कवी म्हणजे सृष्टीचा अलंकार, लक्ष्मीचा शृंगार, सर्व सिद्धींचा निश्चय म्हणजे कवी. सभेचे मंडन म्हणजे कवी, भाग्याचे भूषण म्हणजे कवी, अनेक प्रकारच्या सुखांचे संरक्षण म्हणजे कवी होत. देवांचे रूप वर्णन करतात ते कवीच, ऋषींचे महत्व सांगतात ते कवीच, नाना शास्त्रांचे सामर्थ्य उलगडून दाखवतात ते कवीच. कवींनी आपले कार्य केले नसते तर जगाचा उध्दार झाला नसता, त्यामुळे कवी हेच संपूर्ण सृष्टीचे आधार आहेत. कवीश्वर असल्यानेच विद्या, दातृत्व आहे, कवींपासून सर्वज्ञता निर्माण झाली आहे. पूर्वी वाल्मिकी, व्यासादिक असे अनेक कवीश्वर झाले त्यामुळे लोक शहाणे झाले. पूर्वी काव्ये केली होती म्हणून विद्वत्ता निर्माण झाली, पंडित व्युत्पन्न झाले. पूर्वी झालेले,आता असलेले आणि पुढे होणारे थोर थोर कवीश्वर यांना नमन. कवी म्हणजे चातुर्याची मूर्ती असून ते बृहस्पतीच आहेत,
त्यांच्या मुखातून वेद, श्रुती बोलतात. लोकांवर उपकार करण्यासाठी कवी लिहितात असे पुढे देखील मी सांगणार आहे. कवी म्हणजे अमृताचे मेघ, नवरसांचे ओघ, नाना सुखांचे उचंबळलेले सरोवर आहेत. मनुष्याच्या आकारात प्रगटलेली विवेकरूपी निधींची भांडारे म्हणजे कवी. त्यांच्यात नाना वस्तूंचे विचार भरलेले आहेत. पूर्वसंचितामुळे त्यांना गुण प्राप्त झाले असून आदिशक्तीचा त्यांना आशीर्वाद आहे त्यामुळे ते विश्वात श्रेष्ठ आहेत. बहरून आलेल्या वृक्षाप्रमाणे विश्वातील जनाना विविध प्रकारे सुख, अक्षय आनंद देत आहेत. निरांजनाची संपत्ती, विराटाची योगस्थिती, भक्तीची फळास आलेली फलश्रुती म्हणजे कवी. कवी म्हणजे ईश्वराचेच गुणगान असून कवीप्रबंधरचना आकाशापेक्षा महान, ब्रह्मांडरचनेहून मोठी आहे! अशाप्रकारे कवीश्वर म्हणजे जगास आधार असून त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो !इतिश्री दासबोधे, गुरुशिष्यसंवादे,कवेश्वरस्तवन नाम सप्तम समास समाप्त.
-दशक १ ,समास ८ सभास्तवन
आता मुक्ती जेथे सुलभ असते, जेथे स्वतः जगदीश उभा असतो अशा सकल सभेला वंदन करू या! परमेश्वर सांगत आहे, ‘हे नारदा, मी वैकुंठात नाही, योग्यांच्या हृदयात देखील नाही, मात्र जेथे माझे भक्त माझे नेहमी गायन करत असतात तेथे मी राहतो!’ यामुळे सभा श्रेष्ठ आहे. भक्तांच्या नामघोषाचा घडघदाट, जयजयकाराचि गर्जना यामुळे सभा हे वैकुंठ होते. या सभेत भक्तांची प्रेमळ गायने,वेदांची व्याख्याने, पुराणकथा श्रवणे,भगवत्कथा, हरिकीर्तने निरंतर सुरु असतात. परमेश्वराचे गुणवर्णन, नाना निरुपणे, त्यांचे संवाद, अध्यात्मविद्या, त्यातील बारकावे यांचे मंथन होत असते.
नाना शंकांची समाधाने जेथे गवसतात, त्यामुळे तृप्ती लाभते, वाग्विलासामुळे मनात ध्यानमूर्ती स्थापन होते. भक्त प्रेमळ, भाविक, सभ्य, गंभीर, सात्विक, रम्य, रसाळ, गायक, निष्ठावंत असे असतात. कर्मशील, आचारशील, दानशील, धर्मशील,शुचिष्मंत, पुण्यवान, शुद्ध अंतःकरण असलेले, कृपाळू, वैराग्यसंपन्न, उदास, नियम पाळणारे, विरक्त, निस्पृह, अनेकदा अरण्यात राहणारे असतात. दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे, कोणी बालब्रह्मचारी योगीश्वर, कोणी पुरश्चरणी तपस्वी,तीर्थस्थानी निवास करणारे, मनावर ताबा मिळवलेले, महायोगी तर कोणी लोकांचे श्रद्धास्थान असलेले असतात. सिद्ध, साधू,साधक, मंत्र यंत्र शोधक, एकनिष्ठ, उपासक, गुणग्राही, संत सज्जन, विद्वज्जन, वेदज्ञ,शास्त्रज्ञ,महाजन,प्रबुद्ध, सर्वज्ञ, निर्मल समाधान मिळालेले असतात. (क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७