोभ, खूप कर्कश्य, खूप अशुभ त्याचं नाव बध्द. खूप गावगुंडपणा, खूप मत्सर, खूप असूया, तिरस्कार, खूप पाप, खूप विकार त्याचे नाव बध्द. खूप अभिमान, खूप ताठा, खूप अहंकार, खूप वटवट, मोठा कुकर्माचा साठा त्याचे नाव बध्द. खूप कपटीपणा, खूप वादविवाद, खूप कुतर्क, भेदाभेद, अत्यंत क्रूर, कृपामंद, त्याचं नाव बध्द. खूप निंदा, खूप द्वेष, खूप अधर्म, खूप अभिलाषा, नाना प्रकारचे दोष याचे नाव बध्द. खूप भ्रष्ट अनाचार, खूप नष्ट एकंकार, खूप आनीती अविचार त्याचे नाव बध्द. खूप निष्ठुर, खूप घातकी, खूप हत्यारा, खूप पातकी, तापट, कुविद्या असलेला त्याचे नाव बध्द. वाईट इच्छा असलेला, खूप स्वार्थी, खूप भांडकुदळ, अर्थाचा अनर्थ करणारा, वैर धरणारा, वाईट बुद्धीचा त्याचे नाव बध्द. बध्दाची काही लक्षणे आपण पाहिली पुढील लक्षणे पुढील भागात पाहू या. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७