लेबलिंग ते एनेबलिंग : प्रवास आणि प्रयास – भाग १
बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३८ ; लेखिका :आदिती मोराणकर
एकदा एक माणूस पेरू घेऊन तो पिळत बसला होता. बराच वेळ झाला तरी तो पेरू मऊ पण होईना आणि त्यातून रसही बाहेर येईना. त्याचा हा प्रयत्न ज्या ज्या लोकांनी पाहिला, त्या लोकांनी एक तर त्याला वेड ठरवलं, नाहीतर हा अति शहाणा काहीतरी रिकामे उद्योग करतोय असा समज करून ते पुढे निघून गेले. एका माणसाला मात्र त्याची ही कृती बघून मोठा प्रश्न पडला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याने प्रश्न विचारलाच,“तुम्ही पेरू असा का पिळताय ?”तो माणूस एखाद्या वेड्या माणसाकडे पहावं तसं बघत म्हणाला,“अहो.हा आंबा आहे मी त्याचा रस काढतोय!” प्रश्न विचारणाऱ्या माणसाने डोक्यावर हात मारला आणि तिथून काढता पाय घेतला.आपल्या हातात नक्की काय आहे? याची जाणीव नसल्याने पेरू पिळायचा व्यर्थ प्रयत्न करून तो माणूस वेड्यात निघाला. त्याच्या या वायफळ प्रयत्नांमुळे त्याला आंब्याचा रस तर मिळालाच नाही पण हातात असलेल्या पेरूची चव देखील घेता आली नाही.
जरा विचार करून बघा, आपणही असाच वेडेपणा तर करत नाही ना? दुसऱ्याच्या घरात आंब्याचा रस निघाला आहे म्हणून आपल्या घरचा पेरू पिळून तुम्हालाही आमरसाचा स्वाद घ्यायची इच्छा तर होत नाहीये ना? त्यांनी त्यांच्या आंब्याचा रस केला असेल तर तुम्ही तुमच्या पेरूचं आईस्क्रीम करा की! ज्यातून जे उत्तम होतंय ते घडवा. पेरूला आंबा बनवण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. आपल्याला पेरू मिळाला आहे, तो खडबडीत असणार आहे, चावतांना त्याच्या बिया दाताखाली येऊन त्रास देणार आहेत, हे सगळं मान्य करा आणि जोमाने कामाला लागा!
तुम्हाला वाटेल आज हे काय आंबा,पेरू,सफरचंद, पपई? आज काय फ्रुट सलाडचा बेत आहे की काय! फळांची उदाहरणे दिली कारण आपली मुलं ही देखील या फळांप्रमाणेच असतात नाही का? कुणाला सफरचंद मिळतं ,कुणाला आंबा तर कुणाला पेरू! आपल्या हातात कुठलं फळ आहे याचा विचार केला आणि ते स्वीकारलं तरच ते ‘फळ आपण गोड मानून’घेणार आहोत.
आंब्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर आंब्याचंही बालपण हे आंबटच असतं.उन्हात रापल्यानंतर त्याच्यात गोडवा उतरतो आणि तो गोडवा वर्षभर आपल्या जिभेवर रेंगाळतो,आपल्याला वेड लावतो आणि आंबा फळांचा राजा ठरतो. तुम्ही म्हणाल ‘आम्हाला फक्त गोड आंबा खायला आवडतो पण त्याच्या आधीची आंबट कैरी मात्र नको वाटते’, तर कैरी शिवाय आंबा मिळणारच नाही ना! मग अशी वेडी अपेक्षा करून कसं चालेल? आज जर तुमच्या मुलांचं बालपण तुम्हाला थोडसं खट्टू करणार असेल तर घाबरू नका. ‘आपलंही मूल उद्या आंब्यासारखं गोड होणार आहे’ असा सकारात्मक विचार करा आणि या आंबट कैरीचे रूपांतर गोड आंब्यामध्ये करण्यासाठी जसा सूर्य तळपतो, त्याच प्रकारे त्या कैरीला सोबत देण्यासाठी पालक म्हणून तुम्ही तयार व्हा.
जेनी शाळेत आली ते माझ्या शाळेचं पहिलंच वर्ष! तिच्या वयाची इतर मुलं बोलायला लागली होती, मात्र जेनी बोलत नाही याची खंत घेऊनच तिच्या आईने शाळेत पहिलं पाऊल टाकलं होतं. थोडसं निरीक्षण केलं असता जेनी बोलते आहे पण तिचे शब्द इतर मुलांसारखे नाहीत किंवा वाक्य कसं बनवायचं याची ओळख जेनीला अजून झालेली नाही असं माझ्या लक्षात आलं.
श्रिया आली तेव्हा तिला सुद्धा बोलता येत नव्हत. तिला काय होतंय? तिला काय वाटतंय? हे तिला शब्दांमध्ये सांगता येत नसल्याने हातात येईल ती वस्तू समोरच्याला फेकून मारायची आणि त्याचे लक्ष वेधून घ्यायचं, एखादी वस्तू हाताशी नसेल तर जोरात किंचाळायचं आणि किंचाळूनही कोणीच लक्ष दिले नाही तर स्वतःच डोकं भिंतीवर किंवा जमिनीवर आपटून घ्यायचं आणि आपल्या पालकांना आपल्याकडे लक्ष द्यायला भाग पाडायचं, अशा अनेक पद्धती श्रिया वापरत असे. तिच्या या वागण्याला तिच्या आई-वडिलांनी “हट्टीपणाचे” लेबल लावलं होतं. “खरंतर,ती हट्टी नाही! तिला फक्त तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी पर्याय शोधावा लागतोय,कारण तिच्याकडे तिचं म्हणणं मांडण्यासाठी ‘शब्दच’नाहीत.”हे तिच्या पालकांना लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि आता यावर काय करायचं याविषयी पुढे चर्चा सुरू झाल्या.
हल्ली माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच नवीन पालकांना ‘माझ्या मुलाला काहीतरी लर्निंग डिसेबिलिटी आहे’ असं उगीचच वाटत असतं. “शेजारच्यांच्या मुलगा याच्याच वयाचा आहे तो तर हे सगळं करतो पण हा अजून करत नाही मग याला काही लर्निंग डिसेबिलिटी तर नाही ना?” असा प्रश्न घेऊन अनेक पालक मला भेटायला येतात. एखाद मुल उशिरा बोलत, एखाद मुल उशिरा चालतं, एखाद्या मुलाला एखादी गोष्ट समजण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागतो आणि हा कालावधी त्या मुलांनी घेणं याला आपण खरंतर लर्निंग डिसेबिलिटी म्हणू शकत नाही.
एका वर्गात ५० मुलं असली तर त्यातला कोणीतरी एकच पहिला येतो आणि कुणीतरी एक शेवटून पहिला येतो.याचा अर्थ पहिला येणारा मुलगा खूप हुशार आणि शेवटून पहिला येणारा मुलगा मठ्ठ असा होतो का? माझ्याच अनुभवातली अशी काही उदाहरणे आहेत जी ऐकल्यानंतर पालक म्हणून एक गोष्ट तुम्हीही मान्य कराल की “आपल्या मुलाला फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही.” आपलं मूल त्या पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर किती मजल मारू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे आणि कदाचित म्हणूनच तुम्हीही अभ्यासाच्या जोडीने त्यांना इतर ट्युशन्स लावून देतात.‘कसेही करून आपल्या मुलाने सगळ्यांच्या पुढे राहावं’ ही तुमची अपेक्षा कायम असते. माफ करा म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच पालकांची अशी अपेक्षा असते.माझ्या ईस्कुलींगचे पालक मात्र याला अपवाद आहेत हे मी अगदी अभिमानाने सांगते. आपलं मूलं जस आहे तस स्वीकारून, त्यातल्या उणिवा योग्य वयात दूर करून, योग्य दिशा देण्याच काम माझे ईस्कुलींगचे पेरेंट्स करत आहेत. त्यांची मुलं रोज आनंदी असतात, शिस्तीच्या बाबतीत कुठेही मागे नाहीत, अभ्यासत कुठे कमी नाहीत, इतर मुलांमध्येही सरसच ठरतात आणि वर्गाच्या बाहेर जेव्हा जेव्हा समाजात जायची संधी मिळते तेव्हा तेव्हा ही मुलं आत्मविश्वासाने सगळ्यांना सामोरे जातात, याचं सगळं श्रेय हे त्या पालकांच आहे.
“आपल्या मुलाला ओळखणं” हे अतिशय महत्त्वाच आहे.लर्निंग डिसेबिलिटी हा शब्द आजकाल सगळ्यांच्याच परिचयाचा झालाय.आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाने लर्निंग डिसेबिलिटी पैकी एका डिसेबिलिटी वर प्रकाश टाकला आणि पालक जागे झाले.अर्थात त्यानंतर बऱ्याच पालकांना उगाचच आपल्या मुलांना L.D.( लर्निंग डिसेबिलिटी ) आहे असं वाटायला लागलं.
आपल्या मुलाला अध्ययन अक्षमता आहे का? हे तपासून बघायलाच हवं. त्यासाठी मुलांच्या सवयी,स्वभाव,हातवारे, हावभाव या सगळ्यांच निरीक्षण पालकांनी करायला हवं. अध्ययन अक्षमतांचे बरेच प्रकार आहेत. या पुढील माझ्या लेखमालांमध्ये मी एकेका प्रकारावर लिहिणार आहे. खरंतर या अनेक प्रकारांपैकी ‘माझ्या मुलाला अमुक प्रकारची डिसेबिलिटी आहे’ असं ठामपणे आपण म्हणू शकत नाही, कारण बऱ्याच मुलांमध्ये दोन ते तीन प्रकारच्या डिसेबिलिटी एकत्र आलेल्या दिसतात. आपल्याला त्याचे निरीक्षण करून मग त्यांना तशी थेरपी द्यावी लागते. कुणाला संवाद कौशल्यासाठी, तर कुणाला जीवनावश्यक कौशल्यांसाठी, कुणाला सृजनात्मक विकासासाठी, तर कुणाला सर्वांगीण विकासासाठी थेरपीचा आधार द्यावा लागतो.
या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत.सुदैवाने अशी मुलं तुमच्या घरात किंवा नातेवाईकात नसतील; पण दुर्दैवाने जर तुमच्या ओळखीत अशी काही मुलं असतील तर एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघा. आपल्या मुलांसारखंच तेही मुल आहे हे समजून घ्या.आपल मुल त्या मुलांशी खेळत असेल तर त्यांना तिथून बाजूला नेऊ नका,उलट त्या मुलांशी खेळायला प्रवृत्त करा, कारण आपल्या मुलाकडे बघून त्या मुलांची वाढ होत असते, त्यांच्यात सुधारणा होत असते,त्याचबरोबर त्या मुलांशी खेळल्यामुळे आपल्या मुलांची सामाजिक जाणीव उत्तम होत असते, संवेदना जागृत होत असतात आणि आपलेही मुल एक चांगलं माणूस बनण्याच्या मार्गावर आहे याची खात्री तुम्हाला येऊ शकते.
अध्ययन अक्षमता असणारी मुलं ही काही वेगळी दिसत नाहीत.ती आपल्याच मुलांसारखी असतात फक्त त्यांच्या काही सवयी वेगळ्या असतात.अशा मुलांना फक्त आपलं प्रेम हवं असतं आणि आपल्यामध्ये राहायची संधी हवी असते. आपल्या मुलाचे गुणधर्म तुमच्या लक्षात येत असतात पण जर काही अडथळे तुमच्या लक्षात येत असतील तर त्यांना कानामागे टाकू नका. तुलना करणे हे नेहमी वाईटच; पण निरीक्षण करणे गरजेचं आहे. आजूबाजूच्या मुलांशी आपल्या मुलाची तुलना न करता, त्यांच्या विकासानुरूप आपल्याही मुलाचा विकास होतो आहे का? याचं निरीक्षण करा. बाकी मुलं पाच-सहा शब्द बोलायला लागले असतील तर आपलं मूल निदान तोंडातून आवाज तरी काढतो आहे का? त्या आवाजांना काही अर्थ आहे का? यावर लक्ष ठेवा.बाकी मुलं बॅट बॉल खेळताना कृती सहज करत असतील पण आपल्या मुलाला या कृती करायला अवघड वाटत असेल किंवा तो टाळत असेल तर वेळीच जागे व्हा.
दुर्दैवाने अध्ययन अक्षमता या प्रकारची मुलं झपाट्याने वाढत आहेत.कारणे अनेक आहेत,त्याचा उहापोह करणे तसं म्हटलं तर योग्य नाही,कारण ही सगळी तुमच्या कुटुंबातली,तुमची,आणि तुमच्याशी निगडित असलेली कारणमीमांसा आहे.तसंही या मागच्या कारणांचा विचार करून ‘घडून गेलेली गोष्ट रिवर्स होणार नाही’ हे माहीत असल्याने,आता आपण इथून पुढचा विचार करूया.
अध्ययन अक्षमतेबद्दल बरेच गैरसमज आहेत, जसं की L.D.असणारी मुलं अजिबात शिकू शकत नाहीत किंवा ही मुलं आळशी असतात किंवा वाढत्या वयानुसार त्यांच्यातली अध्ययन अक्षमता नाहीशी होते; पण वास्तवात मात्र अध्ययन अक्षमता असणारी मुलं अतिशय हुशार असतात मात्र त्यांना शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात.विविध पद्धती वापरून अशा मुलांना शिकवता येतं. ही मुलं आळशी नसून बाकी मुलांसारखीच मेहनती असतात,उत्साही असतात.मात्र इतर मुलांसारखी झटपट काम जमत नसल्याने त्यांना अपयश येत असतं,ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती मुलं अशी काम करण्याचे टाळू लागतात म्हणून आपल्याला ती आळशी वाटतात.अध्ययन अक्षमता नाहीशी होत नाही किंवा पूर्णत:बरी देखील होत नाही.वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या सामंजस्यामुळे ही मुलं त्या डिसेबिलिटीवर मात करतात किंवा एखादी गोष्ट करण्याचे वेगवेगळे उपाय शोधतात,ज्यामुळे आपल्याला त्यांची डिसेबिलिटी कमी झाल्यासारखे वाटते मात्र दुर्दैवाने प्रत्यक्षात तसं होत नाही.याविषयी सखोल चर्चा पुढच्या लेखात मी करणारच आहे पण तोपर्यंत आपण पेरूला पेरू म्हणूयात,सफरचंदाला सफरचंद म्हणूयात आणि कैरीचा आंबा कसा होईल याच्या तयारीला लागूयात!
विशेष सूचना :यापुढील लेखात मी जे काही लिहिणार आहे ते वाचून लगेचच आपल्या मुलांना ही डिसेबिलिटी आहे का?अशी फुटपट्टी लावू नका!मी फक्त या प्रकारांबद्दल जागृत करण्यासाठी यावर प्रकाश टाकणार आहे आणि जर अशा प्रकारची काही मुलं तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांच्यासाठी काही प्रश्न असल्यास मी नक्की तुम्हाला मदत करणार आहे.यासाठीच हा खटाटोप!
पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद!
