Child Psychologi तीर्थ आणि ऋषी हे दोन्ही चुलत भावंडे! एकाच वयाचे असून दोघांमध्ये कमालीचा फरक आहे. तीर्थ बडबड्या आहे तर ऋषीला बोलायला वेळ लागतो. तीर्थचं चौफेर लक्ष असतं तर ऋषी बऱ्याचदा हरवल्यासारखा असतो. सहाजिकच त्यांच्याकडे येणारा प्रत्येकजण नकळतपणे दोघांमध्ये तुलना करतो आणि याचं ऋषीच्या आईला कायम वाईट वाटतं. असं का होत असेल? दोघे एकाच घरात राहतात, एकाच वयाचे आहेत एकाच शाळेत जातात मग हा फरक का?
पालकांनो, लग्नाची ‘सप्तपदी’ चालल्यानंतर पालकत्वाची ‘सप्तपदी’ तिनदा (७-७-७) चालणं महत्त्वाचं असतं. पालक झाल्यानंतर प्रत्येक पाऊल सांभाळून आणि विचारपूर्वक टाकावं लागतं. आपल्या प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया ही मुलांकडून येणार असते. आपली क्रिया चुकली तर मुलांची प्रतिक्रिया देखील चुकणारआणि म्हणूनच हा ७-७-७ चा फंडा आज तुम्हाला सांगते आहे.
उदाहरण सांगितलं की पटकन कळतं म्हणून घडलेली एक गंमत सांगते.(Child Psychologi)
अलीकडेच शाळेत आम्ही एक वेगळा दिवस साजरा केला. मुलांनी कपड्यांच्या घड्या घातल्या. झाडू हातात घेऊन केर काढला. कागदाचे गोळे उचलून डस्टबीन मध्ये टाकले. फडकं हातात घेऊन खिडक्या, दरवाजे पुसून काढले. ही सगळी मुलं २ ते ६ या वयोगटातील होती आणि हे सगळं करताना ते मनमुराद आनंद लुटत होते. मुलं हसत होते, आनंदाने उड्या मारत होते, एकमेकांना पटापट मदत करत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करण्याआधी त्यांना एकत्र बसून कुठल्याही प्रकारच्या सूचना, नियम व अटी सांगितल्या गेल्या नव्हत्या. फक्त त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासमोर कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या आणि “कोणाला मला मदत करायची आहे का?” इतका साधा प्रश्न विचारला. हातात झाडू घेऊन “माझ्याबरोबर कोण कोण झाडणार?” असं विचारलं आणि जवळपास प्रत्येक मूल उत्साहाने केर काढायला, कपड्यांच्या घड्या घालायला तयार झालं. हिच आहे ७-७-७ च्या फंड्यातली पहिली सप्तपदी!
७-७-७ चा फंडा समजून घ्यायला अगदी सिंपल आहे. मुलाच्या आयुष्यातली 21 वर्ष सात वर्षाच्या तीन टप्प्यांमध्ये विभागायची. प्रत्येक सात वर्षाच्या टप्प्यात (सप्तपदीत) ‘पालक म्हणून आपण काय करायचं’ हे समजून घ्यायचं हाच आहे ७-७-७ चा फंडा!
पहिली सप्तपदी
वयोगट : ० ते ७ वर्ष
खेळावर लक्ष केंद्रित करणे.
यावर मागच्या “खेळण्याचा हक्क आणि हक्काचा खेळ” या लेखामध्ये मी बरंच काही लिहिलं आहे. तरी तो लेख ज्यांच्या वाचनात आला नाही त्यांच्यासाठी थोडक्यात परत मांडते.
मुलांच्या निकोप वाढीत नैसर्गिकपणे मुक्त खेळण्याचं खूप महत्त्व आहे. ‘अर्थार्जन करणं’ हे जर आपलं कर्तव्य असेल तर ‘खेळणं’ हे मुलांचं कर्तव्य आहे. खेळणी खेळतांना अनेक शारीरिक हालचाली होत असतात. पकडणं, सोडणं, धरणं, खेचून नेणं, ओढून आणणं अशा कित्येक शारीरिक क्रिया मुलांकडून आपोआप घडत असतात आणि त्यातूनच ते नवीन अनुभव घेत असतात.
खरं पाहिलं तर आपल्या रोजच्या शेड्युलमध्ये मुलांची शाळा, त्यांचे ट्युशन, इतर क्लासेस या सगळ्यात मुलांच्या खेळण्याच्या हक्कावर आणि हक्काच्या खेळण्यांवर आक्रमण होतंय. त्यातुन उरलेला खेळण्याचा वेळ सुद्धा मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये जातोय. खरी गरज आहे त्यांना छोटे छोटे खेळ शिकवण्याची! अगदी बाजारातून आणलेली भाजी चार टोपल्यांमध्ये वेगळी करायला शिकवा, एका किलोत किती कांदे आलेत ते मोजायला शिकवा, किराणा आणल्यानंतर पिशव्या कापून किराणा डब्यांमध्ये, बरण्यांमध्ये भरायला शिकवा. हे करतानाच रवा कुठला, भगर कुठली, ज्वारी कुठली, बाजरी कुठली? असे छोटे छोटे प्रश्न विचारा यातून तुमच्या गप्पा होतील. मुलांची समज वाढेल आणि काम देखील हातासरशी होऊन जाईल. बरं एकत्र केलेल्या या कामामुळे तुमचं आणि मुलांचं बॉण्डिंग देखील छान होईल.
मूल म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, तुमचं प्रेम या सगळ्या इतकंच महत्वाचं आहे ते खेळण्याचा हक्क आणि हक्काची खेळणी!
यातून साध्य होणारे ७ परिणाम :
१. वैचारिक प्रगल्भता
2. सौजन्याची शिकवण
3. धीर धरणे
4. शारीरिक हालचाली
5. आत्मविश्वास
6. भावना नियंत्रण
7. तडजोड (एडजस्टमेंट)
दुसरी सप्तपदी
वयोगट : ८ ते १४
अध्यापनावर लक्ष केंद्रित करणे
इथे अध्यापन म्हणजे केवळ शैक्षणिक अध्यापन नसून सामाजिक मुल्य, स्वभावाची जडणघडण व इतर जीवनावश्यक गोष्टींच्या अध्यापनांचा विचार करावा लागेल.
पहिली सप्तपदी पूर्ण केल्यानंतर मुलं या वयोगटातील जीवन कौशल्ये, मुल्ये आणि सामाजिक वर्तन शिकण्यासाठी तयार असतात.
पालकांनी मुलांना “बरोबर आणि चूक” यातला फरक, मैत्री करताना बाळगायची सावधानता, त्यांना नक्की काय आवडते आहे, काय जमतं आहे? हे शोधण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे. या वयोगटातील मुलांना शालेय अभ्यासात देखील पालकांची मदत लागते. तुम्ही मदत जरुर करा मात्र शाळेचं प्रत्येक काम आपणच पुर्ण करून देणं टाळा. शाळेतून दिलेले प्रोजेक्टस् मुलांना बौद्धिक चालना देणारे आणि त्यांच्या सृजनाची, कल्पनाशक्तीची वाढ करणारे असतात. असे उपक्रम त्यांना करू न देता ‘वेळेत सबमिशन होण्यासाठी आपण करणे’ अतिशय चुकीचे आहे. मुलांना त्या प्रोजेक्टचे फुल मार्क्स मिळतात पण त्यातून मुलांची होणारी प्रगती साध्य होत नाही.
या वयोगटात मुलांच्या जाणिवा प्रगल्भ करणारे अनुभव त्यांना द्या. नातेवाईक, मित्रमंडळींकडे जा. आपल्या घरी सगळ्यांना बोलवुन छोटेखानी गेट टुगेदर करा. या गेट टुगेदरच्या आयोजनात मुलांना सामिल करून घ्या. खाण्याचा मेन्यू ठरवतांना मुलांशी चर्चा करा. पाहुण्यांना पाणी, सरबत, जेवण वाढण्याची जबाबदारी मुलांवर सोपवा. गेट टुगेदरच्या खेळांची यादी , सुत्रसंचलन मुलांना जमेल तसं करू द्या. सगळ्यात महत्त्वाचं, एकदा जबाबदारी दिली की चार वेळा मागे लागुन नका. वाट बघा, जर मुलांना नाही जमलं किंवा त्यांनी नाही केलं तरी नाराज न होता तुम्ही वेळ सांभाळून घ्या व नंतर “पुढच्या वेळी तु नक्कीच करशील याची खात्री आहे पण आज तु हे केलं असतं तर मला खूप आनंद झाला असता” अशी सौम्य जाणीव करून द्या.
रागावणं, ओरडणं, मारणं किंवा इतर शारीरिक शिक्षा मुलांना सुधरवणार नाहीत हे कायम लक्षात ठेवा. उलट अशा शिक्षांनी मुलं कोडगी होतात, निगरगट्ट बनतात. मग आपल्या हातात काहीच उरत नाही.
या सप्तपदीतुन साध्य होणारे परिणाम:
१. कल्पनाशक्ती
२. सामाजिक कौशल्ये
३. मैत्रीची मुल्ये
४. सारासार विवेकबुद्धी
५. संवाद कौशल्य विकास
६. शैक्षणिक पातळीवर गुणवत्ता
७. पालक- बालक स्नेह
तिसरी सप्तपदी
वयोगट : १५ ते २१ वर्ष
मार्गदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करा.
पहिल्या दोन सप्तपदी यशस्वीरित्या पार केल्यानंतर आता आपण फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायचे आहे. आता मुले किशोरवयीन अवस्थेत असल्याने त्यांचे स्वातंत्र्य, त्यांची अभिव्यक्ती त्यांच्या वाढत्या गरजांचा आदर आपण करायला हवा. सतत शिकवण्याऐवजी, सल्ले देण्याऐवजी आता फक्त निरीक्षकाची भुमिका घ्यायला हवी. कुंभाराला मडके घडवतांना पाहिलंय? आधी गोळा चाकावर ठेवताच कुंभार दोन्ही हात वापरतात. एका हाताने चापट मारत मडक्याला आकार देतात तेव्हा दुसरा हात स्थिर ठेवून मडक्याला आधार देतात.
या तिसऱ्या सप्तपदीत आपला ‘आकाराचा हात’ थांबला आहे. ‘आधाराचा हात’ अजुन शांत, संयमी आणि स्थिर ठेवून हा टप्पा पार करायचा आहे. “आता आधाराचा हात काढला तर आकाराला आलेले मडके बिघडु शकते” हे विसरु नका. मुलांच्या मतांचा आदर करून त्यांच्या निर्णयांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे आणि आपल्यातले सकारात्मक नाते अजून कसे वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
यातून साध्य होणारे परिणाम:
१. भावनिक, सामाजिक, मानसिक विकास
२. ताणतणाव व्यवस्थापन
३. स्वातंत्र्याची सकारात्मक तयारी
४. व्यवहार ज्ञान
५. निर्णय क्षमता विकास
६. स्वावलंबन
७. मुलांचा सर्वांगीण विकास.
परत भेटूयात नवीन विषयासह पुढच्या रविवारी #पॅरेंटिंग फंडे ऑन संडे या सदरात! या विषयावर कुणालाही काही प्रश्न असतील तर नक्की बोलून मन मोकळ करा.
डॉ आदिती तुषार मोराणकर, नासिक
Child Psychologist,Special Educator
83299 32017 / 93265 36524
