मुलांना शिकवू नका, शिकू द्या!-पॅरेंटिंग फंडे ऑन संडे -06

डॉ. ‌आदिती तुषार मोराणकर, नासिक ,Child Psychologist, Special Educator

0

Child Psychologi

परवा नाशिकहून कसाऱ्याला जाण्यासाठी बस पकडली. नेहमीसारखी गर्दी असली तरी दुपारची वेळ असल्याने किमान प्रत्येकाला बसायला जागा मिळाली होती. बस चालू झाल्यानंतर एका काकांनी ड्रायव्हरला हात दाखवला तेव्हा कंडक्टरने “स्टॅंडिंग यावं लागेल” असं सांगितलं. त्यानंतरही कदाचित उशीर होऊ नये म्हणून त्यांनी उभ्याने जाण्याची तयारी दाखवली आणि ते बसमध्ये चढले. माझ्या मागच्या सीटवर कंडक्टर साईडला दोन माणसं बसली होती तर ड्रायव्हर साईडला एक महिला आणि तिचं अडीच-तीन वर्षाचं बाळ बसलं होतं. त्या काकांनी त्या महिलेला बाळाला मांडीवर घेण्याची विनंती केली म्हणजे एक सीट बसण्यासाठी मोकळं झालं असतं. त्यांचं‌ बोलणं ऐकून माझ्या मागचे सद्गृहस्थ त्यांना म्हणाले की “ते बाळ मांडीत बसत नाही. खूप त्रास देतं” तेव्हा लक्षात आलं की ती महिला आणि ते  सद्गृहस्थ हे नवरा बायको होते. मग अर्थातच ते दोघेजण एका साईडला शेजारी शेजारी बसले आणि मुलाला मांडीत घेतलं तर माझ्या मागची एक सीट त्या काकांसाठी सहज उपलब्ध झाली असती म्हणून मी देखील त्या सदगृहस्थांना त्यांच्या बायको शेजारी जाऊन बसण्याचा आग्रह केला. तेव्हा ते दोघेही नवरा बायको अकांडतांडव करायला लागले. चढ्या आवाजात अगदी असंस्कृत शब्द वापरून दोघांनी मला आणि काकांना बरच काही सुनावलं. अगदी “आम्ही फुकट प्रवास करत नाही, आमची काय ऐपत नाही का तिकीट काढायची, आम्ही ३ तिकीट काढु, आमच्या बाळालाही प्रवास करण्याचा हक्क आहे” इथपर्यंत तो वाद गेला. शेवटी मी आणि माझ्या शेजारच्या ताईंनी थोडी जागा करून काकांना आमच्या सीटवर ऍडजेस्ट केलं. कंडक्टर आल्यानंतर मागच्या सदगृहस्थाने दोनच तिकीट काढले तेव्हा मात्र काकांना ते सहन झालं नाही. ‘दोन तिकीट काढून तीन सीट अडवताय हे बरोबर नाही’ असं त्यांनी दोघांना सांगितलं पण तरी देखील त्या नवरा बायकोने तसूभर देखील तडजोड केली नाही. उलट कसारा येईपर्यंत त्यांची अरेरावी आणि असभ्य बडबड अखंड चालू होती. मनात विचार आला “आज ते लेकरू अडीच तीन वर्षाचं आहे‌. त्याच्यासमोर जर अशा आई-वडिलांचा आदर्श असेल तर भविष्यात ते बाळ तरी कोणाला मदत करू शकेल का? मनाचा मोठेपणा दाखवू शकेल का?” दुर्दैवाने याचं उत्तर “नाही” हेच आहे, कारण ते बाळ जे बघणार आहे, जे जगणार आहे, तेच शिकणार आहे!  हा केवळ एकच प्रसंग नाही. दुसऱ्या दिवशी लोकलमध्ये ऑफिस सुटल्यानंतर घरी जाणारी एक महिला फोनवर आपल्या नवऱ्याशी बोलत होती. (कोणाचंही बोलणं ऐकणं हे असभ्य असलं तरी ती महिला माझ्यासमोर उभी राहून मोठमोठ्याने बोलत असल्याने आपसूक तिचं बोलणं कानावर पडत होतं.) ती नवऱ्याला म्हणत होती, “तुम्हाला किती वेळा सांगितलं त्याला शेजारीपाजारी पाठवू नका. शहरातल्या लोकांना नाही आवडत लहान मुलांनी आपल्या घरी येऊन उपद्व्याप करणं. रोज शेजारी जाऊन काहीतरी खाऊन येतो. कधी तरी त्या मला ऐकवतील तुला की तुझा पोरगा रोज माझ्याकडे जेवतो. मग मी नाही ऐकून घेणार. इतकी वर्ष झाली मला मुंबईत येऊन पण मी कोणाच्या दारात गेले नाही, कोणाकडे काही मागितले नाही आणि तुम्ही मात्र खुशाल त्याला खेळायला, खायला शेजारी नाहीतर खाली पाठवता. मला अजिबात आवडलेलं नाही. मी घरी येण्याच्या आत तो मला घरी दिसला पाहिजे.”
Child Psychologi मला सांगा जर पालकच असं स्वतःला चौकटीत बांधून घेतील, सगळ्यांशी संबंध तोडून फक्त स्वतःपुरतं जगतील तर पुढची पिढी कशी घडेल?
हे दोन्ही प्रसंग मनाला अतिशय वेदना देणारे होते. विचार करायला लावणारे होते. पालक म्हणून तुम्हीही असं वागत असाल तर वेळीच सावध व्हा कारण ‘पेराल तेच उगवेल’ ही जुनी म्हण आहे.
“मुलांनी शिकून खूप मोठे व्हावे” असं तर आपल्या सगळ्यांनाच वाटतं. आपण त्यांना चांगली शाळा, चांगलं शिक्षण आणि सर्वतोपरी सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो पण गंमत अशी आहे की ‘मुलं शिकतात कशी?’ याविषयी आपण विचारच केलेला नसतो. त्याचं कारण अगदी साधं आहे. “मुलांना शाळेत पाठवलं की ती‌ शिकतात” असा समज असतो. त्यामुळेच मुलांना लवकरात लवकर शाळेत पाठविण्याकडेच पालकांचा कल असतो. मुलांचे गणवेष, वह्यापुस्तके, फि यावर खर्च केला की आपलं पालक म्हणून कर्तव्य संपत असं मानलं जात. फार तर अभ्यासाला बसवणं, गृहपाठ करूण घेणं, हे केलं जातं. मात्र, नेमकं हेच मुलांना नको असतं. त्यातून मग चिडणं, रागावणं, शिक्षा करणं… हे सारं सुरू होतं. तसं म्हटलं तर घराघरात हेच चित्र दिसतं. सगळ्याच पालकांची चिंता ‘मुलं अभ्यासच करत नाहीत’ अशी असते. त्यातून आजकाल तर मुलं ऐकतच नाहीत. टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल गेम खेळत बसतात, कसं वळण लावायचं त्यांना हे प्रश्न मला सतत विचारले जातात.
एक नामांकीत शिक्षिका, कुटुंब सल्लागार, लेखिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक उत्तम पालक असणाऱ्या डोरोथी लॉ नॉल्टे यांची एक कविता वाचून कदाचित आपल्या लक्षात येईल की मूल कसं शिकतं!
जर मुले टीका ऐकत जगत असतील तर ते निंदा करायला शिकतात
जर मुले शत्रुत्वाच्या भावना बघत जगत असतील तर ते लढायला शिकतात
जर मुले उपासाने जगत असतील तर ते लाजाळू राहायला शिकतात
जर मुलं लाजेने जगत असतील तर ते अपराधी भावनेने जगायला शिकतात
जर मुलं प्रोत्साहन आणि जगतील तर ते आत्मविश्वास शिकतात
जर मुलं सहिष्णुतेने जगली तर ते धीर धरायला शिकतात
जर मुलं स्तुतीसह जगली तर ते इतरांचा कौतुक करायला शिकतात
जर मुलं स्वीकृतपणे जगली तर ते प्रेम करायला शिकतात
जर मुलं संमतीने जगली तर ते स्वतःला आवडायला शिकतात
जर मुलं प्रामाणिकपणे जगली तर ते सत्य वागायला शिकतात
जर मुलं सुरक्षितते सहज जगली तर ते स्वतःवर आणि इतरांवर विश्वास ठेवायला शिकतात
जर मुलं मैत्रीपूर्ण जीवन जगली तर ते देखील या जगात मैत्रीपूर्ण संबंध ठेवून जगायला शिकतात
याचाच अर्थ मुलं जसं आपल्याला वागताना बघतात तसंच आयुष्य जगायला शिकतात.
मुले अनेक प्रकारे शिकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
• अनुभव: मुले प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकतात. खेळणे, प्रयोग करणे, निसर्गाचे निरीक्षण करणे यांसारख्या गोष्टींमधून त्यांना नवीन गोष्टी समजतात.
• अनुकरण: मुले मोठ्यांचे अनुकरण करून शिकतात. ते त्यांचे पालक, शिक्षक आणि मित्र यांचे वर्तन, बोलणे आणि हावभाव कॉपी करतात.
• प्रश्न विचारणे: मुले सतत प्रश्न विचारून जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न विचारून ते माहिती मिळवतात आणि नवीन ज्ञान आत्मसात करतात.
• खेळ: खेळ हा मुलांसाठी शिकण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. खेळ खेळताना मुले सामाजिक कौशल्ये, समस्या सोडवणे आणि सर्जनशीलता शिकतात.
• पुस्तके आणि कथा: पुस्तके आणि कथा मुलांसाठी ज्ञानाचा खजिना असतात. त्यातून त्यांना जगाची माहिती मिळते, त्यांची कल्पना शक्ती वाढते आणि भाषिक कौशल्ये विकसित होतात.
• इंद्रिये: मुले त्यांच्या इंद्रियांच्या माध्यमातून जगाला समजून घेतात. पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे आणि चव घेणे यांद्वारे ते माहिती गोळा करतात.
प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याच्या शिकण्याची पद्धत देखील वेगळी असू शकते. मुलांना स्वतः अनुभव घेऊन शिकण्याची संधी द्यावी, त्यांच्या चुकांमधून त्यांना शिकू द्यावे, त्यांना प्रश्न विचारण्यास, शोध घेण्यास आणि समस्या सोडवण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे जेणेकरून ते स्वतंत्र आणि आत्मविश्वासू बनू शकतील.
परत भेटूयात नवीन विषयासह पुढच्या रविवारी #पॅरेंटिंग फंडे ऑन संडे या सदरात!
या विषयावर कुणालाही काही प्रश्न असतील तर नक्की बोलून मन मोकळ करा.

डॉ. ‌आदिती तुषार मोराणकर, नासिक

Child Psychologist, Special Educator

83299 32017 / 93265 36524

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!