
( City With Two Faces)त्या नगरीचं नाव कधी कुणी विचारलंच नाही. कारण नावापेक्षा तिथली ओळख महत्त्वाची होती—ती म्हणजे दोन चेहरे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक चेहऱ्यांची अदलाबदल करत. एक चेहरा तत्त्वांचा, दुसरा तडजोडींचा. खरा चेहरा कुठे ठेवायचा, याचं प्रशिक्षण लहानपणापासून दिलं जायचं.
या नगरीत बोहल्याला फार महत्त्व होतं. तो केवळ लग्नासाठी नव्हे, तर सत्तेसाठी वापरला जायचा. जो बोहल्यावर चढतो, तोच योग्य, उरलेले अपुरे—असा अलिखित नियम होता.
अशाच नगरीत एक परिषद भरवण्यात आली. नाव होतं फार गोड—नवचैतन्य परिषद. पण चैतन्य नव्हतंच. होतं ते फक्त जुन्याच चेहऱ्यांचं पुनरागमन.
म्होरक्या सत्तरी पार केलेला. शरीरावर वयाच्या रेघा होत्या, पण मनावर सत्ता टिकवण्याचा वार्निश अजूनही ताजा होता. लोक म्हणत होते, “आता तरी थांबा.” पण म्होरक्याच्या कानावर शब्द पडायचे, अर्थ मात्र कधीच पोहोचायचे नाहीत. कारण सत्तेची खुर्ची ही बहिरी असते.
त्याला पुन्हा बोहल्यावर चढायचं होतं. लग्न नव्हतं ते—तो होता सत्तेशी केलेला पुनर्विवाह. फरक इतकाच की यावेळी वरचं वधूवर दोघंही एकच होते.
परिषदेसाठी निमंत्रणं पाठवली गेली. पण फार काळजीपूर्वक. प्रश्न विचारणाऱ्यांची नावं यादीतून गायब झाली. विचार करणारे लोक “चुकून” विसरले गेले. उरले फक्त मान हलवणारे, टाळ्या वाजवणारे आणि “होय साहेब” म्हणणारे.
म्होरक्याच्या भोवती मंडळी होती. त्यातला प्रधान विशेष उल्लेखनीय. तीन तोंडांचा. पहिल्या तोंडाने तो व्यासपीठावर आदर्श बोलायचा. दुसऱ्या तोंडाने तो बंद खोलीत व्यवहार करायचा. तिसरं तोंड कायम उघडंच—संधी गिळण्यासाठी.
हिशोबनीसही होता. तो आकड्यांना कपडे घालायचा. उघडे आकडे लोकांना घाबरवतात, म्हणून त्यांना सजवून मांडायचा. तूट दिसायची नाही, नफा कागदावरच जन्मायचा.
आणि आजूबाजूला अतृप्त माणसं. पोट भरलं तरी डोळे रिकामे. पद मिळालं तरी पदाची भूक शिल्लक. ही माणसं बदलाची सगळ्यात मोठी शत्रू होती. कारण बदलात त्यांची खुर्ची हलायची.
म्होरक्याने परिषद सुरू होण्याआधीच अदृश्य बाशिंग बांधून घेतलं. कुठे विरोधाचा सूर लागतोय का, कुठे कुजबुज सुरू आहे का—हे सगळं तपासलं गेलं. कारण बोहल्यावर चढायचं असेल तर आधी जमीन सपाट करावी लागते.
परिषद सुरू झाली. प्रकाश इतका तेजस्वी होता की सावल्या दिसेनाशा झाल्या. आणि सावल्या दिसल्या नाहीत, की प्रश्नही दिसत नाहीत—ही प्रकाशयोजनेची खरी कामगिरी होती.
म्होरक्या बोहल्यावर चढला. भाषण झालं. टाळ्या वाजल्या. घोषणांचा पाऊस पडला. “बदल हवा!” असंही ओरडण्यात आलं. पण बदल कुठे, कसा, कुणासाठी—हे कुणीच सांगितलं नाही.
थोडासा विरोध झाला. पण लगेच त्यावर मलम लावण्यात आलं. कारण निगराणीला आलेले दोन तोंडाचे निरीक्षक दुपारीच पंगतीला बसले होते. जेवण झाल्यावर त्यांची निरीक्षणशक्ती कायमची मंदावायची.
परिषदेत वेगवेगळे वर्ग होते. छपाई विभागातले—जे शब्द छापायचे, पण अर्थ काढून टाकायचे. सायकलवरून फिरणारे—जे संदेश वाहायचे, पण स्वतः कधीच थांबायचे नाहीत. आणि बाहेर उभे असलेले—खरे माणसं. ज्यांच्याकडे ना पद होतं, ना निमंत्रण.
ते वाट पाहत होते. बदलाच्या. संवादाच्या. सहभागाच्या. पण त्यांच्यासाठी दरवाजे बंद होते. कारण प्रश्न विचारणं हा त्या नगरीत असभ्यपणा मानला जायचा.
“बदल हा सृष्टीचा नियम आहे,” हे वाक्य पुन्हा पुन्हा ऐकू येत होतं. पण सृष्टीचं घड्याळ म्होरक्याने थांबवून ठेवलं होतं. वेळ पुढे जायची, पण सत्ता जागेवरच राहायची.
शेवटी काय झालं, हे सगळ्यांनाच माहीत होतं. दोन तोंडाचा म्होरक्या आणि तीन तोंडाचा प्रधान—एकमेकांच्या आधाराने—पुन्हा बोहल्यावर चढले. जुने हार, जुनी फुले, जुन्याच घोषणा.
आणि बाहेर उभ्या असलेल्या माणसांचा एक चेहरा गळून पडला. तो चेहरा म्हणजे विश्वासाचा होता. तो फुटला नाही, पण झिजला. कारण या नगरीत बोहले बदलत होते, चेहरे बदलत होते—पण सत्तेची लग्नं मात्र नेहमी त्याच लोकांशी होत होती.
आणि दोन चेहऱ्यांची नगरी… पुन्हा एकदा स्वतःलाच टाळ्या वाजवत राहिली.
(सदर कथा काल्पनिक आहे याचा वास्तविक घटनेचा कोणताही संबंध नाही…असल्यास निव्वळ योगायोग समजावा)

