वडोदरा, ९ जुलै २०२५ : Bridge Collapse Gujarat News गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मोठा अपघात बुधवारी घडला. वडोदरा जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या मही नदीवरचा एक जुना पुल अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी आहेत. दुर्घटना घडताच स्थानिक प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, आणि इतर आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून राहत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
४० वर्ष जुना पुल कोसळला (Bridge Collapse Gujarat News)
या पुलाचा वापर मागील अनेक दशकांपासून होत होता. १९८५ मध्ये बांधलेला हा पुल जवळपास ४० वर्ष जुना होता, आणि यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. बीबीसी गुजरातीच्या वृत्तानुसार, पुलाचा मध्यभाग अचानक तुटून कोसळला, ज्यामुळे अनेक वाहने थेट नदीत कोसळली.
कोणती वाहने नदीत कोसळली?
वडोदरा जिल्हाधिकारी अनिल धामेलिया यांनी सांगितले की, “या अपघातात दोन ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक इको कार आणि एक ऑटो रिक्षा नदीत कोसळले आहेत.” यातून बरेच लोक नदीत अडकले होते. ९ मृतदेह सध्या पर्यंत बाहेर काढण्यात आले असून ६ जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एनडीआरएफची टीम, पोलीस आणि प्रशासन यांचे संयुक्त बचाव कार्य सकाळपासून सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाची प्रतिक्रिया
कलेक्टर अनिल धामेलिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “घटनास्थळी सकाळीच बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक पथके काम करत आहेत. बरेच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, आणि जखमींवर उपचार सुरू आहेत.”
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली दुःखाची भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर एक्स (पूर्वी ट्विटर) वर दुःख व्यक्त करत लिहिले:
“गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात पुल कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या शोकसंवेदना आहेत.”
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (PMNRF) अंतर्गत मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत आणि जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
सरकारने दिली तपासाची आदेश
गुजरात सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, “घटनेच्या तपासासाठी आदेश दिले गेले आहेत. या पुलाची काही वेळा दुरुस्ती झाली होती. मुख्यमंत्री स्तरावर २१२ कोटी रुपयांच्या नव्या पुलासाठी मंजुरी देखील मिळालेली होती, आणि त्यासाठी टेंडर आणि डिझाईन प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्या आधीच हा अपघात घडला.**”
#WATCH | Vadodara, Gujarat | The Gambhira bridge on the Mahisagar river, connecting Vadodara and Anand, collapses in Padra; local administration present at the spot. pic.twitter.com/7JlI2PQJJk
— ANI (@ANI) July 9, 2025
स्थानिक जनतेचा रोष आणि राजकीय प्रतिक्रिया
या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक जणांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. गुजरात काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, “जर हा पुल धोकादायक होता, तर सरकारने तो वापरातून वगळला का नाही? अशी घटनाच सरकारच्या हलगर्जी कारभाराचे उदाहरण आहे.”
आम आदमी पक्षाचे नेता इसुदान गढवी यांनीही सरकारवर निशाणा साधला. “हा अपघात नैसर्गिक नाही, तर मानव निर्मित आहे. जर पुल धोकादायक होता, तर वाहतूक का चालू ठेवली गेली? सरकारवर लोकांनी विश्वास ठेवायचा तरी कसा?”
#WATCH | Vadodara (Gujarat) bridge collapse | Latest death toll stands at 9, at least 6 injured. Rescue operation underway.
Vadodara Collector Anil Dhameliya says, “…Rescue operation started this morning. Local swimmers, boats and team of Municipal Corporation reached the… pic.twitter.com/0UAxB9hUog
— ANI (@ANI) July 9, 2025
आणंद कलेक्टर आणि विभागीय अधिकाऱ्यांचे म्हणणे
या पुलामुळे आणंद, पादरा, वडोदरा आणि भरूच जिल्हे एकमेकांशी जोडले जात होते. आणंद कलेक्टर प्रवीण चौधरी यांनी सांगितले की, “बचाव कार्य वडोदरा प्रशासनाच्या हातात आहे. आम्ही वाहतूक थांबवली आहे, कारण ही घटना वडोदरा हद्दीत घडली आहे.”
गुजरात सरकारच्या सडक व भवन विभागाचे सचिव पी.आर. पटेलिया यांनी सांगितले की, “पुलाचा काही भाग सकाळी कोसळल्याची माहिती मिळाली आहे. एक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. पुलाची तपासणी, दुरुस्ती, आणि इतर सर्व बाबींचा तपशील सखोल तपासणीनंतरच मिळणार आहे.”
घटनास्थळी स्थिती
घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये एक ट्रक पुलाच्या तुटलेल्या भागाजवळ लटकलेला दिसतो. काही वाहने नदीत पूर्णपणे बुडालेली दिसत आहेत. आरोग्य कर्मचारी जखमींना बाहेर काढून अँब्युलन्समध्ये हलवत आहेत.मही नदीवरील हा पुल गेल्या अनेक वर्षांपासून वापरात होता, पण त्याची स्थिती गंभीर होती हे आता उघड झाले आहे. या घटनेमुळे पुलांच्या नियमित तपासणीबाबत, देखभाल-दुरुस्तीबाबत सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.