बिग बॉस मराठी : लोकप्रियतेच्या शिखरावरून समाधानाच्या तळाकडे?

सिझन ६ एक आत्मपरीक्षण:लोकप्रियतेच्या शिखरावरून आशयाच्या शोधात…!

0

अभय ओझरकर

(Bigg Boss Marathi) मराठी माणूस मनोरंजनाचा रसिक आहे. नाटक, सिनेमा, मालिका, संगीत, विनोद यामध्ये त्याची अभिरुची खोलवर रुजलेली आहे. त्यातच वास्तववादी, मानवी भावना उलगडणारे कार्यक्रम आले, की मराठी प्रेक्षक त्याला मनापासून स्वीकारतो. याच परंपरेतून ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाने मराठी घराघरात आपले स्थान निर्माण केले.

हिंदी बिग बॉस आधीपासूनच प्रचंड लोकप्रिय होता. देशभरातील असंख्य प्रेक्षक तो नियमित पाहत होते. पण जेव्हा बिग बॉस मराठीचा पहिला सिझन आला, तेव्हा मराठी माणसाला आपल्याच मातीतली, आपल्याच भाषेत बोलणारी, आपल्यासारखीच हसणारी, रागावणारी आणि चुका करणारी माणसं पाहायला मिळाली. पडद्यावरून परिचित असलेली ही व्यक्तिमत्त्वे, या शोच्या निमित्ताने अधिक जवळून अनुभवता आली.

रोज रात्री एक तास का होईना, पण आपल्या आवडत्या कलाकाराचं खऱ्या आयुष्यातलं वागणं, त्याचे स्वभाव, त्याची सहनशीलता, त्याचा राग, त्याची माणुसकी पाहताना प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद मिळत होता. म्हणूनच बिग बॉस मराठी हा केवळ एक रिअ‍ॅलिटी शो न राहता, तो मानवी स्वभावांचा आरसा बनला.

महेश मांजरेकर : बिग बॉसचा बुलंद आवाज (Bigg Boss Marathi)

बिग बॉस मराठीच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा कुणाचा असेल, तर तो म्हणजे महेश मांजरेकर. त्यांचा दमदार आवाज, स्पष्ट भूमिका, चुकीवर थेट बोट ठेवण्याची शैली आणि योग्य वेळी केलेले कौतुक – यामुळे बिग बॉसला एक वेगळी उंची मिळाली.

त्यांची रागवण्याची पद्धतही प्रेक्षकांना आवडत होती, कारण त्यामागे शिस्त, जबाबदारी आणि खेळाचा सन्मान होता. काही सिझननंतर वैयक्तिक कारणांमुळे ते या प्रक्रियेतून बाहेर पडले, पण त्यांनी घालून दिलेला मापदंड आजही प्रेक्षकांच्या मनात ठाम आहे.

बिग बॉस : केवळ खेळ नाही, तर मानसिक कसोटी

बिग बॉस हा साधा गेम शो नाही. बाहेरच्या जगापासून जवळपास १०० दिवस दूर राहून, एकाच छताखाली, भिन्न स्वभाव, भिन्न विचारधारा आणि भिन्न पार्श्वभूमीच्या लोकांसोबत राहणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. येथे संयम, सहनशीलता, आत्मभान आणि खेळाची समज या सगळ्यांची कसोटी लागते.

हे मान्य करावेच लागेल की बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर अनेक स्पर्धकांचे आयुष्य बदलले आहे. काहींना नव्या संधी मिळाल्या, काहींची ओळख वाढली, तर काहींनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर नव्याने विचार करायला सुरुवात केली.

रितेश देशमुख : संयमित, समजूतदार आणि आपला भाऊ (Bigg Boss Marathi)

महेश मांजरेकर यांच्यानंतर बिग बॉसची सूत्रे कोण सांभाळणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला होता. आणि तेव्हा रितेश देशमुख या ‘चॉकलेट हिरो’च्या रूपाने बिग बॉसला एक समजूतदार, आपला, घरचा भाऊ मिळाला.

रितेशने हा शो केवळ सूत्रसंचालन म्हणून नाही, तर जबाबदारीने आणि समतोलपणे हाताळला. मागील सिझन आणि सध्याचा सिझन दोन्ही त्याने समर्थपणे पेलले. योग्य वेळी समज देणे, योग्य वेळी कठोर होणे आणि तरीही मानवी संवेदना जपणे – हे कौशल्य त्याच्याकडे आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना निश्चितच त्याचा अभिमान वाटतो.

बिग बॉस मराठी सिझन ६ : अपेक्षा आणि वास्तव

आता वळूया बिग बॉस मराठी सिझन ६ कडे. एक म्हण आहे – “जर आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?” या म्हणीचा प्रत्यय या सिझनमध्ये अनेकदा येतो.

काही अपवाद वगळता, एकंदर सिझनमध्ये आशयाची कमतरता जाणवते. मागील सिझनच्या तुलनेत या सिझनमध्ये नियमांचे उल्लंघन, झोपाळूपणा, धमकीवजा भाषा, जबाबदारीचा अभाव हे प्रकार वारंवार घडताना दिसतात. त्यामुळे हा सिझन ‘सिक्स’ असला, तरी बाउंड्रीवर कॅच घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक स्पर्धक केवळ खेळ खेळण्यासाठी नव्हे, तर जणू सहलीला आल्यासारखे वागताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात दिसणारा खेळ यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.

कॅमेऱ्यासाठी स्पर्धा, आशयासाठी नाही

या सिझनमध्ये एक ठळक बाब जाणवते ती म्हणजे – कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी काहीही करण्याची मानसिकता. विषयाशी संबंध नसतानाही हस्तक्षेप करणे, उगाच वाद निर्माण करणे, चर्चा स्वतःभोवती फिरवण्याचा प्रयत्न – हे प्रकार वाढलेले दिसतात.

परिणामी, ‘कन्टेन्ट’ कमी आणि ‘गोंधळ’ जास्त अशी अवस्था झाली आहे. म्हणूनच अनेक प्रेक्षकांच्या मनात “नो कन्टेन्ट, नो एंटरटेनमेंट” अशी भावना निर्माण होत आहे. हे शोसाठी निश्चितच धोक्याचं लक्षण आहे.

वैयक्तिक टीका नाही, पण प्रेक्षकांची निराशा खरी

या लेखाचा उद्देश कोणत्याही स्पर्धकावर वैयक्तिक टीका करणे हा नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, हेही मान्य आहे. मात्र, एकंदर सिझन पाहता प्रेक्षकांची निराशा वाढत असल्याचा सूर स्पष्टपणे जाणवतो आहे.

बिग बॉस मराठी यशस्वी करण्यासाठी मेकर्स, चॅनल आणि हजारो लोक प्रचंड मेहनत घेत असतात, याबद्दल वादच नाही. पण जर प्रेक्षकांच्या मनात “मजा येत नाही” अशी भावना तयार झाली, तर त्याला दुर्लक्ष करता येणार नाही.

प्रेक्षकांचे मतच अंतिम

या शोचा फॉरमॅटच असा आहे की कोण घरात राहणार आणि कोण बाहेर जाणार, हे प्रेक्षकांच्या मतदानावर ठरते. त्यामुळे प्रेक्षकांचा विश्वास, त्यांचा सहभाग आणि त्यांची उत्सुकता टिकवून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सिझन ६ चा विचार करता, अनेक प्रेक्षकांच्या माथी निराशाच येते आहे, असे जाणवते. त्यामुळे आता काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. गरज नसलेल्या, आशय न देणाऱ्या स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवून, नव्या आणि दमदार वाईल्डकार्ड एन्ट्री केल्या, तर सिझनला नवी उर्जा मिळू शकते.

नाहीतर पुढचा सिझन धोक्यात?

जर हा सिझन अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही, तर पुढील सिझनबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. प्रेक्षक अशी अपेक्षा व्यक्त करत असतील, तर ती चुकीची म्हणता येणार नाही.

दर आठवड्याला ‘भाऊंचा धक्का’ जोरदार असतो, पण जर गाडीचं इंजिन गंजलेलं असेल, तर कितीही धक्के दिले तरी गाडी पुढे जाणार नाही. मनमानी कारभार, कॅप्टनचे न ऐकणे, धमक्या, अशोभनीय भाषा – या सगळ्यांमुळे सिझनचा दर्जा घसरतो आहे, अशी चर्चा रसिकांमध्ये सुरू आहे.

शेवटचा शब्द : आशय परत आणा!

या लेखाचा हेतू फक्त एकच आहे – मनोरंजन परत यावं, बिग बॉस मराठी पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर जावा. टीका नव्हे, तर सकारात्मक बदलाची अपेक्षा आहे.

मेकर्स आणि चॅनल प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, याबद्दल शंका नाही. पण पुन्हा एकदा तेच म्हणावंसं वाटतं – “जर आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?”

योग्य निर्णय, दमदार स्पर्धक आणि आशयपूर्ण खेळ यामुळेच बिग बॉस मराठीचा सिझन ६ खऱ्या अर्थाने ‘सिक्स’ ठरेल, हीच अपेक्षा.

English SEO Safe Tags

#

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!