मुंबई – आज ‘मराठी राजभाषा गौरव दिना दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी घोषणा केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी महापालिकेच्या निवडणुकींच्या दृष्टीने अमित ठाकरे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी व तरुणांना आकर्षित करण्यासाठी आता या विभागाचं नेतृत्व अमित ठाकरे यांच्याकडे दिलं जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर आज मराठी भाषा गौरव दिनी त्यांच्यावर पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
अमित ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून राजकारण विशेष सक्रिय दिसत आहेत. मनसेच्या मुंबई, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये, सभांमध्ये ते उपस्थिती दिसत होते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात अमित ठाकरे यांनी डॉक्टर, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांकडे सरकारचे पत्राद्वारे लक्ष वेधलं होतं. नव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले अमित ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्याबद्दल मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड कुतुहल आहे.अशातच आता अमित ठाकरे यांची मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता अमित ठाकरेंच्या माध्यमातून तरुण कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केलं जाणार आहे.