Chandrayaan 3:चांद्रयान-३ चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश
चंद्राच्या कक्षेत पोहचल्या नंतर चांद्रयान-३ ने काय दिला संदेश
श्रीहरीकोटा,दि.६ ऑगस्ट २०२३ – भारताची तिसरी चंद्र मोहीम ‘चांद्रयान-3’ने शनिवारी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी २२ दिवसांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आले होते, जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने (ISRO) चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आल्याचा आनंद ट्विटरवर शेअर केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार,चांद्रयान-3 ने इस्रोला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत असल्याचा संदेश पाठवला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, चंद्राच्या कक्षेत पोहोचणारे अंतराळयान ६०० कोटी रुपयांच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी एक मैलाचा दगड आहे. १४ जुलै रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने उड्डाण केल्यापासून,अंतराळ यानाने चंद्राच्या सुमारे दोन तृतीयांश अंतर कापले आहे. या मोहिमेसाठी आणि इस्रोसाठी पुढील १८ दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
चांद्रयान-३ वरून मिळालेला संदेश इस्रोने शेअर केला आहे. त्यावर लिहिले होते, “MOX, ISTRAC, हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत आहे.” विशेष म्हणजे, मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX), ISTRAC (ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क), बेंगळुरू यांनी चांद्रयान-3 ला चंद्राच्या कक्षेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Chandrayaan-3 Mission:
“MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity 🌖”
🙂Chandrayaan-3 has been successfully inserted into the lunar orbit.
A retro-burning at the Perilune was commanded from the Mission Operations Complex (MOX), ISTRAC, Bengaluru.
The next… pic.twitter.com/6T5acwiEGb
— ISRO (@isro) August 5, 2023
इस्रोने सांगितले की, पुढचे महत्त्वाचे काम रविवारी रात्री ११ वाजता केले जाईल, जेव्हा चांद्रयान-३ ची कक्षा कमी केली जाईल. यानंतर, १७ ऑगस्टपर्यंत आणखी ३ मोहिमा पूर्ण होतील, त्यानंतर प्रज्ञान रोव्हरसह लँडिंग मॉड्यूल ‘विक्रम’ अंतराळ यानाच्या ‘प्रोपल्शन मॉड्यूल’पासून वेगळे होईल. त्यानंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाईल.
यापूर्वी, १ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेकडे पाठवले होते. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर,चांद्रयान-3चे सॉफ्ट लँडिंग २३ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता करण्याचे नियोजित आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर यशस्वीरित्या उतरणे आणि तेथे चालण्याची क्षमता सिद्ध करणे हा आहे. आतापर्यंत अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीन हे तीन देश चंद्रावर आपली मोहीम उतरवण्यात यशस्वी झाले आहेत.