नाशिकमधुन हनुमान चालिसा स्तोत्र निघाले सिंगापूरला
सुलेखनकार पूजा निलेश यांनी लिहिले ५ बाय १० फूट कॅनव्हास वर हनुमान चालिसा स्तोत्राचे हस्तलिखित...
नाशिक,दि,११ फेब्रुवारी २०२३ –आजच्या संगणकीय युगात जिथे छापील चित्र किंवा वाॅलपेपर्स आणि तयार अथवा रेडीमेड स्टिकर्स भिंतीवर सुशोभीकरणासाठी वापरले जातात तिथे नाशिक च्या सुलेखनकार पूजा निलेश यांनी १०’ × ५’साईजच्या कॅनव्हासवर हनुमान चालिसा लिहिले आहे. यासाठी त्यांनी अॅक्रिलिक कलर्स आणि ब्रश याचा वापर केला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी त्यांना ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागला आहे.हे हस्तलिखित नाशिक नगरी हुन थेट सिंगापुर स्थित श्री राजेश राव यांच्या घरी विराजमान होणार आहे.सध्या हस्तलिखित स्वरुपात लिहिलेल्या गोष्टींचे प्रमाण भिंतीवर लावण्याचा ट्रेंड सुरू आहे.
पूजा निलेश यांनी याआधी मांजरपाटावर अश्या प्रकारे मारुती स्तोत्राचे सुलेखन केले आहे आणि ते त्रिपुरा – अगरताला येथे श्री. मुरारी बापू यांच्या कार्यक्रमात त्यांना भेट देण्यात आले होते. ते पाहून त्यांना सिंगापुरहून अशाच प्रकारे आम्हाला हनुमान चालीसा हस्तलिखित स्वरुपात लिहिण्यासाठी विचारले आणि ही अप्रतिम कलाकृती निर्माण झाली आहे. इतर कुठल्याही माध्यमापेक्षा कापडावर ब्रशच्या सहाय्याने लिहिणे फार अवघड काम असते. पण आपण जे काम स्वतःच्या हाताने करतो त्याची अनुभूती काही औरच असते, असा त्यांचा अनुभव आहे. जगभरात सगळीकडे अयोध्या मंदिर आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहोळ्याचे वातावरण असताना श्री रामाचे सच्चे भक्त श्री हनुमान यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले याचा पूजा निलेश यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. या संपूर्ण कार्यात त्यांना त्यांचे पती सुलेखनकार व वास्तुविशारद निलेश गायधनी व नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री केशव कासार यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे.