शिक्षणाचा नवा आयाम : खेळ, संगीत आणि व्यायाम – भाग २
बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३६ ; लेखिका : आदिती मोराणकर
नदीचे खळखळ वाहणारे पाणी, पक्षांचा सुरेल किलबिलाट, पावसाच्या सरींचा आवाज, सागराच्या लाटांची गंभीर गाज, वारा वहायला लागल्यानंतर पानांची होणारी सळसळ, पानांच्या मागे लपलेल्या राघूची शिळ, देवळातल्या घंटीचा आवाज, ढगांची गडगड, कोकिळेचा स्वर हे संगीत नाही तर दुसरं काय आहे? निसर्गाच्या या संगीतानेच आपण फ्रेश होतो. या संगीताची जादू वर्षोनुवर्ष आपल्याला मंत्रमुग्ध करते. तुम्हाला जर सांगितलं की संगीताच्या याच जादूने एखाद्या व्यक्तीचा गंभीर आजारसुद्धा दूर होऊ शकतो तर तुम्हाला पटेल का ?
संगीताशी आपल नातं कधी तयार होतं माहिती आहे? अगदी लहानपणापासून! लहान बाळ जेव्हा किरकिरतं, तेव्हा त्याला संगीतातल काहीच कळत नसतं आणि त्याची आई सुद्धा संगीत शिकलेली नसते. तरीही त्याचं रडणं चालू असताना आई त्याला कुशीत घेऊन जोजवते आणि अंगाईचे हलके सुर छेडते. ते ईश्वरीय संगीत त्या लहानग्याला मनापासून शांत करतात. म्हणजे तेव्हापासूनच संगीताशी आपली नाळ जोडली गेलेली असते. संगीताचे महत्त्व ज्या देशांना समजलं आज ते देश महासत्ता बनलेले आहेत. प्राचीन काळी रोम आणि ग्रीक देशात लहान मुलांना फक्त तीन विषय शिकवले जात. व्यायाम, तर्कशास्त्र आणि संगीत! व्यायाम हे शरीराची काळजी घेण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, तर्कशास्त्र हे मुलांचे विचार योग्य दिशेने वळवण्यासाठी, बुद्धीचा विकास आणि क्षमता वाढवण्यासाठी तर संगीत हा विषय विविध भावभावना, संवेदनशीलता आणि सर्जनशील वृत्तीची निर्मिती होण्यासाठी शिकवले जात असत. आपल्या भारतातही आपला कुठलाही धार्मिक विधी, सण, समारंभ, उत्सव, नृत्य, नाटक, चित्रपट, अगदी साधे जादूचे प्रयोग सुद्धा संगीताशिवाय पूर्णत्वास जात नाहीत. संगीताची जोड दिल्याने या सगळ्याच कार्यक्रमांची रंगत वाढते तसंच शालेय शिक्षणात संगीताचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. भारतात असलेलं अध्यात्म आणि आपलं अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत या दोन गोष्टींमुळे अनेक देश आपल्यापुढे झुकतात व त्याचा सखोल अभ्यासही करतात.
भारतीय शास्त्रीय संगीतातील नाद आणि स्वर यावर वैज्ञानिकदृष्ट्या बरेच संशोधन झाले आणि त्यातून संगीताच्या माध्यमातून अनेक रोगांवर उपचार पद्धती विकसित झाली. शैक्षणिक प्रगती करताना मुलांवर येणारा ताण, त्यातून त्यांच्या भावनांमध्ये येणारे चढ-उतार, या सगळ्याला कंट्रोल करण्यासाठी संगीत खरोखरच प्रभावी माध्यम आहे. संगीत हे जर मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरला तर भावी पिढी रोगमुक्त, तणावमुक्त आणि सर्जनशील होऊ शकेल. बालवयातील अस्थिर आणि चंचल अवस्थेत ही सगळी मुले जर एकत्रित बसून अभ्यास करायला हवी असतील तर त्यांना बौद्धिक, मानसिक विचाराची एक बैठक द्यावी लागते. त्यासाठी संगीत परिणामकारक ठरते.आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातले काही राग खरोखरच आजारांवर मात करतात. जसे राग दुर्गा ऐकल्यानंतर आत्मविश्वास वाढतो, राग यमन कार्यशक्ती वाढवतो, राग देसकार संतुलन साधण्यात मदत करतो तर राग बिलावल अध्यात्मिक उन्नती साधतो, राग हमीर शक्ती आणि ऊर्जा निर्माण करतो. राग भूप शांतता आणि अहंकार संतुलनात मदत करतो.
सन १९६२ मध्ये डॉक्टर टी. सी. सिंग यांनी झाडांवर संगीताचे काही प्रयोग केले. ज्या झाडांना त्यांनी शास्त्रीय संगीत ऐकवलं होतं त्या झाडांची उंची इतर झाडांच्या तुलनेत 20 % जास्त होती तर त्यांचा बायोमास हा तब्बल ७२ % वाढला होता. त्यानंतर ११ वर्षांनी १९७३ मध्ये डोरोथी रिट्लाकने एकच प्रजातीच्या वनस्पतींवर वेगवेगळे संगीत ऐकवण्याचा प्रयोग केला. काही झाडांना भारतीय शास्त्रीय संगीत ऐकवण्यात आले तर काही झाडांना रॉक म्युझिक ऐकवले. प्रयोगांती ज्या झाडांना शास्त्रीय संगीत ऐकवण्यात आले होते, त्यांच्या वाढीचा दर चांगला होता. ते दुप्पट निरोगी आणि मजबूत झाले होते आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत होती. रॉक म्युझिक ऐकवलेल्या झाडांवर मात्र वेगळा परिणाम दिसला. ती झाडं प्रयोगांती अतिशय फिक्कट होऊन मरण पावली होती.
भारतीय शास्त्रीय संगीताचा जर वनस्पतींवर इतका चांगला परिणाम होत असेल तर आपल्या मुलांच्या निकोप वाढीसाठी ही नक्कीच संजीवनी ठरेल. म्हणूनच बालशिक्षणाच्या या महत्त्वाच्या वयात अनेक संकल्पना, अनेक मूल्य, अनेक संस्कार हे आपल्याला संगीताच्या माध्यमातून करता येतील असं माझं ठाम मत आहे. डोळे मोठे करून, हाताचे बोट नाचवत, मोठ्या आवाजात जे आपल्याला साध्य होणार नाही, ते नाचत-गात, अगदी साध्या सोप्या शब्दांमध्ये, सूर आणि तालाचा आधार घेऊन आपण मुलांना नक्कीच शिकवू शकतो.
दोन वर्षांमध्ये आपण कोरोना सारख्या अति कठीण काळाला सामोरे गेलो. सुरक्षित अंतर ठेवायला हवं, मास्क वापरायला हवा, सामाजिक ठिकाणी जायला नको, वारंवार हात धुवायला हवेत हे समजायला आपल्यासारख्या मोठ्यांनाही बराच उशीर झाला. ही तर बिचारी लहान लहान मुलं होती. यांना शंभरदाच काय हजारदा सांगूनही विषयाचं गांभीर्य कळणे शक्यच नव्हतं. अशावेळी आम्ही लहान मुलांसाठी बनवलेल्या छोट्याशा गाण्याने मुलांच्या सवयींमध्ये बराच फरक पडला.
करो ना, करो ना
हॅंडवॉश करो ना
जर्मस् को ढिशुम ढिशुम करके कोरोना भगाओ ना!
गले मिलना रोक दोनमस्ते तुम करो ना
गरम पानी पिकर तुमकोरोना भगाओ ना!
गाण्याच्या साह्याने एवढी मोठी गोष्ट मुलांना समजली आणि एका मोठ्या जीवघेण्या संकटाशी सामना करायला ते देखील सक्षम झाले. अशाच रोजच्या जीवनातल्या गोष्टी संगीताच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो, त्यांच्या मनावर येणारे ताण याच संगीताच्या माध्यमातून कमी करू शकतो. त्यांच्या मनाची शक्ती संगीताने वाढवू शकतो. म्हणूनच शिक्षणाचा नवीन आयाम यात खेळ आणि व्यायामाबरोबरच संगीतही महत्त्वाचे आहेच!
भारतीय शिक्षण पद्धतीत जेव्हा पाश्चात्यांनी शिरकाव केला तेव्हा गुरुकुलांमधून चाललेलं शतावधानी शिक्षण हे पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित असलेल्या चार भिंतीत कोंडले गेलं. आपला सर्वांगीण विकास तिथेच खुंटला. ग्रीक संस्कृतीमध्ये संगीत शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जात होते. ग्रीक शिक्षण पद्धतीचा अभ्यास केल्यास बदलत्या काळानुसार बदलत जाणार संगीताचे स्वरूप आपल्या लक्षात येईल. मात्र अभ्यासक्रमात कितीही फरक पडला तरीही संगीत शिक्षण देण्याची परंपरा ग्रीक मध्ये खंडित झाली नाही. उलट शतकोनुशतके या कलेचा विकास झाला. मार्टिन ल्युथर हे स्वतः संगीत प्रेमी आणि संगीताचे जाणकार होते. संगीताकडे दुर्लक्ष केले जाऊ नये असा त्यांचा आग्रहच होता. फ्रेडरिक द ग्रेट या सत्ताधाऱ्याने ‘प्रत्येक शाळेत आठवड्यातून तीनदा संगीत शिकवले गेलेच पाहिजे’ अशी सक्ती केली होती. संगीताचा अभ्यास आपल्या एकाग्रतेमध्ये आणि अवधान क्षमतेत खूप सुधारणा घडवू शकतो असे शास्त्राने सिद्ध झाले आहे तसेच मुलांचं लेखन, वाचन, गणनक्षमता यातही संगीताचा उपयोग करून वाढ करू शकतो असे शोध लागले आहेत.
युरोपमधील अनेक शिक्षण तज्ञ आणि समाजसुधारकांनी संगीत शिक्षणाचा आग्रह धरला होता. जर्मन शिक्षण तज्ञ फ्रॉबेल याने ‘बालकाच्या सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून संगीत शिक्षणाच’ महत्त्व सांगितले आहे. ‘मुलांमध्ये संगीताचा आस्वाद घेण्याची क्षमता वाढवणे’ हा संगीत शिक्षणाचा मुख्य हेतू असला पाहिजे असे फ्रॉबेलने सांगितले आहे. इंग्रजी कवी मॅथ्यु अर्नाल्ड याने “मुलांच्या मनात शिरकाव करणे व त्यांच्या जाणीवा जागृत करणे हे वाङ्मयापेक्षा संगीताने जास्त सोपे होते” असे आपल्या शैक्षणिक अहवालात नमूद केले आहे.
संगीत हा सौंदर्यात्मक आणि कलात्मक अभ्यास असल्याने बालपणापासून याची ओळख करून देणे आज महत्त्वाचे झाले आहे. संगीतात विद्यार्थ्याचे गायन वादन कौशल्य विकसित केले जाते. स्वरलेखन पद्धतीचा अभ्यास करवला जातो. यातून मुलांना स्वर ऐकण्याची सवय लागल्याने एकाग्रता वाढते. कुठलेही वाद्य वाजवताना हात, मेंदू आणि कौशल्य यांचा समन्वय साधला जातो आणि स्वर लेखन शिकताना लिहिणे, वाचणे आणि मोजणे अशा सगळ्याच सुधारणा मुलांमध्ये घडून येतात. सामान्यतः संगीत म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर तबला, पेटी, सतार, विणा, पखवाज अशी काही संगीत साधन येतात. मात्र कागद फाडणे, हातावर हात घासणे, तालबद्ध टाळ्या वाजवणे, पाय आपटणे, हाताने कुठल्याही वस्तूवर आघात करून त्यातून निर्माण होणारा नाद ऐकणे, कंगव्यावर कंगवा घासून त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनी ऐकणे आणि अशा अनेक नाद-ध्वनीतून सर्जनशीलता आणि कल्पकता वाढीस लावणे हे संगीत शिक्षणाचे उद्दिष्ट आहे असे केल्याने मुलांचे संगीताचे आकलन आणि संगीत हाताळण्याची क्षमता वाढते, जेणेकरून विविध प्रकारचे सर्जनशील अनुभव त्यांना घेता येतात.
संगीताला स्वतःची अशी भाषा नसते. कुठल्याही भाषेचा, प्रांताचा, विद्यार्थी संगीताचा आस्वाद तितक्याच तन्मयतेने घेऊ शकतो. प्रत्येक मूल गायक वादक होऊ शकणार नाही हे जरी मान्य असलं तरी प्रत्येक मुलाला किमान सुजन पद्धतीने संगीताचा रसास्वाद देऊन त्याचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत आणि संपन्न बनवता येते. संगीत हा प्रत्यक्ष अनुभवायचा विषय आहे. या अनुभवाची अनुभूती आपल्या मुलांना देणे गरजेचे झाले आहे.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियर, सीए, एमबीए झालेच पाहिजे, एंट्रन्स एक्झाम केल्याच पाहिजेत, त्यातून गडगंज पगाराची नोकरी लागलीच पाहिजे म्हणजे मग वीकेंडला जाऊन एन्जॉय करता येतं, अशा प्रकारच्या विचारांनी स्वार्थीपणा, एकलकोंडेपणा, आत्मकेंद्री वृत्ती वाढत चाललेली आहे.
आपल्या मुलाची अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी ध्यानधारण्याची तंत्र आणि संगीताचे मंत्र यांचा संगम उपयोगी ठरतो. संगीतामुळे आपल्या शरीरात प्रसन्नता, उत्साह, चैतन्य, ऊर्जा, शारीरिक बळाचा संचार होऊन प्राणवायूची लेवल वाढते, ज्यामुळे मानसिक समाधान, शांतता, दया, प्रेम, आत्मियता, सौजन्य अशा वेगवेगळ्या भावना अंतर्मनात जाग्या होतात हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. “गणित आणि विज्ञान तेवढे महत्त्वाचे आणि पीटीचा तास, संगीताचा तास फक्त टाईमपास साठी” हे पालकांच्या डोक्यातले विचार मुलांवर सुद्धा परिणाम करतात. ज्या काही मोजक्या शाळांमध्ये संगीत विषय जिवंत आहे तिथे पालक मुलांना प्रोत्साहन देत नाहीत किंवा संगीत या विषयाला तितकसं गांभीर्याने घेत नाही. खरंतर आजच्या बाल शिक्षणामध्ये संगीत हा विषय सामील करून मुलांची सांस्कृतिक संस्कारांची गरज भागवणे महत्त्वपूर्ण आहे तरच आजची पिढी फक्त पैसे कमवायचे रोबोट अथवा मशीन न बनता मूल्यांवर आधारित सुसंस्कृत नागरिक बनेल.
शिक्षणाचा नवीन आयाम खेळ संगीत आणि व्यायाम! यापैकी खेळ आणि संगीत आपण समजून घेतलं. त्यावर मला उत्तम प्रतिक्रिया देखील आल्या. याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. पुढील लेखात आपण शिक्षणासंदर्भातील व्यायामाचे महत्त्व समजून घेऊया. भेटूया पुढच्या रविवारी, धन्यवाद!