भावार्थ दासबोध -भाग ९ 

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

या ब्रह्माच्या अनुभवामुळे ब्रह्मांड देखील त्यात बुडून जाते, पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटते. अंतरात आत्मा वस्तीस आला की प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते. स्वरूपाचा अनुभव आला की संदेह नष्ट होतो, समोरील दृश्य जुने जर्जर वाटू लागते. असा हा परमार्थ असून जो करील त्याचे हित होईल,तो किती सामर्थ्यशाली आहे ते किती म्हणून सांगावे ? ब्रह्मादीक देखील येथे विश्राम करतात, योगी तन्मय होतात. परमार्थ हा सर्व जीवांचा विसावा असून सिद्ध, साधू, महानुभाव, सात्विक जीव यांना सत्संगातून तो प्राप्त होतो. परमार्थ हेच जन्माचे सार्थक असून तोच संसारी तारक आहे, त्याच्यामुळेच धार्मिक माणसास परलोक प्राप्त होतो.

तपस्वींचा आश्रय, साधकांचा आधार, भवसागराचा पैलपार म्हणजे परमार्थ. परमार्थी म्हणजे राज्य धारण करणारा परमार्थ करत नाही तो भिकारी अशी ही परमार्थाची योग्यता आहे. अनंत जन्मींचे पुण्य जोडलेले असेल तरच परमार्थ घडतो, मुख्य परमात्मा अनुभवास येतो. ज्याने परमार्थ ओळखला त्याचा जन्म सार्थक झाला. त्याच्याशिवाय जन्म म्हणजे कुलक्षय होण्यासाठी केलेले पापच! परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय जो संसाराचे कष्ट उपसतो त्या मूर्खाचे तोंड पाहूच नये. भल्या माणसांनी परमार्थ करून देहाचे सार्थक करावे आणि हरिभक्ती करून पूर्वजांचा उधार करावा हेच बरे!
इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, परमार्थस्तवन नाम नवम समास समाप्त.

दशक १ , समास १० नरदेहस्तवन 
हा नरदेह खरोखरच धन्य आहे. ज्या ज्या प्रकाराचा परमार्थ करावा तो तो नरदेहामुळे सिद्धीस जातो ही याची अपूर्वता आहे. या नरदेहाच्या प्राप्तीमुळे एकजण भक्ती करू लागला, एकजण विरक्त झाला, त्याने डोंगर-दऱ्या मध्ये वास्तव्य केले.  काहीजण तीर्थाटन करतात, काही पुरश्चरणे करतात, काही अखंड नामस्मरण करतात अशा विविधप्रकारे परमेश्वरावर निष्ठा व्यक्त करतात. काही तप करतात, काही योगाभ्यास करतात, काही अभ्यास करून वेद शास्त्रामध्ये व्युत्पन्न होतात.  कोणी हटयोग करतात, देहाला नाना त्रास देतात तर काही भाव बाळगून देवाला शरण जातात. एक महानुभाव म्हणून विख्यात आहेत, एक भक्त म्हणून ख्यातनाम आहेत, एक सिद्ध आहेत एक सिद्ध तर गगनामध्ये देखील विहार करतात.

एक तेजामध्ये मिसळून तेज झाले, एक पाण्यामध्ये विरघळून गेले तर एकजण वायूमध्ये अदृश्य झाले. एक अनेक रूपे धारण करतात, एक पाहताक्षणी निघून जातात,  काही बसल्याजागी असूनही ब भ्रमण करतात. विविध स्थाने, समुद्र पार करतात. एक हिंस्र श्वापदावर बसतात, एक अचेतन  भिंती वगैरे चालवतात. काही आपल्या तपोबलाने प्रेतातही प्राण आणतात, काही तेजाला देतील फिके करतात, काही पाणी आटवतात. काही जगातील वायु देखील थांबवतात. असे नाना सिद्धी प्राप्त झालेले हटनिग्रही लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत.

एक मनातील ओळखणारे, एक बोलले ते खरे करणारे, एक अल्पसिद्ध एक सर्व सिद्ध असे सर्व प्रकारचे सिद्ध प्रसिद्ध झालेले आहेत. एक नवविधा भक्तीच्या मार्गाने गेले ज्यांनी परलोकी गाऊन निजस्वार्थ साधला तर एक योगी गुप्त मार्गाने ब्रह्म भवनापर्यंत पोहोचले. एक वैकुंठास गेले, एक सत्य लोकी राहिले, एक कैलास पर्वतावर शिवरूप होऊन बसले, एक इंद्रलोकी जाऊन इंद्र झाले.  एक पितृलोकी मिळाले. एक नक्षत्र मंडळात जाऊन स्थिर झाले तर एक क्षीरसागरामध्ये विलीन झाले. सलोकता-समीपता-स्वरूपता-सायुज्यता या चार प्रकारच्या मुक्ती आपल्या स्वेच्छेने त्यांनी प्राप्त केल्या. असे सिद्ध साधुसंत अनेक झाले असून त्यांनी श्री स्वहित साधले आहे. नरदेह हा असा विख्यात असून त्याचे वर्णन काय करावे? (क्रमशः) 

निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.