मुंबई,दि. २० डिसेंबर २०२३ –भारतात कोविड-19 चा नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला बाधित ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवण्यात आला.तेव्हापासून केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आहे.काल मंगळवार (१९ डिसेंबर) राज्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली असून ११ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे ११ पैकी ८ रुग्ण मुंबईत आढळून आले असून आतापर्यंत ३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २७ फक्त मुंबईत सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २७, पुण्यात २ आणि कोल्हापुरात १ रुग्ण सक्रिय आहे. होम आयसोलेशनमध्ये २३ रुग्ण आहेत. एक रुग्ण रुग्णालयात असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाचे २७ रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात ५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.पुण्यात २ आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एकाही रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.महाराष्ट्रात आतापर्यंत ८०,२३,४०७ रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.
देशात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 प्रकारातील पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत कोविडच्या प्रकरणावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सातत्यपूर्ण आणि सहयोगी कार्यामुळे, आम्ही (COVID-19) प्रकरणांची संख्या कमी करू शकलो. मात्र, कोविड-19 चा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे सांगितले.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चाचणी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुरेशी चाचणी सुनिश्चित करण्यासाठी आणि RT-PCR आणि अॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या पत्रात पंत यांनी आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची आणि जीनोम सिक्वेन्सिंग साठी संक्रमित आढळलेले नमुने भारतीय SARS CoV-2 Genomics Consortium (INSACOG) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्याच्यागरजेवरही भर दिला, जेणेकरून नवीन व्हेरिएंटचा शोध लवकर लावला जाईल.