
अभय ओझरकर
(Bloodless rule and bloody peace) तो अचानक खूप दिवसांनी भेटला. चेहऱ्यावर ओळखीचं हसू होतं, पण डोळ्यांत काहीतरी वेगळंच—जणू दूर कुठेतरी पाहून आलेल्या माणसाची खोल, थकलेली शांतता. ती शांतता भीतीची नव्हती, तर अनुभवाची होती. अनुभव असा, जो शब्दांपेक्षा जास्त बोलका असतो.
आम्ही दोघे जुन्या कट्ट्यावर बसलो. तोच कट्टा—जिथे कधी स्वप्नं रचली जात, कधी राग ओकला जात, कधी व्यवस्था बदलण्याच्या घोषणा दिल्या जात. हातात वाफाळता चहाचा कप घेताच गप्पांना सुरुवात झाली. नेहमीची चौकशी, घरदार, ओळखी… आणि मग तो थेट मुद्द्यावर आला.
“नुकताच आलोय,” तो म्हणाला,
“बिनरक्ताच्या माणसांच्या देशातून.”
मी हसलो.
“काय भन्नाट कल्पना आहे ही?”
तो मात्र अजिबात हसला नाही.
“कल्पना नाही,” तो म्हणाला, “अनुभव आहे.”
तो सांगू लागला.
त्या देशात माणसांना रक्तगट नसतात. A, B, O काहीच नाही. कारण तिथे रक्तालाच हद्दपार केलं आहे. रक्त म्हणजे वेदना, संवेदना, प्रश्न, चीड, अस्वस्थता—आणि ती सगळी तिथे अनावश्यक मानली जाते.
लोकसेवेच्या नावाखाली तिथे लोक आपली शरीरं बदलतात. कागदोपत्री ती सेवा असते, प्रत्यक्षात तो एक प्रचंड धंदा आहे. जसं आपल्या कडे पर्यटन उद्योग बनलाय, तसं तिथे “शरीरबदल उद्योग” फोफावलेला आहे.
त्या देशात लोकशाही आहे.
निवडणुका होतात.
जाहीरनामे येतात.
भाषणं होतात.
पण कायदा इतका “स्टाँग” आहे की आवाज उठवायची गरजच उरत नाही—किंवा उठवता येत नाही. कुणी प्रश्न विचारला, तर लगेच चौकशी सुरू होते. एक नाही, अनेक संस्था. वेगवेगळी नावं. वेगवेगळे फॉर्म. वेगवेगळे नियम.
हळूहळू प्रश्न विचारणाऱ्याला समजतं—
प्रश्न विचारणं हेच तिथे गुन्हा आहे.
मी मध्येच विचारलं,
“मग बिनरक्ताचा माणूस म्हणजे जिवंत असूनही निष्क्रिय असलेला का?”
तो हलकंसं हसला.
“नाही,” तो म्हणाला, “तो जिवंत असतो. पण निवडलेला.”
त्या देशात शरीर बदलण्याची एक अधिकृत प्रक्रिया आहे. ती अतिशय खर्चिक आहे. आधी शरीरातून रक्त काढलं जातं. आणि त्या रक्तासोबत नुसतं हिमोग्लोबिन नाही—तर नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, सहानुभूती, प्रश्न विचारण्याची सवय… सगळं काढून टाकलं जातं.
मग शरीरात एक पारदर्शक द्रव भरला जातो. दिसायला पाण्यासारखा. पण त्या द्रवात एक विलक्षण गुणधर्म असतो—आदेश पचवण्याची अमर्याद क्षमता.
ज्याचं शरीर बदललं जातं, तो बिनरक्ताचा माणूस बनतो.
त्याला त्रास होत नाही.
त्याला अपराधबोध होत नाही.
त्याला लाज वाटत नाही.
तो सगळ्यांवर राज्य करतो—कारण तो हलका असतो.
वजन नसलेला.
मूल्यांचा भार नसलेला.
“मग उरलेले?” मी विचारलं.
“ते रक्ताचे माणूस,” तो म्हणाला.
“तिथे फक्त दोनच प्रकार आहेत—रक्ताचे आणि बिनरक्ताचे.”
रक्ताचे माणूस अजून माणूस असतात. त्यांना वेदना होतात, अन्याय जाणवतो, राग येतो, प्रश्न पडतात. पण ह्याच गोष्टी त्यांची अडचण ठरतात. कारण शरीर बदलायला पैसा लागत नाही—पण रक्त असलेलं शरीर बदलणं फार महाग पडतं.
म्हणून बहुतेक लोक रक्ताचेच राहतात.
आणि तेच सेवा करतात.
तो सांगत होता—त्या देशात मंत्री आपली घरं बदलतात. सोयीप्रमाणे. कधी समुद्राकाठी, कधी डोंगरात. बिनरक्ताचा माणूस असल्यामुळे घर बदलणं त्यांच्यासाठी स्थलांतर नसतं, फक्त “अपडेट” असतं.
पण रक्ताच्या माणसांचं घर कायमचं असतं—
एकाच जागी,
एकाच भिंतीत,
एकाच चौकटीत.
“आणि आवाज उठवला तर?” मी विचारलं.
तो शांतपणे म्हणाला,
“मग तपास. वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक. शेवटी एकच पर्याय सुचवला जातो—शरीर बदला. शांत व्हा.”
गप्पा मात्र संपल्या नाहीत.
तो अचानक थांबला आणि म्हणाला,
“आपल्याकडे वेगळं आहे असं वाटतं तुला?”
मी काही बोलायच्या आत तोच पुढे म्हणाला,
“आपल्या कडेही सुजलाम-सुफलाम घरं आहेत. मोठी, झगमगती. आणि त्या घरांत हळूहळू बिनरक्ताची माणसं प्रवेश करत आहेत.”
तो म्हणाला,
“पूर्वीपासून त्या घरात राहणारे रक्ताचे माणूस आता फक्त सेवा करतात. कारण त्यांच्या शरीरातलं रक्त अजून आहे, पण ते बदललेलं आहे. ते रक्त आता बोलत नाही. ते फक्त वाहतं.”
इथेही लोकसेवेच्या नावाखाली पदं मिळतात.
इथेही कायदे आहेत.
इथेही चौकशा आहेत.
फरक एवढाच—
इथे शरीर प्रत्यक्ष बदलत नाही.
आतून बदलतं.
इथे रक्त काढायला मशीन लागत नाही.
सवयी पुरतात.
हळूहळू माणूस शिकतो—गप्प राहायला.
“म्हणजे आपणही त्या देशातच आहोत?” मी विचारलं.
तो उठला.
निघताना म्हणाला,
“देश वेगळा आहे असं वाटतं. पण पद्धत ओळखीची आहे.”
तो गेला.
कट्ट्यावर मी एकटाच उरलो. आजूबाजूला माणसं होती—कोणी रक्ताची, कोणी बिनरक्ताची. ओळखणं अवघड होतं. कारण काही रक्ताचे माणूसही आता इतके शांत झाले होते की बिनरक्तांसारखेच दिसत होते.
त्या क्षणी मला जाणवलं—
बिनरक्तांचं राज्य दूर कुठे नाही.
ते हळूहळू आपल्या घरात,
आपल्या अंगणात,
आपल्या शरीरात उतरू पाहत आहे.
आणि प्रश्न फक्त एकच उरतो—
आपण शरीर बदलणार…
की रक्त टिकवणार?
(Bloodless rule and bloody peace)

