स्वसंवाद की स्वमग्नता? – मुलांच्या विकासाचा महत्त्वाचा धागा
डॉ. आदिती तुषार मोराणकर,#पॅरेंटिंग फंडे ऑन संडे – ०३
Child Psychologist Special Educator “मॅडम, माझी मुलगी सतत स्वतःशी बोलत असते. पण ती काय बोलते ते आम्हाला नीट कळत नाही, हे सामान्य आहे का?”
हा प्रश्न एका आईने माझ्याकडे विचारला आणि माझ्या लक्षात आलं की, अनेक पालकांमध्ये स्वसंवाद आणि स्वमग्नता या दोन गोष्टींबाबत संभ्रम असतो. बाहेरून पाहताना दोन्ही सारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात फरक खूप मोठा आहे.
स्वसंवाद म्हणजे काय?
आपण काही करत असताना मनातल्या मनात किंवा हलक्या आवाजात स्वतःशी बोलतो.
उदा. –
सकाळी तयारी करताना, “आता दूध ठेवायचं, मग डबा भरायचा” असं पुटपुटणं.
मुलं खेळताना खेळण्याशी संवाद साधणं.
हा स्वसंवाद आपल्या विचारांना दिशा देतो, कृतीची उजळणी करतो, आणि मेंदूला एकाग्र ठेवतो. मुलांमध्ये स्वसंवाद हा भाषिक आणि बौद्धिक विकासाचा एक टप्पा मानला जातो.
स्वमग्नता म्हणजे काय?(Child Psychologist Special Educator)
स्वमग्नता (Autism Spectrum Disorder) ही एक न्यूरोलॉजिकल अवस्था आहे. यात मुलांना –
इतरांशी संवाद साधण्यात अडचण येते
नजरेला नजर देत नाहीत
ठराविक गोष्टी परत परत बोलतात किंवा करतात
बदल सहन करणं कठीण जातं
अनेक वेळा हे बोलणं निरर्थक असतं किंवा मोबाईल/टीव्हीवर पाहिलेलं जसंच्या तसं परतवणं असतं. याला Echolalia असं म्हणतात.
एक वास्तव उदाहरण
पाच वर्षांचा वेद नेहमीच कोपऱ्यात बसून खेळण्याला गोल गोल फिरवत असे. घरच्यांना वाटायचं की तो खूप अभ्यासू आहे कारण तो इंग्रजी अक्षरं आणि नंबर परत परत म्हणतो. पण शाळेत तो शिक्षकांकडे बघत नसे, मित्रांशी खेळत नसे. तपासणी केली तेव्हा समजलं की त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे.
याउलट, सात वर्षांची जान्हवी स्वयंपाकघरात आईला मदत करताना “आता डाळ टाकली, आता मीठ घातलं” असं पुटपुटत असे. ती आईला प्रश्न विचारायची, गप्पा मारायची. हा तिच्या स्वसंवादाचा भाग होता – पूर्णपणे नैसर्गिक आणि आरोग्यदायी.
स्वसंवाद आणि स्वमग्नता – प्रमुख फरक
घटक | स्वसंवाद | स्वमग्नता |
---|---|---|
अर्थपूर्णता | अर्थपूर्ण, कृतीला दिशा देणारा | अनेकदा निरर्थक, पुनरावृत्ती करणारा |
सामाजिक संवाद | इतरांशी संवाद शक्य | इतरांशी संवाद साधण्यात अडचण |
नियंत्रण | इच्छेनुसार थांबवता येतो | स्वतःहून थांबवणं कठीण |
कारण | मानसिक सवय किंवा विचारांची उजळणी | न्यूरोलॉजिकल विकासातील अडथळा |
परिणाम | भाषिक व बौद्धिक विकासाला मदत | भाषिक, सामाजिक आणि वर्तन विकासात अडथळा |
पालकांनी कोणत्या संकेतांकडे लक्ष द्यावं?
मूल नजरेला नजर देत नाही
त्याच त्याच गोष्टी परत परत बोलणं किंवा करणं
इतर मुलांबरोबर खेळण्याची इच्छा नसणं
स्वतःच्या विश्वात रमणं
बोलणं सुरू झालं तरी अर्थपूर्ण संवादाचा अभाव
जर हे संकेत दिसले, तर “मोठं झालं की ठीक होईल” या आशेवर वेळ वाया घालवू नका. बालविकासतज्ज्ञ किंवा स्पेशल एज्युकेटरचा सल्ला घ्या.
वेळीच हस्तक्षेप का गरजेचा?
संशोधन सांगतं की, मुलांमध्ये विकासात्मक समस्या जितक्या लवकर ओळखल्या जातात तितक्या सुधारण्याची शक्यता जास्त असते. दोन ते सहा वर्षं हा सर्वात महत्त्वाचा कालावधी आहे. या काळात –
योग्य प्रशिक्षण
घरातील सातत्यपूर्ण सराव
यांचा एकत्रित परिणाम मुलांच्या सामाजिक, भाषिक आणि बौद्धिक प्रगतीवर होतो.
पालकांसाठी काही सोपे उपाय
स्क्रीन टाइम कमी करा – मोबाईल किंवा टीव्हीवर सतत कंटेंट पाहिल्याने मुलं तोतया तोतया स्वरात तेच परतवतात, पण अर्थपूर्ण संवाद साधायला शिकत नाहीत.
थेट संवाद वाढवा – मुलाशी बघून बोलणं, चेहऱ्यावरील हावभाव वापरणं.
खेळांमधून शिकवणं – पझल्स, गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं.
दैनंदिन कामांत सहभागी करणं – कपडे ठेवणं, भाजी धुणं, पाणी भरून देणं.
तज्ज्ञांचा सल्ला घेणं – केवळ शाळा किंवा थेरपीवर अवलंबून राहू नका; घरातही त्याच पद्धतीने सराव सुरू ठेवा.
सकारात्मक स्वीकाराची ताकद
पालकांनी मुलांच्या वैशिष्ट्यांना दोष म्हणून न पाहता त्याला स्वीकारणं गरजेचं आहे. “माझं मूल वेगळं आहे” हे मान्य करणं हेच सुधारण्याच्या पहिल्या पायरीचं दार उघडतं.
ज्या पालकांनी आपल्या मुलासाठी वेळ, ऊर्जा, आणि संसाधनं दिली, त्यांनी त्याच्या विकासात मोठा फरक घडवला आहे. यासाठी केवळ पैशाची नव्हे तर सातत्याची गरज आहे.
शेवटचं सांगणं
स्वसंवाद हा भाषिक प्रगतीचा नैसर्गिक टप्पा आहे. पण जर तो निरर्थक, पुनरावृत्ती करणारा असेल आणि मुलं सामाजिक संवादापासून दूर राहत असतील, तर तो स्वमग्नतेचा इशारा असू शकतो.
वेळेवर योग्य निदान आणि मार्गदर्शनाने बऱ्याच अडथळ्यांवर मात करता येते.
तुमच्या मुलाच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी त्याच्या सोबत उभे रहा – त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून जाईल.
पुढच्या रविवारी #पॅरेंटिंग फंडे ऑन संडे मध्ये नवा विषय घेऊन भेटू!
या विषयावर कुणालाही प्रश्न असतील तर नक्की बोलून मन मोकळं करा.
डॉ. आदिती तुषार मोराणकर
Child Psychologist | Special Educator
Nashik
📞 83299 32017 / 93265 36524
