दशक ७ समास तीन ब्रह्म वर्णन
जय जय रघुवीर समर्थ.अशाप्रकारे सर्व ब्रम्ह नाशवंत असल्याचे दिसते. वेगळेपणाची, निराळेपणाची भावना असते तिचा ऐक्यामध्ये नाश होत असतो. आता आपण ज्याचा विचार करावा ते सगळे मायेने निर्माण केलेले म्हणजे मिथ्या असते त्यामुळे तिथे चैतन्याच्या नावाने नाश आला. परिवाराशिवाय सत्ता असेल तर ती सत्ता नसते, त्यामुळे पदार्थ नसेल तर साक्षीभाव हा खोटा असतो. सगळ्या सगुण वस्तूना नाश आहे. प्रत्यक्षाला प्रमाण नाही. त्यामुळे सगुन ब्रह्म निश्चितपणे नाशवंत आहे. मात्र निर्गुण असे नाव आहे त्या नावाला कुठला आधार नाही. काही तरी गुण असतील तर गौरव केला जातो पण गुण नाहीत तर गौरव कसा येईल?
माया हे मृगजळ आहे असे सर्व सांगतात, कल्पनेचे आभाळ म्हणजे नसलेलेच! गावच नाही तर त्याला सीमा कोठून असायला? त्यामुळे जन्म दिल्याशवाय जीवात्मा म्हणजे आद्वैताला द्वैताची उपमा देणे होय. माया नसताना सत्ता, पदार्थ नसताना जाणणारा, अविद्या नसताना चैतन्य कुणाला मिळाले? सत्ता ही चैतन्याची साक्षी आहे. सर्व गुणांच्यापाशी निर्गुण आहेत, मुळातच निर्गुण त्याला गुण कसे चिकटणार? असे जे गुणरहित आहे, तिथे नावाची ओळख सांगितली जाते. तेच अशाश्वत आहे असे निश्चितपणे जाणावे. निर्गुण ब्रह्माला ओळखण्यासाठी अनेक नावे ठेवली ते वाच्यब्रह्म देखिल नाश होणारे आहे.
आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचा एक भाव आहे. आनंदाचा अनुभव घेतल्यावर आनंदमय तद्रूप झाल्यावर अनुभवाची वृत्ती वेगळी राहू शकत नाही. पूर्णऐक्यात त्रिपुटी नसते त्यामुळे अनिर्वाच्य या नावाने सांगणे देखील पुरेसे नाही, त्या शब्दाला निवृत्तीने उणेपण आणले आहे. अशी अनिर्वाच्य निवृत्ती तीच उन्मनी अवस्था. तीच योग्यांची निरूपाधिक विश्रांती. निरूपाधिक वस्तू म्हणजेच सहज समाधी. त्यामुळे भवदुःखाची आधीव्याधी तुटते. उपाधीचा अंत म्हणजेच सिद्धांत जाणावा. सिद्धांत आणि वेदांत म्हणजेच प्रत्यक्ष आत्मा. अशा तऱ्हेचे जे शाश्वत ब्रह्म आहे तिथे माया ब्रह्म नाही.
अनुभवी लोक त्याचे गुपित जाणतात. आपल्या अनुभवांनी कल्पना मोडून तोडून टाकाव्या मग अनुभव घ्यावा. निर्विकल्पाची कल्पना करावी, अशी कल्पना आपोआप मोडून पडते मग कल्पना करण्यात काय अर्थ? कल्पनेचे एक बरे असते, ती वळविताच वळते. मात्र स्वरुपास प्राप्त होताच निर्विकल्प होते. निर्विकल्पाची कल्पना केल्यास कल्पना उरत नाही. नि:संगास भेटायला गेल्यावर आपण निस्संग होऊन जातो. ब्रह्म हे पदार्थासारखे नव्हे जे हाती धरुन देता येईल. ते सद्गुरूकृपेने अनुभवावे लागते. पुढे कथेचा विस्तार करीत आहे त्यामुळे त्यामुळे केवळ ब्रह्म अनुभवाला येईल. येथे
इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

मोबाइल- ९४२०६९५१२७