चिरखड्याचा ओरखडा
बालक पालक नात्यावर आधारित लेखमाला : ४३ :लेखिका -आदिती मोराणकर (स्पेशल एज्युकेटर व शिक्षण विश्लेषक)
आडवी रेष, उभी रेष, मध्येच गोल गोल वेटोळा
मुलांचे हे चित्र सांगते, त्यांच्या मनातील कंटाळा
जोर जोरात दाबून चिरखडे,त्या मुलाला राग ना आवरे
हलक्या, हळुवार नाजूक रेषा, त्या मुलाला सुर सापडे
रट्टा देऊन पाठीमध्ये, राग आपला दाखवता
कधीतरी त्या चित्रामध्ये आतुरतेने डोकावता ?
चित्र नसे ते असते चित्रण, भावभावना आक्रोशाचे
आपण मात्र करतो त्रागा कागद वाया गेल्याचे….
कित्येक घरातून हे असंच चित्र बघायला मिळतं. खरं तर मुलाच्या सर्वांगीण विकासाकरता कला, नाटक, नृत्य, संगीत यांचा अभ्यासाइतकाच मोठा वाटा असतो कारण अभ्यासाने आपण परीक्षार्थी म्हणून सिद्ध होतो तर या बाकी विषयांमुळे आपली मानसिक आणि शारीरिक जडणघडण होत असते.
पालकांना कलेचे महत्व फारसं कळत नाही. दहावीत गेल्यानंतर दहा ग्रेस मार्क मिळावे म्हणून इंटरमिजिएट, एलिमेंट्री परीक्षेला मुलांना बसवल जातं. कुठल्यातरी स्पोर्ट्स मध्ये उतरवलं जातं पण या दहा मार्कांच्या पलीकडे त्या खेळाला, त्या कलेला आपलं असं स्वतंत्र महत्त्व आहे याचा कोणी विचारच करत नाही. मुलं खरं तर संवेदनशील असतात. त्यांना लहानपणापासूनच रंगांची आवड असते. अर्थात त्यांना वेगवेगळ रंग आवडत असतात. आपण मात्र मुलगी जन्माला आली तर तिला गुलाबी आणि मुलगा असेल तर त्याला आकाशी रंग ठरवूनच टाकलेला असतो, असो!
रंग पाहिला की तो हातात घ्यावा, कुठेतरी देऊन बघावा, त्यांनी काहीतरी चिरखडावं असं मुलांना मनापासून वाटत असतं. मग ते अलगद तो रंग उचलतात आणि त्यांच्या हाताशी जी गोष्ट सापडेल त्याला कॅनव्हास समजून त्या रंगाची उधळण सुरू करतात. मुलं अशी चित्र काढत असताना जर आपण शांततेत, त्यांना अजिबात डिस्टर्ब न करता त्यांचे निरीक्षण केलं तर त्यांनी काढलेल्या चित्रातून ते सध्या कुठल्या परिस्थितीत आहेत, त्यांच्या मनात काय चालले आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. अनेकदा अशी चित्र काढताना मुलं स्वतःशीच बोलत असतात आणि आपण जर त्यांना ते चित्र काढू दिलं तर त्यांच्या मनातल्या भावनांचं मुक्त प्रगटीकरण झाल्यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या शांत होतात.
आपण मात्र मुलांनी खडू हातात घेतला रे घेतला कि, “इथे चित्र काढू नको, ही भिंत खराब करू नको, तिथे चिरखडू नको, तिथे अजिबात एकही ओरखडा दिसायला नकोय मला” असं म्हणत आपण त्या मुलाच्या मागेच लागतो. ते बाळ लुटुलुट पायांनी, अवखळ हसत हसत पुढे पळत असतं. नवीन नवीन जागा शोधत असतं आणि आपण त्यांनी भिंत किंवा घर खराब करू नये म्हणून त्यांच्या मागे जॉगिंग करत असतो.तरीही आपण त्यांच्या पुढे कमी पडतोच आणि अचानक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोवर त्यांनी भिंतीवर धावा बोललेला असतो. मग सुरु होतो तो रेषांचा आणि वर्तुळांचा खेळ! हा खेळ किती वेळ चालेल याचा कोणीच अंदाज देऊ शकत नाही कारण जोपर्यंत मनातली गोष्ट शून्यत्वास जात नाही, मन शांत होत नाही तोपर्यंत मुलांचं हे चिरखडणं चालूच राहतं.
आपण जेव्हा मध्ये मध्ये त्यांना सूचना द्यायला लागतो, असं कर तसं कर, फुलाचा आकार गोलच काढ अशा सूचनांनी त्यांची कल्पकता खुंटते. त्यांना दडपण येतं आणि मग ते खडू तिथेच टाकून तिथून निघून जातात. पालक म्हणून आपण ‘हुश्य’ करतो. ‘बरं झालं थोडीच भिंत खराब झाली. यांनी खडू टाकला नसता तर सगळी भिंत खरवडावी लागली असती’. तुम्हाला त्या एका भिंतीची काळजी आहे पण तुमच्या मुलाच्या भविष्याची नाही? माफ करा पण हे वाक्य खरोखर तुमच्यासारख्या पालकांना लागू पडतं ज्यांना दगड मातीच्या भिंतीची काळजी आहे पण हाडामासाच्या मुलाच्या मनाची काळजी नाही. तुम्हाला फक्त भिंत खराब होताना दिसते आहे पण ती भिंत खराब होताना आपल्या मुलाच्या मनाची पाटी कोरी होते आहे याची साधी कल्पनाही तुम्हाला नसते.
मुलांची चित्र आपल्याला काय काय सांगतात? एकदा माझ्या शाळेत एका मुलीने गाडीचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला होता. तिचं चित्र पूर्ण झालंय असं तिला वाटल्यानंतर ती ते चित्र मला दाखवायला आली तर चार चाकांपैकी तीन चाके काळी तर एक चाक लाल होते. ते बघून मी थोडी धास्तावले. इतक्या लहान मुलीने एका टायरचा रंग लाल का केला? याच कारण समजायला हवं होतं. मी ते चित्र तसंच जपून ठेवलं आणि तिच्या पालकांना शाळेत बोलावलं. ते चित्र पालकांना दाखवल्यानंतर तिची आई अतिशय अतिशय रडवेली झाली आणि अगदी अलीकडेच या मुलीचे आजोबा कारच्या चाकाखाली येऊन त्यांचे निधन झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली. मुलांच्या मनावर आजूबाजूच्या घटनांचे खोलवर परिणाम होत असतात. ते त्यांना शब्दात मांडणे कित्येकदा शक्य होत नाही. मग अशा वेळेस ही मुले चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. ती चित्र बघणार्याने लगेचच मुलाला त्याची चूक न दाखवता चित्राचा खोलवर विचार करायला हवा त्या मागचे कारण, भावना समजून घ्यायला हवी. चूक दाखवण फार सोप्प असतं आणि आपण चूक दाखवल्यावर मुलं देखील खाडाखोड करून चित्र बदलतील पण त्यांच्या मनातल्या भावना आणि त्यांच्या मनावर झालेला परिणाम कधीही पुसला जाणार नाही.
त्यांना हत्ती गुलाबी, सिंह हिरवा दाखवायचा असेल तर दाखवू द्या. हे रंग निवडण्यामागे नेमकं कारण काय आहे? हे समजून घ्या. आमच्या शाळेत एका संस्थेने चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत लहान गटाला प्रिंटेड चित्र रंगवण्यासाठी देण्यात आले होते. ज्यात एक कुटुंब दाखवलं होतं. आई, वडील आणि त्यांची दोन मुलं अस चौकोनी कुटुंब! त्यात रंग भरायचा होता. मुलांना रंग पेटी देण्यात आली आणि लगेचच रंगांचा मुक्त वापर चालू झाला. सगळ्यांचे चित्र गोळा केल्यानंतर आम्ही जेव्हा ते चित्र बघत होतो तेव्हा एका कुटुंबातील बाबांच्या चित्राला पूर्ण काळा रंग दिलेला दिसला आणि लगेच लक्षात आलं की हे चित्र आर्याने रंगवलं आहे कारण तिच्या जन्मापासूनच केवळ मुलगी झाली या कारणाने तिच्या बाबांनी तिला आणि तिच्या आईला वेगळे काढले आहे. त्यांच्याबद्दलचा राग तिने काळ्या रंगातून व्यक्त केला होता.
सुप्रसिद्ध कवी वर्ड्सवर्थ यांच्या शब्दात सांगायचं तर “फील युवर पेपर विथ द ब्रीदिंग ऑफ युवर हार्ट” अर्थात तुमच्या हातातल्या कागदावर तुमच्या हृदयाच्या ठोक्यागणिक चाललेल्या विचारांचे प्रतिबिंब उमटते.
मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी अनेक प्रयोग केले त्यातून ते एका निष्कर्षाप्रत पोहोचले तो निष्कर्ष म्हणजे मानवाच्या जाणिवेच्या आकलनाबाहेर कित्येक गोष्टी असतात. लहान मुले त्या गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही तेव्हा ही मुले चित्राच्या माध्यमातून व्यक्त होतात. लहान मुलांना चित्र काढायला वाव देणे ही मानसशास्त्रातली एक थेरपी आहे. आपलं मूल जर उदास असेल, काही खात नसेल, अभ्यासात मन लागत नसेल चिडचिड करत असेल, तर त्याला चित्र काढण्यासाठी किंवा रंगवण्यासाठी वेळ द्या, साहित्य उपलब्ध करून द्या. थोड्यावेळाने तुमच्या लक्षात येईल की त्या मुलाच्या चित्तवृत्ती पालटत आहे. वेडा वाकड्या रेषांमधून त्याच्या मनातला राग निघून चालला आहे. कागद फाटेपर्यंत जोर देऊन काढलेल्या वर्तुळा मधनं त्याचा राग गुंडाळला जातो आहे. अस्ताव्यस्त गुंतागुंतीचा आकारांमधून त्यांचा आक्रोश मनातून बाहेर पडतो आहे. मला खात्री आहे हा लेख वाचल्यानंतर जेव्हा जेव्हा तुमचं मूल चित्र काढायला बसेल किंवा हातात खडू घेऊन काही चिरखडण्याच्या तयारीत असेल तेव्हा त्या चिरखडा मधला ओरखडा समजून घेण्याकडे तुमचा जास्त कल असेल. त्यातूनच तुम्हाला तुमचं मूल समजणार आहे आणि त्या मुलाचं मोलही उलगडणार आहे.पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन विषयासह धन्यवाद!