मुंबई – गेल्या काही दिवसात देशात उन्हाचा तडाखा वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे. देशात एकीकडे तापमान वाढत असतांना महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत.काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दोन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता असतानाच आता दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात असानी चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने त्याचा परिणाम वातावरणावर होत असल्याचे चित्र दिसत आहे.
असानी चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला कोणताही धोका नाही. मंगळवारी हे ‘असानी’ चक्रीवादळ बांगलादेश- उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. एकीकडे भारतीय समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाली असताना महाराष्ट्रात मात्र संमिश्र हवामान निर्माण झालं आहे. पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर आज दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.