जीवनसत्व ‘आ’ आणि ‘स’ :पॅरेंटिंग फंडे ऑन संडे -09

डॉ. ‌आदिती तुषार मोराणकर, नासिक Child Psychologist, Special Educator

0

(Child Psychology)“अलीकडे मी बघतीये अनिशाची तब्येत फार बरी नसते. तिचं टाईम टेबल, ड्रायफ्रूट्स, फळं, हिरव्या पालेभाज्या, झालं तर सॅलड सगळं तर सांभाळलं जातं तरीसुद्धा तब्येतीवर इतका परिणाम का होतोय तेच कळत नाहीये.” माझी मैत्रीण मला काळजीने सांगत होती. तिचा काळजीचा स्वर मलाही काळजीत टाकत होता.

मनस्वी, आनंदी, हुशार आणि बोलकी अनिशा अलीकडे स्वतःच हरवल्यासारखी शांत शांत राहत होती . तिच्यातला हा अचानक झालेला बदल माझ्या पचनी पडत नव्हता. नक्की कुठेतरी, काहीतरी चुकतंय असं मला राहून राहून वाटत होतं म्हणून मी या विषयाच्या खोलात जायचं ठरवलं आणि जे उत्तर मला सापडलं ते माणूस म्हणून मला नक्कीच समृद्ध करणारं ठरलं.

अनिशाच्या घरी आजवर तिचे आजी-आजोबा राहत होते. ती सकाळी उठल्यापासून साखरेचं पोतं बेसिन जवळ नेणारे तिचे आजोबा, ब्रशला पेस्ट लावून देणारी आजी, ती ब्रश करते आहे तोवर तिच्या आवडीचा नाश्ता बनवणारी आई आणि तिच्या शाळेची तयारी करून देणारे बाबा या सगळ्यांच्या सहवासात अनिशाचा रोजचा दिवस आनंदात जात होता. गेल्या काही दिवसांपासून तिचे आजी आजोबा तिच्या काकांकडे राहायला गेले होते. काकूला बाळ झालं होतं त्यामुळे आजी आजोबा आता काही महिने तरी तिच्या घरी परत येणार नव्हते. आजी आजोबा गेल्यानंतर सकाळचं चित्रच बदललं. आईला ऑफिसला जायचं असल्याने आई घाई घाईनेच तिला उठवून जवळपास फरफटतच बेसिन जवळ आणायला लागली. “लवकर ब्रश कर” असा आदेश सोडून जे लवकर होईल ते नाश्त्याला बनवायला लागली. तिथे अनिशाची आवड विचारायला आईला सवडच नव्हती. बाबासुद्धा घाई घाईने दप्तर भरून तिला शाळेत सोडायला निघायचे. अनिशा शाळेतून घरी आल्यावर आता घराला कुलूप असायचं. मग आई येईपर्यंत अनिशाला शेजारच्या काकूंकडे थांबून राहावं लागायचं. या सगळ्याचा परिणाम अनिशाच्या तब्येतीवर होतो आहे हे काही तिच्या आईला पटत नव्हतं. “आम्ही तिला उत्तम रीतीने सांभाळतो आहे. वेळच्यावेळी खायला देतो आ

(Child Psychology) “मुलांना लागणारी सगळी जीवनसत्व तुम्ही खाण्या-पिण्यातून देऊ शकत नाही” असं जर मी म्हटलं तर तुम्ही मला वेड्यात काढाल पण माझ्या बोलण्याचा जरा विचार करा. खरंच मुलांना आवश्यक असणारी सगळी जीवनसत्व तुम्ही मुलांना देत आहात का? 

माझ्या दृष्टीकोनातून मुलांना जीवनसत्व “आ” (आधार, आदर) आणि जीवनसत्व “स” (सहजीवन, स्पर्श) देणे अत्यावश्यक आहे.  अनिशाचंच उदाहरण घेऊया! अनिशाची सकाळची शाळेची गडबड तुम्ही बघितली. त्यात आजी-आजोबा, आई, बाबा सगळ्यांचा कसा सहभाग असायचा हे तुम्हाला समजलं. अनिशा शाळेत गेल्यानंतर तिची आई ऑफिसला जायची आणि अनिशाला शाळेत सोडून बाबा परस्पर कामाला जायचे. शाळा सुटल्यानंतर अनिशा स्कूल बसने घरी यायची तेव्हा तिचे आजोबा खाली गेटवर तिची वाट बघत उभे असायचे. ती आल्या आल्या आजोबांना घट्ट मिठी मारायची. आजोबा पिल्लाला मिठीत घेऊनच घरात यायचे. घरात आल्यावर आजीच्या गळ्यात हात टाकून “भूक लागली. काहीतरी खायला कर ना” असं अनिशाने सांगताच आजी गरम गरम पोहे, उपमा बनवायला घ्यायची. अनिशा तिच्या शाळेतल्या सगळ्या गमती जमती आजी आजोबांना सांगायची आणि गप्पा मारत मारत आजीने बनवलेल्या खाऊवर ताव मारायची. थोड्या वेळाने दूध पिऊन आजी आजोबांबरोबर चक्कर मारायला जायची. तोपर्यंत आई ऑफिस मधून यायची. मग आई स्वयंपाक करत असताना ती आई जवळ बसून अभ्यास करायची आणि बाबा आल्यानंतर तिची आणि बाबांची मस्ती सुरू व्हायची. असा ‘कमाल दिवस’ जगणारी अनिशा अचानक एकटी पडली. 

(Child Psychology) ‘दोन तास शेजारच्या काकूंकडे बसणं’ ही आपल्याला फार मोठी गोष्ट वाटत नसली तरी शाळेतून आल्यानंतर भूक लागलेली असताना दोन तास ताटकळत बसणं, काहीतरी सांगावसं वाटत असताना आदराने मन लावून ऐकणारं हक्काचं कुणीच  अनिशाला सापडत नव्हतं. कधीतरी आपल्याही बाबतीत असं होतच ना ! खूप भूक लागलेली असते पण काहीच खायला मिळत नाही आणि नंतर जेव्हा मिळतं तोपर्यंत आपली भूक मेलेली असते. तसंच काहीसं अनिशाबरोबर होतंय. मुलांच्या गरजेच्या वेळी त्यांच्याजवळ कोणी नसणे, त्यांची भावनिक आधाराची गरज न भागणे, तसेच कोणीतरी सोबत असावं ही त्यांची इच्छा अपूर्ण राहणे, यासाठी मी म्हणते ती जीवनसत्व आवश्यक आहेत. अनिशाला भावनिक व शारीरिक दोन्ही भुक सतावत होत्या. मी म्हणते ती जीवनसत्व हीच ! जीवनसत्व “आ” (आधार, आदर) आणि जीवनसत्व “स” (सहजीवन, स्पर्श)  !

जीवनसत्व “आ” आणि “स” आता अनिशाला मिळत नव्हतं. आजी आजोबांचा सहवास मिळत नव्हता आणि त्यांच्या प्रेमाचा स्पर्शही मिळत नव्हता. सकाळी उठल्यापासून साखरेचे पोतं ते रात्री झोपताना हलक्या हाताने थोपटत, हाताची उशी करून झोपवणाऱ्या आजी आजोबांचा तो मऊ मखमली स्पर्श तिला मिळत नव्हता. खायची प्यायची वानवा नसली तरी जीवनसत्व “आ” आणि “स” ची कमतरता अनिशाला जाणवत होती म्हणूनच तिच्या तब्येतीवर परिणाम होत होता. 

या गोष्टी आपल्याला खूप वरवरच्या वाटतात. “आम्ही नाही राहिलो का घरापासून लांब? आम्ही नाही का केलं एडजस्ट ? काही दिवस नाही आजी आजोबा तर एवढं काय?” असे प्रश्न आपल्याला सहज पडतात कारण आपण आपल्याच चष्म्यातून मुलांकडे बघत असतो. आपल्याच हातातलं घड्याळ आपण मुलांनाही लावत असतो. त्या लहानग्यांच्या जीवनातल्या वेळेची वेगळी संकल्पना आपल्याला कधी समजतच नाही. ‘यावेळी आम्ही असं वागतोय म्हणून तू ही तसंच वाग’ हा आपला अट्टाहास असतो, पण त्यांची या वेळेची गरज वेगळी असू शकते हे आपणही कधीतरी समजून घ्यायला हवं. त्यांच्या मतांचा आदर करायला हवा. त्यांना आधार द्यायला हवा. त्यांना सहवास द्यायला हवा आणि त्यांना त्यांच्या हक्काचा, प्रेमाचा स्पर्शही द्यायला हवा. मुलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एका प्रयोगानुसार असे सिद्ध झाले आहे की ज्या मुलांना दिवसातून सात-आठ वेळा त्यांचे पालक प्रेमाने मिठी मारतात, डोक्यावरून हात फिरवतात त्यांची भावनिक बुद्धिमत्ता त्यांच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा जास्त चांगली असते. नुसती भावनिक बुद्धिमत्ताच नाही तर क्रिटिकल थिंकिंग आणि सर्जनशीलता देखील वाढलेली असते. आपल्या मुलांना मिठी मारल्याने फक्त मुलांनाच नाही तर आपल्यालाही त्याचा फायदा होतो आपले ताण-तणाव कुठल्या कुठे पळून जातात. मुलांना प्रेमाने मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन तयार होतं ज्यामुळे कॉर्टिसोल सारखे तणाव निर्माण करणाऱ्या केमिकलचा नाश होतो आणि मुलांच्या निरोगी भावनिक आणि मेंदू विकासाला बळ मिळतं. किमान 20 सेकंदाची घट्ट मिठी मुलाला शारीरिक दृष्ट्या शांत करू शकते आणि त्याच्या मनात विश्वाससुरक्षिततेची भावना निर्माण करू शकते. आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करण्याचे, आपल्या मुलाशी एक मजबूत संबंध निर्माण करण्याचे, काहीहीबोलता सगळं काही सांगण्याचेस्पर्शहे एक उत्तम मध्यम आहे.

तुम्ही तुमच्या मुलांना जीवनसत्व अ, क, ड देत असालच पण हा लेख वाचल्यानंतर त्यांना आवर्जून जीवनसत्व आ (आधार, आदर) आणि जीवनसत्व स (सहजीवन, स्पर्श) द्यायला अजिबात विसरू नका

मुलांच्या निकोप वाढीसाठी आणि तुमच्यातल्या उत्तम संवादासाठी कुणालाही काही प्रश्न असतील तर नक्की बोलून मन मोकळ करा.

परत भेटूयात नवीन विषयासह पुढच्या रविवारी #पॅरेंटिंग फंडे ऑन संडे या सदरात! (Child Psychology)

डॉ. ‌आदिती तुषार मोराणकर, नासिक

Child Psychologist, Special Educator

83299 32017 / 93265 36524

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!