“बिन छपराची घरं” – पॅरेंटिंग फंडे ऑन संडे -०८
डॉ. आदिती तुषार मोराणकर, नासिक Child Psychologist, Special Educator
Child Psychology
“संपदा काय चालू आहे?एवढीही अक्कल नाहीये का तुला?”
“मला तर नाहीये अक्कल पण तुझं काय रे सुमित?”
“हे बघ संपदा! माझी अक्कल काढू नकोस.”
“मग, तुलाही अधिकार नाहीये माझी अक्कल काढायचा!”
“आता चूप बसतेस की…”
“काय करणार आहेस तू? हात उचलणार आहेस? तेवढंच बाकी राहिलं होतं!”
दोघांचेही आवाज खूप चढले होते. दोघंही माघार घ्यायला तयार नव्हते.
त्यामुळे त्यांची ५ वर्षांची मुलगी, मैत्री, एका कोपऱ्यात भेदरून उभी होती. तिची काय अवस्था होत असेल?याचा त्या दोघांपैकी कोणीच विचार केला नाही! अशाच कुटुंबाच्या घरांना मी “बिन छपराचं घर” म्हणते.
बाहेरून बघणाऱ्याला छान रंगीत भिंतींची घरं दिसतात पण त्याला ‘वरून छप्परच नाही’ हे फक्त आत राहणाऱ्या माणसांनाच माहीत असतं.
दुर्दैवाने ही अशी “बिन छपराची घरं” आजकाल जास्त दिसताहेत. नवरा-बायको मधले बेबनाव वाढत चालले आहेत. घटस्फोटांचेही प्रमाण खूप वाढले आहे. पण त्यामुळे ही कोवळी मुलं भरडली जात आहेत, त्यांचं भावविश्व उध्वस्त होतंय.
आई-वडिलांचे संबंध सामान्य नसलेल्या घरातली मुलं (०-१२ वर्षांची) खूप अस्वस्थ, केविलवाणी होऊन जातात. मुलांच्या ह्या कोवळ्या वयात त्यांना आई-वडीलांची भावनिक जवळीक, त्यांची माया, भरपूर वेळ आणि घरामधले आनंदी वातावरण एवढंच हवं असतं.
ज्या वयात आनंदी राहायचं, खेळायचं, बागडायचं त्याच वयात त्यांच्यावर मानसिक ताण येतो. सतत भांडत असलेले आई-वडील, त्यांच्यात असलेला अबोला, घरातलं बिघडलेलं वातावरण ह्यामुळे ह्या मुलांच्या सर्वांगीण वाढीस अडथळा येतो. त्यांच्यामध्ये ठळकपणे खालील परिणाम दिसून येतात.(Child Psychology)
* हि मुलं एकलकोंडी व्हायला लागतात, मित्र-मैत्रिणींपासून तुटत जातात.
* एवढ्या लहान वयात नैराश्येने ग्रासली जातात.
* त्यांचा नात्यांवरचा विश्वास हळूहळू उडू लागतो.
मुलं घरातल्या मोठ्यांचे अनुकरण करत असतात, त्यातूनच शिकतात हे मी माझ्या मागच्या लेखातूनही सांगितलं होतं. जर लहानपणापासूनच ते नात्यांमधला गोडवा, एकमेकांकरता असलेली काळजी, प्रेम बघत असतील तर नात्यांमधला बळकटपणा त्यांच्या मनात रूजत जातो. मग ही मुल़ं भविष्यात सुदृढ नातं बनवू शकतात. मात्र, जर ती नात्यांमधला कडवटपणा अगदी लहान वयापासूनच अनुभवत असतील तर त्यांचा नात्यांवरचा विश्वास उडून जातो. आणि परिणामत:
* ते भविष्यात नातं बनवायला घाबरतात किंवा नात्यांबाबतीत त्यांच्यात खूप नकारात्मकता निर्माण होते.
* बहुतांश वेळा ही मुलं भविष्यात नाती टिकवू शकत नाहीत, नात्यांमध्ये पुढे जाऊ शकत नाहीत, पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाहीत.
* जसजशी ही मुलं वयात यायला लागतात तशी या मुलांमध्ये लहानपणापासून मनात घर करून बसलेली भीती, असुरक्षितता वाढत जाते.
* त्यांचं व्यक्तिमत्व फुलू शकत नाही, आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही.
* ती न्यूनगंडाने पछाडली जातात.
भविष्यात आपल्याही मुलांचं घर “बिन छपराचं घर” ठरु नये असं वाटत असेल तर आजच पालक म्हणून आपण काही सकारात्मक पाऊलं उचलायला हवीत. जसं की,
* आपआपले अहंकार थोडे बाजूला ठेवावे.
* मुलांसमोर भांडणं टाळावीत.
* समोरच्याच्या परिस्थितीचा, मनस्थितीचा अंदाज घेऊन विषय मांडावा .
* आपल्या जोडीदाराच्या मतालाही किंमत द्यावी.
* कुठलीही गोष्ट करत असताना जोडीदाराबरोबर घरातल्या मुलांना देखील सामील करून घ्यावे.
* आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींची सहज सोपी जाणीव आपल्या मुलांना देखील करून द्यावी, जेणेकरून ‘आपले आई वडील कुठल्या प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जात आहेत’ हे मुलांना समजेल.
* मुलांना काही गोष्टींसाठी नकार देताना दोघांनी मिळून नकार द्यावा. एकाचा होकार व दुसऱ्याचा नकार नसावा. त्यातून वाद निर्माण होतात आणि नातेसंबंधही बिघडतात.
* पालक ह्या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याने भांडणे होणारच मात्र ती शक्यतो मुलांसमोर होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
या काही सकारात्मक बाजू सांभाळल्या तर आपल्या घरालाही घरपण येईल. नात्यांच्या भिंती मजबूत होतील आणि आपल्या मुलांच्या डोक्यावर प्रेमाचं छप्पर असेल याची खात्री बाळगा.
परत भेटूयात नवीन विषयासह पुढच्या रविवारी #पॅरेंटिंग फंडे ऑन संडे या सदरात!
या विषयावर कुणालाही काही प्रश्न असतील तर नक्की बोलून मन मोकळं करा.
डॉ. आदिती तुषार मोराणकर, नासिकChild Psychologist, Special Educator83299 32017 / 93265 36524

[…] तब्येत फार बरी नसते. तिचं टाईम टेबल, ड्रायफ्रूट्स, फळं, हिरव्या पालेभाज्या, झालं तर सॅलड […]