मुक्त विद्यापीठाच्या प्रथम व द्वितीय बी.ए.बी.कॉम ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

0

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. आणि बी.कॉम शिक्षणक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता काही बदल करण्यात आले असून, विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तांत्रिक अडचणी येऊ नयेत तसेच परीक्षा सुनियोजित पद्धतीने व्हाव्यात या हेतुने विभागीय केंद्रांच्या  दोन तुकड्या (बॅचेस) तयार करण्यात आल्या  आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी दिली.

 बी.ए. आणि बी.कॉम शिक्षणक्रमातील प्रथम वर्षाच्या ज्या विषयांच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरु होणार होत्या, त्या नव्या बदलाप्रमाणे पहिल्या तुकडीतील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेबर, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या दुसर्या तुकडीतील विभागीय केंद्राच्या अंतर्गत ४ सप्टेंबरपासून  सुरु होतील.  बी.ए. आणि बी.कॉम शिक्षणक्रमाच्या द्वितिय वर्षाच्या परीक्षाच्या वेळापत्रकातही काही बदल असून हे सर्व बदल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

 परीक्षेसाठी वेळापत्रक विद्यापीठ विभागकेंद्रानिहाय दोन तुकड्यामध्ये (Batch) करण्यात आले असून त्या विभागातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या त्या बॅचनुसारच त्या विद्यार्थ्यांना परीक्षा उपलब्ध असेल, इतर दिवशी असणार नाही. 

 तुकडी क्रमांक १ अंतर्गत :  

 अमरावती विभागीय केंद्रातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम , औरंगाबाद विभागीय केंद्र  अंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई विभागीय केंद्र अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड,  नागपूर विभागीय केंद्रअंतर्गत  नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदीया या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. 

 तुकडी क्रमांक 2 अंतर्गत : 

 नाशिक विभागीय केंद्राच्या कक्षेत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार, पुणे विभागीय केंद्राच्या कक्षेत पुणे, सातारा, सोलापुर, कोल्हापूर विभागीय केंद्राच्या कक्षेत कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, तर नांदेड विभागीय केंद्राच्या कक्षेत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्र यांचा समावेश आहे.  विद्यार्थ्यांना  वेळापत्रकात उल्लेखलेल्या तारखेनुसार व  आपल्या तुकडीनुसारच (Batch) परीक्षा देता येईल. त्यामुळे विद्यर्थ्यांनी आपली तुकडी (Batch) किती तारखेला आहे ते काळजीपूर्वक तपासून त्याच दिवशी त्या त्या विषयाची परीक्षा वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेमध्ये द्यावी. 

 व्दितीय व तृतीय वर्ष B.A/B.Com च्या काही पेपर्सना विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या दरम्यान पेपर देता येऊ शकेल. काही पेपर्सना संख्या कमी असल्याने सकाळी 8.00 ते 1.00 PM किंवा दुपारी 3 ते रात्री  8.00 असा ठेवला आहे. तुकडी निहाय परीक्षा द्वितीय वर्ष बी.ए. साठी पर्यावरणशास्त्र (EVS) या विषयाची परीक्षा पहिली व दुसरी तुकडी अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यानंतर द्वितीय वर्षासाठी तुकडी निहाय परीक्षा नसेल. मात्र स्लॉट टाईम विद्यार्थी संख्ये नुसार काही विषयांना सकाळी 8 ते रात्री 8 असा देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी आपण देणार असलेल्या पेपरची वेळ काळजीपूर्वक पाहून त्यानुसारच ऑनलाईन परीक्षेला उपस्थित होउन परीक्षा द्यावी. परीक्षांबाबतचे सविस्तर वेळापत्रक  ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

 ऑनलाईन परीक्षेसाठी मॉक टेस्ट सुरु : पाटील 

 ऑनलाईन परीक्षा सुविहित देता यावी या करिता विद्यापीठाने https://ycmou.unionline.in  संकेतस्थळावर दिनांक १ ऑगस्टपासून सराव चाचणी (मॉक टेस्ट) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या  सुविधेचा लाभ  दिनांक ९ ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी  ऑनलाईन सराव चाचणी अवश्य द्यावी, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षेला सामोरे जाताना अडचणी येणार नाहीत, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी केले आहे. 

 तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी बदल : डॉ. भोंडे

 

मुक्त विद्यापीठात ऑगस्ट 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 121 शिक्षणक्रम 1376 अभ्यासक्रम असून सुमारे ६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एकाच वेळी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखाच्यापेक्षा जास्त होते. जास्त विद्यार्थी संख्या असल्याने परीक्षेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत तसेच परीक्षा सुनियोजित पद्धतीने व्हाव्यात या हेतूने एकाच विषयाची परीक्षा विभागनिहाय दोन दिवस ठेवण्यात आली आहे. विद्यापीठच्या आठ विभागीय केंद्रांचे दोन गट करण्यात आले असून त्या दोन गटांतर्गत  परीक्षा दोन दिवस घेण्यात येतील.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.