भारत आणि थायलंड मध्ये व्दिपक्षीय व्यापारवृद्धीसाठी अगणित संधी – ललित गांधी
टॉप थाय ब्रॅण्ड - ट्रेड फेअर -२०२२ ला सुरवात
पुणे – डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंड, आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स रॉयल थाय गव्हर्नमेंट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर च्या सहकार्याने हडपसर पुणे येथील लक्ष्मी लॉन येथे दिनांक ,२५ ते २७ मार्च २०२२ अशा तीन दिवसीय टॉप थाय ब्रॅण्ड – ट्रेड फेअर -२०२२ चे उदघाटन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व रॉयल थाई कॉन्सुल जनरल श्री.डोनाविट पूलसावत यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी रॉयल थाई कॉन्सुल जनरल श्री. डोनाविट पूलसावत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी इंडो थाई चेंबर ऑफ एमएसएमइचे अध्यक्ष श्री. रोहित मेहता, श्री. चेतन नरके, श्री. मनीष पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी भारत आणि थायलंड दरम्यान सध्यस्थितीत १२.५ बिलिअन डॉलर चा व्यवसाय होत असून भविष्यात या मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत दिसत असल्याचे सांगितले. भारताचे धोरण अॅक्ट इस्ट आणि थायलंड चे धोरण लुक वेस्ट जे एकमेकांना पूरक आहे. जागतिक पातळीवरील बदलत्या राजकीय घडामोडीचा फायदा थायलंड आणि भारताच्या एकत्रित आर्थिक विकासासाठी आणि भारत आणि थायलंड मध्ये व्दिपक्षीय व्यापारवृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करणारा असून हा ट्रेड शो स्थानिक उद्योग आणि उद्योजकांना चालना देऊन नवी रोजगार निर्मिती करणारा होईल असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
रॉयल थाई कॉन्सुल जनरल श्री. डोनाविट पूलसावत यांनी उभय देशातील व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे, दोन्ही देशातील उद्योजकांमध्ये व्यापारी करार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून यामध्ये दोन्ही देशामधील उद्योजकांना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यातून आर्थिक, बौद्धिक गुंतवणुकीसह रोजगार आणि उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार असल्याचे रॉयल थाई कॉन्सुल जनरल श्री. डोनाविट पूलसावत यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबरच्या इंटरनॅशनल रिलेशन समितीचे को चेअरमन श्री. चेतन नरके यांनी राज्यातील व्यापार उद्योग वाढावा, जागतिक स्तरावर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाला स्थान मिळावे, आयात निर्यात वाढावी यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या इंटरनॅशनल रिलेशन समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
हेल्थ अॅण्ड ब्युटी, फूड अॅण्ड बेवरेज, फर्निचर आणि फॅशन या चार श्रेणीतील थायलंड मधील ३४ उद्योजक/उत्पादक/ संस्था या मध्ये सहभागी झाले आहेत. या ट्रेड शोसाठी थायलंड सरकारचे अधिकारी आणि थायलंड मधील उद्योजक उपस्थित होते.