बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३८
विशेष सूचना : यापुढील लेखात मी जे काही लिहिणार आहे ते वाचून लगेचच आपल्या मुलांना ही डिसेबिलिटी आहे का? अशी फुटपट्टी लावू नका! मी फक्त या प्रकारांबद्दल जागृत करण्यासाठी यावर प्रकाश टाकणार आहे आणि जर अशा प्रकारची काही मुलं तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास मी नक्की तुम्हाला मदत करणार आहे. यासाठीच हा खटाटोप!
आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. खूप नवसाने राजाला एक बाळ झालं आणि राजकुमाराचे कोड कौतुक चालू झालं. दिवसानुरूप राजकुमार मोठा होऊ लागला मात्र जसा जसा तो मोठा झाला तसा तसा तो इतरांच्या चेष्टेचा विषय बनला. त्याचा बोबडे बोलणं, हाताने सतत टाळ्या वाजवणं, एका ठिकाणी न बसता गरगर फिरत राहणं, इतरांच्या नकला करत राहण्याच्या सवयीमुळे प्रजेने त्याला “चौकट राजा” अस नाव दिलं. खरंतर प्रजेला मनापासून “चौपट राजा” हेच नाव द्यायचं असावं, मात्र राजाच्या भीतीने ‘चौपट’ न म्हणता ‘चौकट’ म्हणत असावेत. ‘राजा का बेटा राजा या न्यायाने आज ना हाच राजकुमार उद्या आपला राजा होणार आहे ही भीती कदाचित प्रजेला असावी. तर असा हा ‘’चौकट राजा’’ मोठा तर झाला पण राजा होण्याच्या कुठल्याही परीक्षेत पास मात्र झाला नाही कारण त्याची त्या दृष्टिकोनातून कोणी तयारी करून घेतली नाही. तो आयुष्यभर चौकट राजाच राहिला! त्याने आनंदाने वर्षानुवर्ष राज्य केलं असा मात्र शेवट मी या गोष्टीचा करू शकत नाही याचं दुःख वाटतं पण पर्याय नाही.
“मी असा कसा वेगळा वेगळा?” असा प्रश्न विचारणारा चौकट राजा लहानपणी एकदा चित्रपटातून भेटला होता. त्यावेळी मनाला खूप प्रश्न पडले होते. मध्यंतरीच्या काळात ‘स्मार्ट’ होत जाणाऱ्या जगामध्ये अशा वेगळ्या मुलांचं नक्की अस्तित्व काय? याचा विचार करायला खरंतर फारसा वेळच मिळाला नाही पण आता जेव्हा लहान मुलांमध्ये काम करते आहे, 24 तास त्यांचाच विचार करते आहे तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की या “चौकट राजांना” वेळीच ओळखून त्यांच्यातली अध्ययन अक्षमता नक्की काय आहे? याचा अभ्यास व्हायला हवा. त्यावर उपाययोजना ठरवायला हव्यात आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायलाच हवं!
अत्यंत गोड, गोंडस, गोरपान पिल्लू हातात आल्यानंतर आईचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कालानुसार मुलाची वाढ ही योग्य होत होती. आजी-आजोबा नातवाचे कोड कौतुक करत होते. बाबा येता जाता मुलाचा पापा घेत होते. आई तिच्या परीने हाताचा पाळणा करून मुलाला जोजवत होती पण एक- दीड वर्षाचे मूल झाल्यानंतर ‘आपल्या मुलात काहीतरी वेगळं आहे’ याची जाणीव त्या कुटुंबाला व्हायला लागली होती. नक्की काय वेगळं आहे? याचा ताळमेळ लागत नव्हता पण ‘चार-चौघांसारख आपलं मूल नाही’ हे मात्र एव्हाना लक्षात आलं होतं. त्याच्या वयाची इतर मुलं लुटुपुटु पावलांनी स्वतःचा तोल सांभाळत चालायला शिकत होती. तोंडाने वेगवेगळे आवाज काढून आनंदात भर टाकत होती. दिलेली वस्तू हातात घट्ट पकडून ठेवत होती पण यांच मूल मात्र चालताना ठेचकाळत होतं, आवाज काढण्याचा प्रयत्न करत होत, हातात दिलेली वस्तू पकडण्यासाठी धडपडत होतं पण ती वस्तू पकडता येत नव्हती. ‘या सगळ्यालाच अध्ययन अक्षमता म्हणतात’ हे त्यांच्या गावीही नव्हतं. आईला कुठेतरी भीती वाटत होती म्हणून ती भीती तिने आजीजवळ बोलून दाखवली.
“आपलं बाळ अजून बोलत नाही आई! काही प्रॉब्लेम असेल का?” “अग तू कशाला काळजी करतेस? त्याचा बाप सुद्धा चार वर्षाचा होईपर्यंत बोलला नव्हता. हा पण चार वर्षाचा झाला की बोलायला लागेल बघ!” “आई पण तो चालताना त्याचा तोल जातो हो…” “ती तुझी चूक ! त्याला वेळेवर खाऊ पिऊ घालत नाहीस. अशक्त झाला असेल. तुम्हा मुलींना मुलांना अंगावरचे दूध पाजायला नको, मग मला अशक्त होतील नाहीतर काय?” “अहो तसं नाही पण बाकी मुलं बघा ना कशी हातात धरून खेळणी खेळतात”
“तुमच्या पिढीच मला काही समजतच नाही! अगं, करेल हळूहळू. एवढी काय घाई आहे? काहीतरी डोक्यात घेते आणि विचार करत बसते झालं.” या संभाषणानंतर आईने देखील स्वतःच्या मनाची समजून घालून घेतली आणि ‘आपल्या मुलाची प्रगती होईल. एक ना एक दिवस तो बोलेल, चालेल, खेळेल’ असा विचार करून ती ‘त्या’ दिवसाची वाट बघू लागली.
अनेकदा पालकांना ‘अध्ययन अक्षमता’ ही संकल्पना फारशी माहीत नसते. खरंतर त्यात त्यांची चूक नाही कारण आजही अध्ययन अक्षमतेबाबत ठराविक अशी कुठलीही व्याख्या नाही. आपल्या दृष्टिकोनातून जर आपल्या सोयीची अशी व्याख्या बघायला गेलो तर ज्या मुलांना ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन, गणन क्षमता, विचार करण्याची क्षमता मिळवण्यामध्ये किंवा वापरण्यामध्ये काही समस्या असतील तर त्याला अध्ययन अक्षमता म्हटले जाते. ही व्याख्या वाचल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच पालकांना लगेचच आपल्या मुलांमध्ये लेखन न करणे, वाचन करण्याचा कंटाळा करणे, आपण सांगितलेले निमुटपणे न ऐकणे यांचा अध्ययन अक्षमतेत समावेश होतो की काय? असे वाटेल पण मी इथे आवर्जून एक गोष्ट स्पष्ट करते, की ‘मुले अनुकरणप्रिय असतात’. तुम्ही त्यांच्यासमोर लिखाण करतच नाही तर ती कशी करतील? तुम्ही त्यांच्यासमोर मोबाईल व्यतिरिक्त पुस्तक हातात घेऊन वाचन करत नाही तर ती का वाचतील ? आणि ‘कोणाचे ऐकून घेणे’ हे जर आपल्या स्वभावात नसेल तर ती मुलं काय ऐकतील? म्हणून आधी मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करा आणि मग गरज असेल तरच त्यांना अध्ययन अक्षमतेच लेबल लावा.
अनेकदा अध्ययन अक्षमता अर्थात लर्निंग डिसेबिलिटी L.D. ही त्या मुलाची आंतरिक समस्या असते. केंद्रीय मज्जा संस्थेच्या म्हणजेच मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्याने बॅलन्स न करता येणे, सोशल न होता येणे असे दोष निर्माण होऊ शकतात. या अडथळ्यांचा परिणाम माहिती गोळा करणे, ती माहिती साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे, विचार करणे, त्यातून नवा विचार निर्माण करणे यासारख्या क्षमतांवर होतो. एका मुलाला एकच L.D. असते असे नाही तर काही L.D. एकत्र येऊन त्याचा एक गट बनतो आणि त्या समस्यांचा सामना तो एक मुलगा करत असतो. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जर वाचता येत नसेल तर त्याच्या शब्द संग्रहामध्ये भर पडत नाही, शब्दसंग्रहच नसल्याने त्या मुलाला नीट बोलता येत नाही, नीट बोलता येत नसल्याने त्याच्या आत्मविश्वासावर आणि आत्मभानावर सुद्धा परिणाम होतो आणि असा मुलगा समाजातून वेगळा पडतो.
यामध्ये नक्की या मुलाचा प्रॉब्लेम काय आहे त्याला वाचता न येणे हा आहे ? त्याला बोलता न येणे हा आहे ? की सामाजिक स्तरावर त्याला स्वतःला प्रेझेंट करता येत नाही हा आहे? तर या मुलाच्या बाबतीत या तीनही L.D.चा एक गट तयार झाला आहे असे आपल्याला म्हणता येईल. असे काही प्रसंग आपल्याच आजूबाजूला घडत असतात. त्या मुलांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर योग्य वयात अपेक्षित योग्य परिणाम साध्य होत नाही. म्हणूनच हा लेख वाचल्यानंतर जर तुमच्या आजूबाजूला कुणी असा “चौकट राजा” असेल तर न घाबरता त्याच्या पालकांना वेळीच उपचार घेण्याचा सल्ला द्या. बोलताना घाबरू नका. तुम्ही काही त्यांच्या बाळाला वेड ठरवत नाही आहात तुम्ही त्यांच्या काळजीने त्यांना सांगणार आहात. त्यातून त्यांच्या मुलाचं आयुष्य सुधारणार आहे. साधारणतः गतिमंद मुलं ही वेगळी दिसतात मात्र अध्ययन अक्षमता असणारी मुलं ही सामान्य मुलांसारखीच दिसतात, फक्त त्यांच्या काही सवयी वेगळ्या असतात काही क्रिया प्रतिक्रिया वेगळ्या असतात. त्या मुलांमध्ये सामाजिक भावना, सेल्फ बॅलेंसिंग आणि स्वतःलाच सूचना देणे यात अडथळे येतात. काही ठिकाणी काही शाळांमध्ये निरस पद्धतीने शिकवले जाते, तेव्हाही काही मुलांना लिहिण्याचा वाचण्याचा कंटाळा येतो पण कंटाळा आणि अध्ययन अक्षमता यातला फरक पालक म्हणून आपल्याला कळायला हवा. लिहिण्या वाचण्याचा कंटाळा घालवण्यासाठी कृती युक्त अभ्यासक्रमावर भर द्या, असा अभ्यासक्रम जिथे शिकवला जातो तिथे जाऊन मुलांना अनुभवातून शिक्षण घेऊ द्या!
आपल्याला L.D.चे काही वैशिष्ट्य समजून घ्यावे लागतील. जसं की असणाऱ्या मुलांचा बुद्ध्यांक 85 ते 90 च्या वर असतो. ते मतिमंद नसतात. अशी मुलं वर्गात वाचन, लेखन आणि गणितीय क्रियांमध्ये इतर मुलांपेक्षा मागे असतात. या मुलांचं वर्तन चंचल असतं. ते एका जागी बसत नाही आणि शिक्षकांना पूर्णपणे दुर्लक्षित करतात. कारक कौशल्यांमध्ये (Motor skills) असमन्वय दिसून येतो. या मुलांचा मूड सतत बदलत असतो. कधी खूप राग येतो, कधी निराशा वाटते, कधी उदास दिसतात तर कधी अति उत्साही असतात.
आता आपल्या लक्षात आले असेल की एका मुलाला अध्ययन अक्षमतेच लेबल लावण्याआधी किती खोल विचार करायला हवा. पुढील भागात आपण अध्ययनक्षमतेचे प्रमुख चार प्रकार बघणार आहोत. ही लेखमाला तुम्हाला कशी वाटते? ते मला नक्की कळवा. तुमच्या आजूबाजूला असा एखादा “चौकट राजा” असल्यास आवर्जून कळवा, जेणेकरून त्यांना काही मार्गदर्शन हवे असेल, मदत हवी असेल तर मला ती करता येईल.पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद!
