पुनर्निर्मिती आणि सिक्वेलच्या प्रदेशात …..नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या मनोरंजनाच्या माध्यमातील लेखकांची आणि पर्यायाने विषयांची कमतरता सध्या प्रकर्षाने जाणवायला लागली आहे.
खरंतर ही चणचण केवळ नाटक आणि चित्रपट याच माध्यमांच्या बाबतीत अधिक जाणवते. कारण मालिकांच्या कथानकाला वेगवेगळी वळणे घेत जाण्याची परंपरा लाभली आहे. उत्तम कंटेंट आणि सेलेब्लीटी या स्तंभावर ही माध्यमे व्यावसायिकरित्या यशस्वी ठरतात. सध्याच्या व्यावसायिक रंगभूमीवर उत्तम नाटककारांची उणीव असल्याने जुन्या नाटकांची पुनर्निर्मिती किंवा यशस्वी नाटकांचा दुसरा भाग, म्हणजेच सिक्वेलची सध्या चालती आहे. गत दहा वर्षात ‘प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी’ या टीमने नवीन विषयापेक्षाही जुन्याच नाटकात नवीन संचात सादर करून व्यावसायिक रंगभूमी जिवंत ठेवली आहे. महेश एलकुंजवार या नाटककाराच्या ‘विदर्भातील देशपांडे खानदानाला’ तिनही नाटकांना अनेकदा सादर करून ‘चंद्रकांत कुलकर्णी’ याने यशस्विता साध्य केली आहे. तद्वतच ‘यु टर्न’ या नाटकाचा सिक्वेलही उत्तम प्रतिसाद मिळवून गेला. कदाचित या नाटकांच्या प्रसिद्धीचा पुरेपूर लाभ उठवण्यातच व्यावसायिक नाटक मंडळी धन्यता मानत असतील, किंवा नवीन विषयांची वानवा प्रकर्षाने जाणवत असेल.
सेलेब्लीटी हाच एकमेव मुद्दा लक्षात घेता मराठी नाटकांनी बॉलीवूडचा कित्ता गिरवला असावा. एखादा चित्रपट, नाटक किंवा वेब सिरीज याला प्रसिद्धी मिळाली की एकतर त्यातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात रहाते किंवा संकल्पना, याचा अभ्यास करून निर्माते आपला धंदा करून घेतात. हॉलीवूड मधील बॉंड, इथन यांच्या धर्तीवर बॉलीवूड मधील डॉन, टायगर, या भूमिकांना प्रेक्षकांनी अमाप प्रसिद्धी दिल्याची नोंद आहे. बेबी आणि नाम शबाना या संकल्पना यशस्वी करण्यात निर्मात्यांना यश आले आहे.
सन २००१ मध्ये अनिल शर्माने गदर या चित्रपटाच्या माध्यमातून ‘तारा सिंग आणि सकीना’ यांची प्रेम कहाणी प्रचंड यशस्वी ठरली आणि या चित्रपटाने धंदाही खूप केला. खरं तर या चित्रपटाच्या समोर आशितोष गोवारीकरचा ‘लगान’ हा महात्वाकांशी चित्रपट स्पर्धेत होता तरीही गदरच्या प्रसिद्धीत आणि कमाईत तसूभरही फरक पडला नाही. आता २० बावीस वर्षांनंतर अनिल शर्मा यांनी गदर – २ मैदानात आणला आणि पुन्हा या चित्रपटाला भरघोस यश लाभले. यामध्ये १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी होती. तारा सिंग आणि सकीनाची भूमिका साकारणारे सनी देओल आणि अमिषा पटेल गदार २ मध्येही याच भूमिकांमध्ये आहेत, हे विशेष! सनी देओल सध्या सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे तरीही या चित्रपटाला लाभलेलं यश म्हणजे या भूमिकेला लाभलेली समाजमान्यताच आहे. तद्वतच ‘ओह माय गॉड ‘ चित्रपटातील नैसर्गिक आपत्तीने रस्त्यावर आलेला ‘कांती भाई’ प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात आहे. या भूमिकेची प्रसिद्धी लक्षात घेऊन ‘नास्तिक ते आस्तिक’ हा कांतीभाईचा प्रवास ‘ओएमजी २’ या चित्रपटात दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दाखवला आहे. २०१२ सालीच्या त चित्रपटात ‘अक्षय कुमार आणि परेश रावल’ यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. परेश रावलचा कांतिभाई हुशार होता आणि जाणीवपूर्वक त्याने कोर्टात इन्श्युरन्स कंपनी आणि मंदिराच्या माध्यमातून देवांचा धंदा करणाऱ्या दलालांना खेचले होते. ‘ओएमजी २’ या चित्रपटात अक्षय कुमार सोबत भोळा कांती भाई म्हणून पंकज त्रिपाठीची निवड केली आहे. जन्मताच भोला-भाला चेहरा लाभलेला हा कांती भाई भोलेनाथच्या गायडन्सखाली कोर्टात दाखल होतो आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देतो.
सिक्वेलपटची एकुणात यशस्विता लक्षात घेऊन ‘सलमान खान – टायगर ३’, सोबत पाहुण्याच्या भूमिकेत शाहरुख खान असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०१९ मध्ये ‘ड्रीमगर्ल’ या चित्रपटात आयुषमान खुरानाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून यामध्ये त्याच्या सोबत अनन्या पांडे दिसणार आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिध्वानी या द्वयींची निर्मिती असेलला फुकरे या चित्रपटाचा तिसरा भाग येऊ घातला आहे. रोहित शेट्टीचा सिंघम ३ आणि आशिकी ३ या चित्रपटाची झालेली घोषणा पुरेशी बोलकी असून नवीन विषयांची वानवा यामुळे सिद्ध होते. याच चालीत वेबसिरीजच्या राज्यात ‘फॅमिली मॅन’, स्पेशल ऑप्स’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘आर्या’ अशी अनेक वेबसिरीजच्या निर्मितीने वरील विषयाला अधिकाधिक मजबूत केले आहे.
एनसी देशपांडे
मोबाईल -9403499654