छगन भुजबळ उद्या मोठा निर्णय घेणार ?:कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
जहां नहीं चैना वहां नहीं…सूचक विधान करत भुजबळ नागपुरातून थेट नाशिककडे रवाना
नाशिक.दि,१६ डिसेंबर २०२४ – राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावललल्या मुळे ते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे काल नागपूर मध्ये असून सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यासह शपथविधी कार्यक्रमाला ही अनुपस्थिती दाखवली. त्यामुळे छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे. या संधर्भात उद्या (दि,१७ )सकाळी ९:३० वाजता नाशिकच्या भुजबळ फार्म येथे ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. कालपासूनच भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. भुजबळ यांच्या समर्थकांनी तर नाशिकमध्ये हिंसक आंदोलनही केलं आहे. तर भुजबळांचा वापर केवळ ओबीसी मते मिळवण्यापुरता झाल्याचा आरोप अनेक ओबीसी नेत्यांनी केला आहे. छगन भुजबळ यांनी आजही या सर्व प्रकरणावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. जहां नहीं चैना वहां नहीं… असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत. भुजबळ यांनी नागपूर अधिवेशनात न थांबण्याचाही निर्णय घेतला असून दुखावलेले भुजबळ नाशिकला निघणार आहेत.
आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का? तुमची आता पुढची काय भूमिका आहे? असे सवाल छगन भुजबळ यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या स्टाईलने एकाच वाक्यात उत्तर दिलं. आता बघू, जहां नहीं चैना वहां नहीं… असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठं सूचक विधान केलं आहे. छगन भुजबळ यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. तसेच भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याच्याही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भुजबळ उद्या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रतारणा करणार नाही
मंत्रिपदाबाबत माझ्या नावाची चर्चा होती. पण ऐनवेळी माझं नाव का काढलं मला माहीत नाही. ७-८ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर पाठवण्याचं प्रपोजल पक्षाकडून दिलं होतं. पण मी हा प्रस्ताव नाकारला. कारण मला राज्यसभेवर जायचं नाही. मागच्यावेळी मी म्हणालो होतो. तेव्हा ते ठिक होतं. पण मी आताच निवडून आल्याने लगेच राज्यसभेवर जाणं मला मान्य नाही. कारण मी आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी तो विश्वासघात ठरेल. माझे मतदार रागावणार नाहीत. पण त्यांच्याशी मी प्रतारणा करू शकत नाही, असं छगन भुजबळ यांनी ठणकावलं.
भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असून राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी निदर्शने करत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने समर्थक नाराज झाले आहेत. भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त असून ते भुजबळांना देण्यात यावे अशी मागणी यावेळी समर्थकांनी केली. भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी भुजबळ साहेबांना मंत्री मंडळात न्याय द्यावा अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलन केल्यामुळे मुंबई नाका परिसरातील मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला.
यावेळी अंबादास खैरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, पुजा आहेर, डॉ. प्रविण गुल्ले, संतोष खैरनार, राजेंद्र जगझाप, शिवा काळे, शशी बागूल, दुर्गेश चित्तोड, आशा भंदुरे, चंद्रकांत माळी, राजेंद्र भगत, डॉ. विष्णु आत्रे, संदीप भालेराव, बाबा गायकवाड, आकाश विश्वकर्मा, विशाल चव्हाण, रविंद्र वेळजाळी, प्रविण जगताप, विलास दराडे, मेघा दराडे, माधुरी आखाडे, निर्मला सावंत, संजीवनी जाधव, मीनाक्षी काकळीज, रोहिणी रोकडे, रूपाली पठाडे, अमोल नाईक, संतोष भुजबळ, मुकेश शेवाळे, रविंद्र शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.