हा छंद खिशाला कापी कसे !

लेखिका - आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक) बालक पालक नात्यावरआधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३३

0

फक्त उन्हाळ्यात यायला ‘छंद वर्ग’ म्हणजे काय आंबा आहे का? आंबा खायला जशी आपण वर्षभर वाट बघतो आणि उन्हाळ्यात आंब्यांवर ताव मारतो तसंच छंद वर्गांसाठी खरोखर उन्हाळ्याची सुट्टी लागण्याची वाट बघत बसण्याची गरज असते का?

जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, अभ्यासाचा भार खरोखर!
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, परीक्षेसाठी मेहनत सारी !
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, छंद वर्गात मन ना रमे !
एकतर आपण सांगतो म्हणून मुलांनी मान खाली घालून त्यांना आवडत नसलं तरी एखाद्या छंद वर्गात जाणे हे मला पटतच नाही, कारण ‘कोणत्याही छंदाची गोडी मुलांना आपसूक निर्माण व्हायला हवी’ असं माझं मत आहे. वार्षिक परीक्षा संपल्या आणि सुट्ट्या सुरू झाल्या की पालकांना छंद वर्ग आठवतात. तोपर्यंत वर्षभर ‘अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दुणे परीक्षा’ हेच समीकरण लागू असतं. त्यातच सोशल मीडियावरून , वर्तमानपत्रातून, पॅम्प्लेट मधून अनेक छंद वर्गाच्या जाहिराती आपल्याला भेटायला येतात आणि मग कुठल्यातरी छंद वर्गात मुलांना अडकवण्याकरिता पालकांची लगबग चालू होते.

खरंतर ‘छंद म्हणजे रिकाम्या वेळात स्वतःच्या आनंदासाठी नियमितपणे करण्याची गोष्ट !’ अशी त्याची सोपी व्याख्या करता येईल; पण आपण आपल्या सोयीने त्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. ‘ रिकाम्या वेळात’ हे शक्य नाही कारण आपल्या मुलांना वर्षभर रिकामा वेळच नसतो. ते सतत कुठे ना कुठे, कशात ना कशात अडकलेले असतात. बरं व्याख्येतला पुढचा भाग बघाल तर त्यात छंद म्हणजे ‘स्वतःच्या आनंदासाठी करण्याची गोष्ट’ असं म्हटलं आहे पण मुलांचा आनंद कशात आहे हे न बघता आपल्या आजूबाजूची चार मुलं काय करत आहेत त्यातच आपल्या मुलांनाही आनंद वाटेल असं गृहीत धरून आपण छंद वर्ग निवडता. यातून मुलांचा छंद विकसित झाला का तुमचा छंद भागला हे देवालाच माहीत!

छंद हे शीण घालवण्याचे उत्तम साधन आहे. आपल्या आवडीचं काम रोज दहा मिनिटे जरी केलं तरीही मनाला नवी उभारी येते म्हणूनच छंद महत्त्वाचे असतात. आपण मुलांना वर्षभर अभ्यासाच्या जोखडा खाली ठेवून उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांचं जोखड उतरवतो आणि छंद वर्गाचे नवीन जोखड त्यांच्या मानेवर ठेवतो. आपल मूल खरोखर तिथे जाऊन आनंद मिळवत आहे का? हे आपण बघतही नाही.

आत्ताच्या छंद वर्गात गाणी, गोष्टी, चित्रकला, हस्तकला यावर भर दिला जातो पण खरंच खोलवर विचार केला तर वर्षभर अभ्यास करताना ज्या गोष्टी आपण मागे टाकल्या, छंद वर्गात जाऊन त्याचा बॅकलॉग आपण भरून काढतोय की काय असंच वाटतं.

मी कधीतरी एकदा एक जोक ऐकला होता. एक सरदारजी जेवायला बसतो तेव्हा जेवणात मिठ नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. तरीही बायकोला दुखवायचं नाही म्हणून ते आळणी जेवण तो जेवतो. जेवण झाल्यानंतर बायकोला सांगतो की “तू जेवायला बसतांना स्वयंपाकात मीठ टाकून जेव”. त्याची बायको डोक्यावर हात मारून घेते आणि लगेचच त्याच्या हातावर चमचाभर मीठ ठेवते. तो कारण विचारतो तर ती म्हणते “आता हे मीठ खा आणि दोन चार उड्या मारा म्हणजे खाल्लेल्या जेवणात मिठ मिसळलं जाईल.” खरोखर आळणी जेवणानंतर चमचाभर मीठ खाल्ल्याने तोंडाची चव सुधारणार आहे का? नाही ना? मग तसं काहीसं महत्त्व आपल्या आयुष्यात “छंदांना” असतं! ते अगदी ‘चिमूटभर का होईना पण रोज’ असावे लागतात. वर्षभर आळणी अभ्यास करून नंतर छंद वर्गात जाऊन बरणीभर मीठ खाण्यात काय गंमत आहे?

बिल गेट्स उदाहरण पाहिलं तर आत्ताचा छंद उद्याचं आपलं करिअरही असू शकतं.  छंद म्हणून कंप्यूटर हॅक करणारे बिल गेट्स आज मायक्रोसॉफ्टचे अनभिषिक्त सम्राट आहेत.

चांगले छंद आपल्याला निराशेपासून, व्यसनांपासून कायम लांब ठेवतात.. आयुष्यात अपयश, तणाव येतच असतात. अशावेळी कुठल्याही व्यसनाला जवळ न करता जर आवडीचा छंद जोपासला तर तो आपल्याला अजून उत्साह देतो, कणखर बनवतो आणि दुप्पट आत्मविश्वास देतो.

लहान मुलांच्या छंदाची व्याख्या आपण खूपच संकुचित केली आहे असं मला वाटतं .‘मुलांना सुट्ट्यांमध्ये कशात तरी गुंतवून ठेवण्याचं माध्यम म्हणजे छंद वर्ग’ अशी छंद वर्गांची ओळख नव्याने होत आहे. छंद फक्त सुट्टी पुरता किंवा छंद वर्गाच्या चार भिंतीत अडकलेला नसावा तर त्याचा वावर आपल्या रोजच्या जीवनात असावा. बरं , नुसतं छंद वर्गात टाकून पालक मोकळे होतील तर शपथ!  तिथे जाऊन त्या छंद वर्गाच्या बाईंनाही हे ‘मोलाच्या चार सूचना’ देऊन येतात. जसं शाळेत आपलं मूल पहिलं येत तसेच छंद वर्गांच्या ‘ऍक्टिव्हिटीज’ मध्ये सुद्धा आपल्या मुलांनीच बाजी मारावी असा त्यांचा आग्रह असतो म्हणजे तिथेही मुलांना छंदाचा, चित्रकलेचा, गाण्याचा, मनमुराद आनंद पालक लुटूच देत नाही. कधीतरी मुलांच्या छंदात मनमोकळा सहभाग घेऊन बघा, त्यासाठी त्यांना थोडासा वेळ देऊन बघा. त्यातून मुलांना जो आनंद मिळतो ना त्याच्या दुप्पट आनंद तुम्हालाही मिळेल. हे सांगण्या मागचं कारण म्हणजे अल्व्हिन रोझनफेल्ड या बालमानसतज्ञाने सांगितलेला सिद्धांत!

या सिद्धांतानुसार छंदांची सुरुवात ही पालकांनीच करावी. विशेषतः मुलं लहान वयात असतानाच करावी. कारण २-३ वर्षाची असल्यापासून मुलं जर आई-वडिलांचा छंद अनुभवत असतील, बघत असतील, तर तोच छंद मुलांसाठी वेळेचा सदुपयोग करणारा ठरू शकतो. त्याच छंदामध्ये तुमचं मूलही रुची घेऊ लागतं आणि तुमचा छंद तोच मुलांचा छंद बनतो.

(सुचना:- तुमचा छंद सतत टीव्ही मोबाईल लॅपटॉप बघणे हा असेल तर मात्र वेळीच सावध व्हा!)मुलांना छंदांची गोडी निर्माण व्हायला हवी यासाठी योग्य आणि पोषक वातावरण निर्माण करावं लागतं. त्याकरिता पालकांना वेळही द्यावा लागतो. नुसतंच ‘मूँह मांगे दाम’ देऊन हॉबी क्लासेसला किंवा समर कॅम्पला पाठवून आपल्या कर्तव्याची इती पूर्तता करू नका. मुलांना छंद वर्गाला नेणे आणि परत घेऊन येणे यात पालक म्हणून कुठलेही स्किल लागत नाही. त्या मुलाला घडवणे यासाठी ‘कौशल्य’ लागते.

छंद वर्गात पाठवण्यासाठी तुमच्याकडे हजार कारण असतात. मुलांना छंद वर्गात घातलं की सुट्टी वाया जात नाही, घराबाहेर राहायची सवय मोडत नाही, सोशलायझेशन होतं, घरात मोबाईल, कार्टून टीव्ही बघण्यापेक्षा छंद वर्गात गेलेलं बरं, मामा-मामी दोघे नोकरी करतात मग गावाला पाठवण्यापेक्षा छंद वर्गात पाठवायचं, मुलांना सुट्ट्या लागल्या पण आम्हाला सुट्ट्या नाही मग त्यांना कुठेतरी एंगेज करायला नको का? ही सगळी कारण कुटुंबापरत्वे बरोबर असली तरीही तो मातीचा गोळा घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. ती जबाबदारी चार पैसे देऊन दुसऱ्या कुणावर टाकणे बरोबर नाही.

छंद वर्गात येणाऱ्या जाणत्या वयाच्या मुलांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या असतात. “आमच्या आई-वडिलांना वेळच नाही आमच्यासाठी म्हणून इतक्या सगळ्या क्लासेस मध्ये आम्हाला अडकवून ठेवले”, “हे मला करायला आवडते की नाही हे कोणी मला विचारलं नाही. आता काय त्यांनी पैसे भरलेत म्हटल्यावर करावंच लागेल मला”,  “खरं तर घरी बसून मनसोक्त कॅरम खेळायचा होता, पत्त्यांचे डाव टाकायचे होते, आजी आजोबांशी गप्पा मारायच्या होत्या पण मम्माने या हॉबी क्लासला पाठवून सगळीच गडबड केली” या प्रतिक्रियांमध्ये तुम्ही त्या हॉबी क्लास साठी भरलेला पैसा पाण्यात गेला हे तर स्पष्ट होतच पण ज्या मुलांच्या काळजीने तुम्ही हे सगळं केलं त्याच मुलांच्या मनातला तुमच्याबद्दलचा रागही लक्षात येतो.

खरंच विचार करा, वर्षातले दहा महिने शिक्षणाला वाहून घेतलेले मुल जर एक महिना घरी राहिलं, आई-बाबांसोबत खेळलं, आजी आजोबांशी गप्पागोष्टी करण्यात रमलं, मामाच्या-आत्याच्या गावाला गेलो तर ते काहीच शिकत नाही का? आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या प्रेमातून संस्कार शिकतात, प्रवास केल्याने व्यापक दृष्टिकोन मिळतो. कुटुंबाच्या पलीकडील माणसांचा सहवास लाभल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कळतात. नातेवाईकांमध्ये चांगली नाती निर्माण होतात आणि घरातही काही ना काही गुडगुड करून छोटी-मोठी कौशल्य ते आत्मसात करतात. त्यातूनच त्याचा छंद जोपासला जातो आणि तुमच्या मुलाची नैसर्गिक आवड काय आहे? छंद काय आहे? हे तुम्हालाही त्याला कुठल्याही क्लासमध्ये न घालता लक्षात येतं. आपलं घरच छंद वर्ग होऊ शकतं आणि यासाठी आपल्याला कुठलीही फी भरावी लागत नाही. फक्त मुलांसाठी थोडसं ‘फ्री’ असावं लागतं. काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सुचवते बघा तुम्हाला तुमच्या मुलांसोबत त्या करता येतात का!

झाडांना एकत्र पाणी द्या झोपताना अंथरून घालणे- काढणे एकत्र करा एकत्र बसून भाजी निवडा,घरी येणाऱ्या वर्तमानपत्रातील मासिकातील आवडीची चित्र कापून त्या चित्रांचा संग्रह करा,चित्र फाडून परत जुळवणे, गाण्यांच्या भेंड्या, गावांच्या नावांच्या भेंड्या, नकाशा वाचन, स्वयंपाक घराची माहिती, बँक- पोस्ट अशा ठिकाणी नेऊन तिथल्या व्यवहारांची माहिती द्या, मागच्या वर्षीच्या उरलेल्या वह्यांची कोरी पाने काढून त्याची वही बनवा, आपल्या कामाच्या ठिकाणी शक्य असल्यास मुलांना घेऊन जा, आपण किती कष्ट करतो, कोणते काम करतो हे मुलांनाही कळू द्या. आपल्या लहानपणीच्या आठवणी, आजी आजोबांच्या गावाकडच्या गमती जमती मुलांना सांगा.. मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या सुट्टीतही त्यांच्या इयत्ता नुसार किमान एक तास अभ्यासासाठी घरातल्या नेमून दिलेल्या ठिकाणी बसवा. मुलांना पुस्तक विकत घेऊन द्या. त्यांना खेळू द्या, पडू द्या, त्यातूनच त्यांचं भविष्य भक्कम होणार आहे हे लक्षात ठेवा. मुलांना भरपूर रंग आणून द्या, कोरे कागद आणून द्या आणि त्यांच्या मनात जे येईल ते कोऱ्या कॅनवास वर उमटू द्या. कुठल्यातरी छंद वर्गात ठरवून दिलेल्या चौकटीत काम करण्यापेक्षा अव्यक्त मनातील व्यक्त भावना मनाची चौकट मोडून बाहेर येतील आणि त्या कोऱ्या कागदावर दिसेल तुमच्या मुलाच्या मनातला आनंद जो तुम्हालाही आनंदीच करेल याची खात्री बाळगा.

माझा छंद वर्गाला अजिबात विरोध नाही पण मोबाईल, टॅबलेट पासून लांब ठेवण्यासाठी किंवा आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही म्हणून किंवा स्टेटस म्हणून मुलांना अडकवु नका. छंद हा मनापासूनच असायला हवा. मन आणि भावना यांचा कॉम्बिनेशन जमायला हवं तरच प्रगतीची गाडी सुसाट धावेल. छंद म्हणजे काय मॅगी नाही दोन मिनिटात तयार व्हायला किंवा छंद म्हणजे अंबाही नाही फक्त उन्हाळ्यात यायला. वर्षभराच्या मशागतीनंतर शेतकरी सुद्धा मृगाचा पाऊस पडेपर्यंत जमिनीला विश्रांती देतो पण आपण मात्र शैक्षणिक वर्षात काटेकोर शिस्त पाळणाऱ्या आपल्या मुलांना उन्हाळी सुट्टीतही विश्रांतीच देत नाही. त्यांचा रिफ्रेश होण्याचा हा काळ वेगवेगळ्या क्लासमध्ये नाहीतर छंद वर्गात व्यतीत करायला आपण त्यांना भाग पाडतो.  माझी पालकांना एक मनापासून विनंती आहे की मुलांची आवड पाहून प्रोत्साहन द्या मग बघा ते कसे छान प्रगती करतात.

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन व डे केअर सेंटर.

eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!