भावार्थ दासबोध -भाग ९३

निरुपण : पद्माकर देशपांडे

0

दशक ७ समास ४ विमळब्रह्म निरूपण
जय जय रघुवीर समर्थ. ब्रम्ह नभाहून निर्मळ आहे तसेच ते पोकळ आहे, त्याचे अरूप विशाल आहे. त्याला कोणतीही मर्यादा नाही. एकवीस स्वर्ग, सप्तपाताळ हे सर्व मिळून एक ब्रह्मगोल होतो, अशी अनंत ब्रम्ह व्यापून आहेत. अनंत ब्रह्मांड खाली अनंत ब्रह्मांड वर तिथे अनुमात्र देखील रिकामे ठिकाण नाही. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी असं लोक म्हणतात त्याच्या ठिकाणी कमीपणा एकही नाही. जलचरांना जसं आत बाहेर पाणी असतं तसं सर्व जीवमात्रांना ब्रह्म आहे, मात्र पाण्याबाहेर देखील जग आहे. कोणत्याही जीवाला ब्रम्हाबाहेर जाता येत नाही, त्यामुळे पाण्याची उपमा ब्रह्माला कमी पडते.

पाण्याच्या बाहेर देखील जग आहे. आकाशाच्या बाहेर पुढे गेल्यावर ती पुढे आकाशच भेटते तसा ब्रह्माला अंत नाही. मात्र जे अखंड भेटले, सर्व अंगाला चिकटले, ते अत्यंत निकट आहे पण सगळ्यांपासून लांब आहे. त्यामध्येच आपण असतो पण आपल्याला माहिती होत नाही. उमजले असे वाटते पण तो भास असतो, समजत नाही त्याला परब्रह्म म्हणतात. आकाशामध्ये ढग असतात त्यामुळे आकाश हे हालचाल करतं असं वाटतं पण आकाश हे शांत असते. आकाशाकडे एका दृष्टीने पाहिले असता डोळ्यांना चक्रे दिसतात त्याप्रमाणे ज्ञानी माणसाला दृश्य मिथ्यारूप आहे. मिथ्या असले तरी त्याचा आभास आहे, निद्रिस्तास स्वप्न पडते आणि जागे झाल्यावर ती अपोआप ते स्वप्न असल्याचे लक्षात येते, त्याप्रमाणे आपल्या अनुभवाने ज्ञान जागृती आल्यावर मायेचा स्वभाव कळू लागतो. असे हे कोडे ब्रम्हांडा पलीकडे असून ते स्पष्ट करून सांगतो. ब्रम्ह ब्रम्हांडात कालवले, पदार्थांना व्यापून उरले,

सर्वांमध्ये अंशरूपाने विस्तारले आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासते, सृष्टीमध्ये ब्रह्म असते. अंशमात्र देखील अनुभव घेतल्यावर हा आभास असल्याचे जाणवते. अंशमात्र सृष्टीमध्ये राहून बाहेरील मर्यादा कोण जाणू शकेल? सगळे ब्रम्ह ब्रह्मांडाच्या उदरामध्ये कसे मावेल? तीर्थाची गिंडी असते तिच्यामध्ये सगळ आकाश साठवता येत नाही म्हणून त्याचा अंश असे म्हणतात. तसे ब्रम्ह सर्वांमध्ये कालवले आहे, पण ते हलवले जात नाही. सर्वांमध्ये ते गुप्त रूपाने वास करून आहे. पंचमहाभुतांमध्ये ते मिश्रित झाले असले तरी पंचभुताच्या पलिकडचे आहे. चिखलापासून आकाश अलिप्त असते तसे हे आहे. ब्रम्हाला दृष्टांत देता येत नाही, पण पण तसा दृष्टांत द्यायचा झाला तर आकाशाचा देता येईल.

खं ब्रम्ह असं वेदांमध्ये सांगितलं आहे, गगनासारखे सदृश्य असे ब्रह्म आहे, म्हणून तुम्हाला आकाशाचा दृष्टांत देतो. काळेपणा नसलेले पितळ म्हणजे सोने, शून्यात्व असलेले निव्वळ आकाश म्हणजे ब्रह्म. म्हणून म्हणून ब्रम्ह आकाशासारखे आणि माया वाऱ्यासारखी. दोन्हीतही अनुभव येतो पण दिसत नाही. शब्द सृष्टीची रचना क्षणोक्षणी होत जात असते परंतु तू वायूप्रमाणे ती एका ठिकाणी स्थिरावत नाही अशी ही माया माईक आहे. ब्रह्म हे शाश्वत आहे,

एकमेव आणि पाहिलं तर ते सर्व व्यापून आहे. पृथ्वीला भेदून जाणारे आहे ब्रह्म, मात्र ते कठीण नाही. त्याच्या मृदुपणाला दुसरी उपमा देता येत नाही. पृथ्वीपेक्षा सूक्ष्म पाणी आहे, पाण्यापेक्षा सूक्ष्म अग्नी आहे, अग्निपेक्षा कोमल वायू जाणावा. वायुपेक्षा गगन अत्यंत मृदू आहे. गगना पेक्षाही मृदू ब्रह्म जाणावे. वज्राला भेदून जाणारे तरी त्याचे मृदुपणा गेलं नाही, म्हणून कठीणही नाही आणि मृदुही नाही अशी कोणतीही उपमा त्याला देता येत नाही. अशा तर्‍हेने ब्रह्माचे वर्णन समर्थ रामदास स्वामी महाराज करीत आहेत. पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात. जय जय रघुवीर समर्थ.(क्रमशः)
निरुपण : पद्माकर देशपांडे

Padmakar Deshpande
पद्माकर देशपांडे
मोबाइल- ९४२०६९५१२७

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!