नवी दिल्ली,दि १४ ऑगस्ट २०२३ – चंद्रावर तिरंगा फडकवायला निघालेल्या चांद्रयान-3 ला आज एक महिना पूर्ण झाला आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने सतत आणि यशस्वीपणे प्रवास करत आहे.आजपासून सुमारे ९ दिवसांनी म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.पण आजचा दिवस १४ ऑगस्ट चांद्रयान-3 साठीही खूप खास आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) १४ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा चांद्रयान-3 ची कक्षा कमी करणार आहे. चांद्रयान-3 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ आणण्यासाठी ही प्रक्रिया आज केली जाईल. अशाप्रकारे चांद्रयान-3 आज चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश करेल. गेल्या वेळी ९ ऑगस्ट रोजी हा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर अंतराळयानाची कक्षा १७४ किमी x १,४३७ किमी इतकी कमी झाली.चांद्रयान-3 ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. आता पुढील डी-ऑर्बिटिंग १६ ऑगस्ट रोजी केले जाईल.
चांद्रयान-3, येत्या २३ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि येथे १४ दिवस काम करेल अशी माहिती आहे. चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा फॉलो-अप मिशन आहे. चंद्राच्या पृष्ठ भागाभोवती सुरक्षितपणे उतरण्याची आणि प्रदक्षिणा घालण्याची एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. चांद्रयान-3 मध्ये स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि आंतर-ग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित आणि प्रदर्शित करण्यासाठी रोव्हर यांचा समावेश आहे.
आणि गेल्या आठवड्यात इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-3 चे विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला होता. सोमनाथ म्हणाले होते की, चांद्रयान-३ चे सर्व सेन्सर किंवा इंजिन निकामी झाले तरी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य लँडिंग करेल. सोमनाथ म्हणाले की, ‘विक्रम’ लँडर अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते अपयश हाताळण्यास सक्षम असेल.