श्रीहरिकोटा,दि. १४ जुलै २०२३ – संपूर्ण देशा बरोबर जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 मोहिमेचे शुक्रवारी दुपारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान 3 अवकाशात झेपावल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष साजरा केला. आता फक्त उत्सुकता लागली आहे ती चांद्रयानाच्या चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगची. हे चांद्रयान २४ ऑगस्टपर्यंत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने ही महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. ६१५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. अवकाशात झेपावल्यानंतर हे यान सुरूवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. काही काळानंतर पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि चंद्राच्या कक्षेत पोहचेल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्या जातील. २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान चंद्रावर अलगद उतरेल. त्यानंतर लँडरमधून रोव्हर चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. हा रोव्हर मार्फत चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाईल.
…तर भारत चौथा देश ठरेल
इस्त्रोची चंद्रावर स्वारी ही महत्वकांक्षी मोहीम आहे. भारता बरोबर जगाचे लक्ष चांद्रयान-3 कडे असणार आहे. कारण 2019 मध्ये चांद्रयान-2 ही मोहीम अयश???्वी झाली होती. त्यावेळी चंद्रावर उतरताना लँडर चंद्राच्या जमिनीवर आदळून तुकडे झाले होते.
भारतीय अंतराळ इतिहासातील सोनेरी दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 मोहिमेचे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक नवीन अध्याय असल्याचे म्हटले आहे.ते म्हणाले की ते प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि आकांक्षा वाढवणार आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांच्या समर्पणाचे कौतुक केले. त्यांच्या आत्म्याला आणि प्रतिभेला पीएम मोदींनी सलाम केला आहे.
चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. ते म्हणाले- चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासात एक नवीन अध्याय लिहिला आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची साक्ष आहे. मी त्याच्या आत्म्याला आणि प्रतिभेला सलाम करतो!
भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन
चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.