………कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण !

लेखिका - आदिती मोराणकर : बालक पालक नात्यावर आधारित  लेखमाला : ४२

0

श्रावण महिना सुरू झाला की कहाण्या सुरू होतात.ऐका देवा गणेशा तुमची कहाणी…..ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण! आपल्या पूर्वजांनीही आपल्याला ज्या कान पिचक्या द्यायच्या आहेत त्या गोष्टीच्या स्वरूपात लिहून ठेवलेल्या आहेत. 

येणारी प्रत्येक नवीन पिढी ही मागच्या पिढीतल काहीतरी सोडून देत असते. मागच्या पिढीच ऐकत नसते, मग आपलं म्हणलं नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच प्रभावी माध्यम काय? तर गोष्ट, कहाणी! आपल्या पूर्वजांनी नेमकी हीच नस ओळखली आणि आपल्यासमोर देवतांच्या, त्यांची पूजा करण्याच्या पद्धतीच्या, दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या, वेगवेगळ्या कहाण्या आल्या. वर्षभर कदाचित वेळ न काढणारे आपण श्रावणात मात्र हमखास या कहाण्या वाचतो. आपसूक हात जोडले जातात, देवाला दोन फुल वाहिले जातात आणि दिवस कसा प्रसन्न होतो. याच कहाण्या जर मोठ मोठ्या पुस्तकात छापून तुमच्या हातात दिल्या असत्या किंवा एक एक कहाणी पाच पाच वेळा वहीत लिहायला लावली असती तर तुम्ही काय केलं असतं? विचार करूनच थकलात ना! मग या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांबरोबर का करता? त्यांना शिकवायची गोष्ट  फक्त पुस्तकातूनच मिळणार आहे, ट्युशनमध्ये जाऊन ‘वहीवर लिहिल्यानीच’ समजणार आहे, असं तुम्हाला का वाटतं? तुम्ही सांगितलेल्या एखाद्या छोट्याशा करमणूक प्रधान गोष्टीतूनही मुलाचे शिक्षण साधले जाऊ शकते! पण आपल्याला गोष्ट सांगायला वेळच नाही किंवा “गोष्ट ऐकत बसणे हे वेळ वाया घालवणे आहे” अशी धारणा कदाचित आपली झाली असावी.“किती वेळा तुला सांगू? ही गोष्ट अजूनही तुला जमत नाही.” या वाक्यात ‘गोष्ट’ हा शब्द तुम्ही वापरता पण ती क्रिया समजण्यासाठी तुम्ही मुलांना गोष्ट सांगतच नाही. मग ती गोष्ट त्याला कशी जमणार?

अगदी अलीकडेच एक समस्या घेऊन एक कुटुंब माझ्याकडे आले होतो. नवरा, बायको, मुलगी, मुलगा असे चौकोनी कुटुंब! त्यात त्यांच्या लहान मुलाला “टुथब्रशला किती पेस्ट लावायची हे मी कसं शिकवू?” असं ती आई विचारत होती. मी तिला म्हटलं,”तुम्ही कसे शिकवताय?” ती म्हणाली, ”तो ब्रश करायला उभा राहिला की मी त्याला रोज सांगते अगदी वाटाण्याएवढी पेस्ट घे. मग तो टुथपेस्टची ट्युब इतकी जोरात दाबतो की वॉश बेसिनचे सुद्धा दात घासले जातील इतकी पेस्ट बेसिनमध्ये सांडतो.” मला क्षणभर हसूच आवरलं नाही. कसंबस हसणं लपवत मी त्यांना म्हणाले,”जी गोष्ट त्याला शब्दातून कळत नाही, त्याला इतर कृतींची जोड देऊन बघा!” (असे अवजड शब्द वापरले की पालक उगीच कन्व्हिन्स होतात. त्यांना वाटतं की आता आपण खूप काही वेगळं ऐकणार आहे. अर्थात मला जसं प्रत्येक मूल वेगळं भेटतं, तसे प्रत्येक पालकही वेगळेच भेटतात म्हणून मला प्रत्येक पालकाची किल्ली शोधावी लागते.) तर, मी त्या आईला असं सांगितलं की शब्द आणि त्या मुलाला शब्द समजत नसेल तर त्याला कृतीची जोड द्या. म्हणजे काय करायचं?

तर रात्री झोपताना त्याला गोष्ट सांगायची. ज्या गोष्टीमध्ये काही काल्पनिक पात्र असतील आणि ते दात घासायला उभे असतील. त्यातील सगळी पात्र थोडी थोडी पेस्ट घेतील पण एक मुलगा मात्र गरज नसताना भरपूर पेस्ट घेईल. असं करता करता काही दिवसांनी त्या मुलाची पेस्ट संपते पण इतरांनी मात्र थोडी थोडी वापरल्यामुळे त्यांची बऱ्यापैकी उरलेली असते. मग या मुलाला दुसऱ्याकडे पेस्ट मागण्याची वेळ येते, तेव्हा त्याला कळतं की गरज नसताना आपण आपली पेस्ट उगीचच वाया घालवली आहे. दुसऱ्याकडे मागायला त्यालाच लाज वाटते मग तो दात घासायला जातच नाही. दोन दिवस जातात, चार दिवस जातात, दात दुखायला लागतात. चार दिवस दात न घासल्यामुळे दाताला कीड लागते आणि त्या मुलाचा त्रास अजूनच जास्त वाढतो. त्याच्याबरोबरचे त्याला थोडी पेस्ट देतात आणि सांगतात ‘दात घास म्हणजे दात दुखणे थांबेल.’ तो पटकन दात घासतो आणि त्याच्या लक्षात येतं की “अरे इतक्या कमी पेस्ट मध्ये सुद्धा दात छान स्वच्छ होतात की आपण उगीच जास्त पेस्ट वाया घालवत होतो” दुसऱ्या दिवशीपासून तो कमी पेस्ट मध्ये दात घासायला लागला. असा तो मुलगा शहाणा झाला! ही अशी गोष्ट तुम्ही मुलाला आठवडाभर रोज रात्री सांगितली तरी त्या मुलाला अर्थ लक्षात येईल आणि त्याप्रमाणे तो वागेलंही.

“गोष्ट सांगून सुद्धा जर मुलाला समजलं नाही आणि तो रोज ‘वॉश बेसिनचेच’ दात घासत राहिला तर?” त्याच्या आईने पुढचा गुगली टाकला. “मग तो दात घासायला उभा राहिला की त्याच्या बरोबरीने तुमचं सगळं कुटुंबच उभे रहा दात घासायला आणि तुम्ही थोडी थोडी पेस्ट घ्या, पेस्ट घेताना आवर्जून एकमेकांशी बोला “मी बाई थोडीच घेतली पेस्ट! बाळा, तू पण थोडी घे. बाबा, तुम्ही पण कमीच घेतली ना?” अशी वाक्य एकमेकांशी बोलत रहा. ज्याचा परिणाम आपोआप मुलांवर होतो. गोष्टीतन कृतीत कसं वागायचं? हे मुलांना हमखास कळतं. काहींना लवकर कळतं, काहींना थोडं उशिरा कळतं पण कळतं. फक्त आपण गोष्टी सांगण्याचा कंटाळा करायला नको.”

आता दारावर चिमणीचा चोचीची टकटक येत नाही, बाहेर झाडावर कावळ्याची काव काव ऐकू येत नाही तर आपण मुलांना जेवताना सांगण्याच्या चिमणी कावळ्याच्या गोष्टीही विसरून चाललोय. आता मुलांना जेऊ घालतांना युट्युबवरचा “पेपा पिग नाहीतर डोरेमोन” आपल्या मुलांचं मनोरंजन करत असतात. ‘ते बघता बघता आपलं मूल दोन घास जास्त खाते’ या आनंदाने मातेचे उर भरून येत असते. बरे झाले याच्यामागे घरभर फिरून याला खाऊ घालायचं म्हणजे पायाचे तुकडे पडतात आणि खरकट आवराव लागत त्यापेक्षा एका ठिकाणी बसून हातात मोबाईल दिला की बाळ कसं निमुटपणे खातं. आपण फक्त वाटीतलं चमचात आणि चमच्यातलं तोंडात टाकायचं ती झाली आपली ‘आईच्या कर्तव्याची ईतीपूर्तता !’

हे सगळं बघून फार वाईट वाटतं. आजकाल नुसतं फिरायला म्हणून बाहेर पडलं तर आईच्या बोटाला धरून चाललेलं मूल उत्सुकतेने आजूबाजूच्या गोष्टींकडे बघत असतं आणि आई मात्र सातत्याने फक्त मोबाईल बघत असते किंवा फोनवर बोलत असते. हॉटेलमध्ये जावं तर आई-बाबा जेवण करेपर्यंत त्या वर्ष- दीड वर्षाच्या बाळाच्या हातात मोबाईल कोंबलेला असतो. कुठे प्रवासाला निघावं तर खिडकी बाहेर पळणारी झाड बघण्याची दृष्टी या मोबाईलने हिरावून घेतलेली आहे.

माझा राग मोबाईलवर नाही, तर पालक म्हणून मुलांना गुंतवून ठेवायला आपण कमी पडतोय यावर आहे. जरा सारासार विचार केला तर लक्षात येईल की आजकाल पालकांचे मुलांशी फक्त “वाद होतात संवाद नाही” याला जबाबदार कोण? मुलं पालकांशी उद्धटपणे बोलतात, आदर देत नाहीत, याला जबाबदार कोण? मुलांना एखादी गोष्ट करावीशी वाटली तर ते पालकांची परवानगी घेत नाहीत, याला जबाबदार कोण? मुलांना आलेल्या अपयशासाठी मुले पालकांना जबाबदार धरतात, ही चूक कोणाची? या सगळ्याचे पालक म्हणून आपण जबाबदार आहोत हे कधी कळणार तुम्हाला? मला लहानपणीची एक गोष्ट आठवते. तो रामू नावाचा मुलगा शाळेमध्ये छोट्या छोट्या चोऱ्या करत असतो. कधी पेन्सिल आण. कधी खोड रबर चोरून आण, पण त्याची आई त्याला कधी थांबवत नाही. तिला वाटतं बर आपली जबाबदारी कमी झाली. पेन्सिल खोडरबरची आपोआपच सोय होतेय. पण हीच चोरीची सवय मोठा झाल्यावर जेव्हा राजूला दरोडेखोर बनवते आणि त्याला पोलीस पकडून नेत असतात तेव्हा त्याची आई त्याला भेटायला येते. तो आईच्या कानाला जोरात चावतो आणि म्हणतो, “का मला लहानपणापासून चांगल्या गोष्टी नाही सांगितल्यास? का नाही थांबवलं मला चोरी करण्यापासून? पहिली चोरी केली तेव्हा माझ्या कानाखाली आवाज का नाही काढला?” ही गोष्ट कितीही जुनी झाली तरी प्रत्येक पिढीतल्या पालकांना लागू पडते हे दुर्दैवच म्हणावं लागेल.

तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. एकदा बेडकांवर एक प्रयोग केला गेला. पहिल्या प्रयोगामध्ये पाणी उकळून त्यात एका बेडकाला टाकल. त्या पाण्याचा चटका बसताच बेडकाने टुणकन बाहेर उडी मारली आणि आपला जीव वाचवला. दुसऱ्या प्रयोगामध्ये काही बेडकांना पाण्यात सोडले गेले. त्या पाण्याचे तापमान अगदी हळूहळू वाढवण्यात आले. पाण्यातल्या बेडकांनी हळूहळू वाढणाऱ्या तापमानाबरोबर स्वतःला ऍडजेस्ट केलं. ते पाण्यातून उडी मारून बाहेर आले नाहीत. हळूहळू पाण्याच तापमान इतकं वाढलं की ते सगळे बेडूक उष्णतेमुळे पाण्यात मेले पण पाण्यातून बाहेर येण्याची हुशारी त्यांना सुचली नाही. पहिल्या प्रयोगातही बेडूकच होतं आणि दुसऱ्या प्रयोगातही बेडूकच होते. मग पहिल्या प्रयोगातल्या बेडकाला जे शहाणपण सुचलं ते दुसऱ्या प्रयोगातल्या बेडकांना का नाही सुचलं ? याचं कारण असं आहे की, पहिल्या प्रयोगामध्ये सामान्य वातावरणातन अचानक गरम पाण्यामध्ये टाकलं, तेव्हा बेडकाला तो फरक कळला आणि त्याने तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या प्रयोगात आपल्या आजूबाजूचं वातावरण बदलत आहे हे त्या बेडकांना लक्षातही आलं नाही. कारण पाण्याच तापमान हळूहळू वाढलं. बदलणाऱ्या वातावरणात सातत्य होतं पण आकस्मिक बदल नव्हता. आपल्याला जेव्हा आकस्मिक बदलाला तोंड द्यावे लागत तेव्हा आपण दोन पर्यायांपैकी कुठल्यातरी एक निवडतो, “फाईट किंवा फ्लाईट!” एक तर आपण त्या परिस्थितीशी ‘फाईट’ म्हणजे सामना करतो किंवा त्या परिस्थितीतून, त्या वातावरणातून ‘फ्लाईट’ म्हणजे बाहेर पडतो. त्या प्रयोगातले प्राणी बेडूक होते पण आपण तर सुपीक मेंदू वाले मनुष्य प्राणी आहोत ना? मग आपल्याला वेळीच शहाणपण यायला नको का? हळूहळू ज्या गोष्टींनी आपल्या आयुष्यात शिरकाव करून आपल्यावरच ताबा मिळवायला सुरुवात केली आहे, त्या गोष्टींच्या विळख्यातून बाहेर पडण्याची बुद्धिमत्ता, बाहेर पडण्याचे उपाय आपल्याकडे असताना आपण का ‘फाईट’ करत नाही आहोत आणि जर फाईट करण्याची भीती वाटत असेल तर ‘फ्लाईट’ का करत नाही? त्यातून बाहेर का पडत नाही? उलट आपल्या या भूमिकेमुळे आपल्या मुलांवरही त्याचा परिणाम होतो आहे, हे पालक म्हणून आपण लक्षात घ्यायला हवं.

आपण जे करतो तेच आपली मुलं करतात. आपण जे करत नाही ते आपली मुलं करत नाही. आपण जर हात जोडून शुभंकरोती म्हणायला बसलो तर आपोआप आपली मुलं आपल्या मागे हात जोडून शुभम करोती म्हणतील. आपण जर मोबाईल घेऊन व्हिडिओ बघत बसलो, फेसबुक, व्हाट्सअप बघत बसलो ,तर आपली मुलं काय करणार हे मी नव्याने सांगायला नको. “मी मोबाईल बघणार, तोवर तू मात्र होमवर्क कम्प्लीट कर.” ही तुमची अपेक्षा तद्दन वेडेपणाची आहे. मूल तुम्हालाच लिहिताना बघत नाही तर ते का लिहीतील? मुलांनी जर लिहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही एखादी वही पेन्सिल घेऊन त्याच्यासमोर बसा. काही नाही तर किमान दिवसभराचा हिशोब लिहून ठेवा, दिवसभरातल्या आवडलेल्या दोन गोष्टी लिहा, न आवडलेल्या दोन गोष्टी लिहा, पण आपल्याला ते करायचं नसतं. आपलं म्हणजे ‘आमचा अभ्यास झालाय करून, आता तुम्ही अभ्यास करा’ हे म्हणणं मुलांवर किती अन्यायकारक असत याचा कधीतरी विचार करा.

आपले शिक्षक कसलेले होते आणि आपल्या वेळेस परवच्याची, पाढे म्हणण्याची, बाराखडीची उजळणी करून घेण्याची पद्धत होती. हा परवाचा किंवा उजळणी करण्यासाठी आपण कुठे शेजारीपाजारी ट्युशनला जात नव्हतो. घरातली वडीलधारी मंडळी आपल्याकडून हे सगळं करून घेत होती. आपण चुकलो तिथे आपल्याला सुधरवत होती, आणि रात्री झोपताना संस्कारक्षम चार गोष्टी सांगून आपल्याला अलगद निद्रा देवतेच्या आधीन करत होती, म्हणून आपण अजूनही टिकलो आहोत. आत्ताच्या पिढीतल्या मुलांना कुठे मिळतात अशी वडीलधारी मंडळी? आई वडील म्हणून आपण आपला किती वेळ देतो मुलांना ? कधी त्यांचा अभ्यास घेतो? कधी त्यांना शुभंकरोती म्हणायला शिकवतो? कधी त्यांचं म्हणणं लाडिकपणे ऐकून घ्यायला, त्यांच्याजवळ निवांत बसायला, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून डोक्यावरून हात फिरवायला आपल्याला वेळ असतो? आपल्या या चौकोनी कुटुंबात कुठेतरी केंद्रस्थान हवं की नको? का चार जण चार कोपऱ्यातच असले पाहिजेत? याला कुटुंब म्हणतात का? हे कुटुंब एकत्र आणण्याची जबाबदारी पालक म्हणून आता आपण उचलायला हवी. लहान लहान गोष्टी सांगून छोटे छोटे संस्कार आपल्या मुलांना द्यायला हवेत. आजकाल समाजात कोणीही आदर्श उरलेले नाहीत, अशा वेळेला आपल्या डोळ्यासमोर ज्यांना आदर्श म्हणून आपल्या आई-वडिलांनी मांडलं ती मंडळी आपल्याही मुलांपर्यंत गोष्टीरुपातून पोहोचायला हवेत. त्यांचे संस्कार, त्यांचे स्वभाव विशेष, त्यांनी अडचणींवर मात करण्यासाठी दाखवलेल धैर्य, त्यांनी दुसऱ्याला मदत करताना दाखवलेला मनाचा मोठेपणा, छोट्या छोट्या गोष्टींची जाणीव आयुष्यभर जपण्याची त्यांची प्रवृत्ती, ही गोष्टी रुपातून जर आपल्या मुलांपर्यंत पोहोचली तर आपल्या मुलांचे आयुष्याचे आणि भविष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. शक्य झालं तर अगदी आजपासून तुमची महत्त्वाची काम संपल्यानंतरचा किमान एक तास तुमच्या मुलांना द्या. पंधरा मिनिटं त्यांचं म्हणणं समजावून घ्या, पंधरा मिनिटे त्यांच्याबरोबर एखादा खेळ खेळा, 15 मिनिटं एखादी गोष्ट सांगा आणि पुढचे पंधरा मिनिटं ‘या गोष्टीतून तुला काय समजलं’ हे त्यांच्याकडून समजून घ्या आणि बघा चार वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये विभागलेल्या तुमच्या कुटुंबाचा प्रवास एक कुटुंब म्हणून केंद्रबिंदूकडे कसा सरकायला लागतो ते! लवकरच तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचाल, अशी आशा बाळगते आणि लेखणीला विश्राम देते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन विषयासह धन्यवाद!
आदिती मोराणकर (स्पेशल एज्युकेटरव शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन व डे केअर सेंटर.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!