हक्काचा खेळ आणि खेळण्याचा हक्क !’’-पॅरेंटिंग फंडे ऑन संडे -०४
डॉ. आदिती तुषार मोराणकर(Child Psychologist Special Educator)
(Child Psychology) खेळण्यांमध्ये रमून गेलेली लहान मुलं, वेडेवाकडी बसून चित्र रंगवणारी, कागद कापणारी, मातीची भांडी बनवणारी, घरभर पसारा घालणारी मुलं बघायला मिळणं आताशा दुरापास्त झालंय,
याचं कारण लक्षात येतंय?
आपण त्यांच्या “हक्काचा खेळ” आणि “खेळण्याचा हक्क” दोन्ही हिरावून घेतलंय……
मुलांच्या निकोप वाढीत नैसर्गिकपणे मुक्त खेळण्याचं किती महत्त्व आहे हे मी कायमच माझ्या लेखांमध्ये सांगितलं. अर्थार्जन करणं हे जर आपलं कर्तव्य असेल तर खेळणं हे मुलांचं कर्तव्य आहे. खेळता खेळताच वयानुसार बुद्धीच्या क्षमता वाढत जातात आणि बुद्धीच्या क्षमतेनुसार खेळ आणि हातातल्या खेळण्यांचा वापर बदलत जातो. या सगळ्या बदलांबरोबर आई वडील म्हणून आपणही बदलायला हवं.
खेळणी खेळतांना अनेक शारीरिक हालचाली होत असतात. पकडणं, सोडणं, धरणं, खेचून नेणं, ओढून आणणं अशा कित्येक शारीरिक क्रिया मुलांकडून आपोआप घडत असतात आणि त्यातूनच ते नवीन अनुभव घेत असतात.
माधुरी अनेकदा आयुराची खेळणी उचलून वर ठेवत असे, कारण खेळणं समोर दिसलं तर आयुरा तहानभूक विसरून खेळतच बसेल अशी तिला भीती वाटायची. खेळणी वर ठेवल्यानंतर आयुरा तिच्या दुडक्या चालीने त्या खेळण्याजवळ जाऊन उभी राहायची. हळुहळू तिला कल्पना सुचली. आपला हात पोहोचत नाही म्हटल्यानंतर तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि हळूच एक छोटासा स्टूल ढकलत तिने खेळण्याजवळ आणला. त्यावर चढली आणि ते खेळणं मिळाल्यानंतर एखादा पुरस्कार मिळावा अशा आनंदात मनमोकळं हसली. नुसतं खेळणं हातात येणं उपयोगी नव्हतं तर ते खेळणं सांभाळत आता वरून खालीही उतरायचं होतं. तेही आव्हान आयुराने लिलंया पेललं आणि मग एखाद्या विजेत्याच्या आवेशात आईला जाऊन ते खेळणं दाखवलं.
हा प्रसंग घडल्यानंतर माधुरी दोन प्रकारे वागू शकत होती.(Child Psychology)
प्रकार १
“मी वर ठेवलेलं खेळणं काढण्याची उठाठेव तुला कोणी सांगितली?” असं म्हणून ते खेळणं आयुराच्या हातातून माधुरीने हिसकावून घेतलं आणि परत वर ठेवून दिलं त्याबरोबरच “मुकाट्याने जे देते ते खा आणि परत असा आगाऊपणा केला तर जेवायलाही देणार नाही” अशी धमकीही दिली.
या प्रकाराने आयुराच्या मनात एक वेगळीच भिती बसली. आयुष्यात आपलं डोकं चालवून, हिमतीने कुठलीही गोष्ट करताना तिला यापुढे भीती वाटेल. त्याचबरोबर ‘तिच्याच खेळण्याशी खेळताना तिला प्रत्येक वेळेला परमिशन लागणार आहे’ या जाणिवेने ती खेळणं कमी करून टाकेल आणि तिचे बाल सुलभ अनुभव थांबतील. आईबद्दल मनात एक अनामिक भीती, राग आयुराच्या मनात निर्माण होईल ज्याचे दूरगामी वाईट परिणाम माधुरीला नक्कीच दिसतील.
प्रकार २
लेकीच्या पराक्रमाकडे बघून आश्चर्यचकित झालेली माधुरी तिला प्रेमाने म्हणाली, “अग बाई जमलं तुला खेळणं काढायला? मोठं झालं माझं बाळ. मग आज स्वतःच्या हाताने जेवतेस का? जेवण झालं की आपण दोघीही खेळू!”
यानंतर आयुराने स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. आई तिच्याजवळ बसली होती. तिने हे खेळणं कसं काढलं? यावर गप्पा मारून ती आयुराचं कौतुक करत होती. त्याचबरोबर हे करताना ती पडू शकली असती, तिला लागू शकलं असतं, याची सौम्य जाणीव ती गोड शब्दात आयुराला करुन देत होती. ‘आई जर एखाद्या मागणीला नाही म्हणाली तर थोडा वेळ ती गोष्ट नाही करायची’ हे सुद्धा सांगायला माधुरी चुकली नाही. यातून आयुराला एक नवा अनुभव तर मिळालाच पण अजून दोन चांगल्या गोष्टी आईकडून शिकायला मिळाल्या. त्याचबरोबर जेवतांनाचा वेळ गप्पांमध्ये मजेत गेला याचाही आनंद तिला मिळाला. आयुरा हाताने तर जेवलीच आणि ते देखील कुठल्याही प्रकारचा मोबाईलवर टीव्हीवर व्हिडिओ न बघता जेवली.
खरं पाहिलं तर आपल्या रोजच्या शेड्युलमध्ये मुलांची शाळा, त्यांचे ट्युशन, इतर क्लासेस या सगळ्यात मुलांच्या खेळण्याच्या हक्कावर आणि हक्काच्या खेळण्यांवर आक्रमण होतंय. त्यातुन उरलेला खेळण्याचा वेळ सुद्धा मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये जातोय. या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी आणि खेळण्याच्या माध्यमातून घडणाऱ्या सृजनाची वाट मुलांसाठी बंद होऊ नये यासाठी आपण पालकांनी मुलांबरोबर असणं अतिशय गरजेचे आहे. आपलं छोटं कुटुंब, आपल्या कामाच्या वेळा आणि त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, घरात एकुलतं एक किंवा मोजकी दोन मुलं, यामध्ये खेळण्यासाठी वेळ, खेळण्याची जागा आणि खेळण्यासाठी खेळ पुरवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. अर्थात यासाठी खूप महागडी खेळणी, रिमोटवर चालणारी गाडी, रोबोट्स याची गरज नाहीच. तर गरज आहे त्यांना छोटे छोटे खेळ शिकवण्याची! अगदी बाजारातून आणलेली भाजी चार टोपल्यांमध्ये वेगळी करायला शिकवा, एका किलोत किती कांदे आलेत ते मोजायला शिकवा, किराणा आणल्यानंतर पिशव्या कापून किराणा डब्यांमध्ये, भरण्यांमध्ये भरायला शिकवा. हे करतानाच रवा कुठला, भगर कुठली, ज्वारी कुठली, बाजरी कुठली? असे छोटे छोटे प्रश्न विचारा यातून तुमच्या गप्पा होतील. मुलांची समज वाढेल आणि काम देखील हातासरशी होऊन जाईल. बरं एकत्र केलेल्या या कामामुळे तुमचं आणि मुलांचं बॉण्डिंग देखील छान होईल.
काही घरातून मुलांच्या बाबतीत अति सावधानता, अति काळजीचा पावित्रा घेतला जातो. त्यांच्या आवडीनिवडींमध्ये पालक नको एवढी ढवळाढवळ करतात. त्यांना काय हवं, काय नको, हे त्यांनी व्यक्त करण्याआधीच महागड्या खेळण्यांचा मारा त्यांच्यावर केला जातो. ते बोट ठेवतील ती वस्तू त्यांना घेतली जाते, आणि मग खरोखर क्रियाशील खेळणी बाजूला पडून महागड्या खेळण्यांचं कलेक्शन तयार होतं, ज्यातून मुलं शिकत काहीच नाही.
बटन दाबलं कि ती खेळणी चालतात, बोलतात, हलतात, नाचतात आणि आपली मुलं मात्र एकाच ठिकाणी ढिम्म बसून असतात. मग एवढी महागाची खेळणी आणून तुम्ही नक्की साध्य काय केलं? तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे हे दाखवण्याच्या नादात तुम्ही मुलाची शारीरिक परिस्थिती बिघडवायला सुरुवात केलीत आणि याचंच रूपांतर पुढे जाऊन एकलकोंडेपणात, मानसिक अस्थिरतेमध्ये सुद्धा होणार आहे हे तुम्ही विसरलात. आज हजाराचं खेळणं घेऊन दिलं तर उद्या दोन हजाराचं घेऊन द्यावं लागेल कारण मुलांच्या अपेक्षा वाढतील मग खेळण्यातला आनंद हा खेळण्याच्या किमतीवर ठरेल, उपयोगीतेवर नाही हे तुमच्या लक्षातच आलं नाही. या सगळ्या महागड्या खेळण्यांच्या नांदी लागुन सारासार विचार करण्याची, नवीन काहीतरी सूचण्याची, काहीतरी करून बघण्याची संधी न मिळाल्याने मुलांच्या क्षमतांच्या विकासावर, आत्मविश्वासावर परिणाम होणार आहे हे आपल्या लक्षात आलं नाही.
मूल म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, तुमचं प्रेम या सगळ्या इतकंच महत्वाचं आहे ते खेळण्याचा हक्क आणि हक्काची खेळणी!
एक जागरूक पालक म्हणून तुम्ही ते देण्याची सुरुवात करा हे मी तुम्हाला परत एकदा आग्रहाने सांगते आहे. कारण मुल हे अनुभवातून शिकत असतं पुस्तकातून नाही! वहीची पानं कोरी राहिली तरी चालतील पण आयुष्याचं पुस्तक हे अनुभवांनी सजायला हवं आणि या अनुभवांसाठी मुलांनी मनसोक्त खेळायला हवं!परत भेटूयात नवीन विषयासह पुढच्या रविवारी #पॅरेंटिंग फंडे ऑन संडे या सदरात! या विषयावर कुणालाही काही प्रश्न असतील तर नक्की बोलून मन मोकळ करा.
डॉ आदिती तुषार मोराणकर, नासिक
Child Psychologist,Special Educator
83299 32017 / 93265 36524
