‘क्रिकेट वर्ल्ड कप २०२३’चा अंतिम सामना ..कोण जिंकणार,कोण उंचावणार हा ‘वर्ल्ड कप’ 

एनसी देशपांडे

0

प्रस्तावना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाने जगाच्या नकाशावर भारत प्रगतीपथावर असतांना ‘चित्रपट, वेब सिरीज, क्रीडा – ऑलिम्पिक आणि क्रिकेट’  अशा सर्व आघाड्यांवर होत असलेली भारताची आगेकूच निश्चितपणे जगाच्या चिंतेचा विषय ठरते आहे.

मागील दहा वर्षांच्या कालावधीत बॉलीवूडने आम्हा भारतीयांच्या ‘देशप्रेम, कर्तुत्व आणि शौर्य’ यांच्या गाथा चित्रपटाच्या माध्यमातून समर्थपणे मांडल्या आणि भारताची अस्मिता उंचावली.
सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ, कपिल देव, सचिन तेंदुलकर, अझहरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी .. अनेक दिग्गज खेळाडूंचा आदर्श घेत तरुणाई क्रिकेट विश्वाकडे झेपावली. एकुणात तरुणाईचा कल ओळखून ‘आय.पी.एल’ या संकल्पनेचा जन्म भारतात झाला आणि ज्यांना पहिल्यांदा ‘वन डे क्रिकेट’ ओळखताच आलं नाही त्या भारताने जगातील उत्तमोत्तम खेळाडूंना निमंत्रित करून टी-२० क्रिकेटचा कप उंचावला.

रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर २३, नरेंद्र मोडी स्टेडियम,  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना …. कोण जिंकणार, कोण उंचावणार हा ‘वर्ल्ड कप’ संपूर्ण देशाचं ….  किंबहुना संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या एकाच क्षणाने खेचून घेतलं आहे.

भारतीय चमूला आभाळभर शुभेच्छा, देतांना मागील यशापयशाचं मूल्यमापन अगदी साहजिकपणे केलं जातं. भारतीय क्रिकेटच्या या प्रगतोची सुरुवात नेमकी कधीपासून झाली याचा शोध घेतांना आपण पुन्हा एकदा ‘कपिल देव’ च्या ८३ च्या ‘वर्ल्ड कप’च्या आठवणींमध्ये रमतो. ‘आत्मविश्वास, निश्चय, निर्धार, एकाग्रता, संघबांधणी, सोदाहरण कर्तुत्व, मार्गक्रमण, शिकवण आणि यशस्विता’ याचा तो वस्तुपाठच  होता.

रोहितने रचिला पाया ……. शामि केलास रे कळस 
‘२०२३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप’ च्या अंतिम सामन्यात पोहोचतांना भारतीय टीम कधीही लडखडतांना दिसली नाही. अगदी सेमी फायनल खेळतांना देखील भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास, निश्चय, निर्धार, कर्तुत्व आणि मार्गक्रमण’ याचं सहज-सुंदर दर्शन घडवत तो सामना अलगदपणे जिंकला.  भारतीय संघाच्या या यशस्वी घोडदौडीचा प्रवास बघून आता कदाचित ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात असेल, असं  म्हणायला पुरेसा वाव आहे. कारण  तो ‘न्युझीलंड विरुद्ध सेमी-फायनलचा सामना’ हाच सर्वात मोठा धोका भारताला वाटत होता. तो सामना सहजी जिंकल्यावर आता भारतीय संघ बराचसा निश्चिंत आहे.

विराट शतकवीर
लागोपाठ दोन शतक झळकावून ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडणारा विराट कोहली चांगलाच फार्मात आहे. अर्थात त्याच्यावर सचिनने दाखवलेला भरवसाच त्याला कायम प्रेरित करत होता. तुम्हाला कदाचित आठवत असेल की,  ….

सचिनच्या १०० व्या शतकाचे सेलिब्रेशन सुरू असतांनाच सचिनने ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा हे माझा हा विक्रम नक्की मोडू शकतील, हा विश्वास व्यक्त केला होता. विराटने देवाची हि आज्ञा शिरसावंद्य मानून हा विक्रम गाठण्याचा प्रवास सुरु केला आणि म्हणूनच १५ तारखेला वानखेडेवर देवाच्या साक्षीने हा विक्रम प्रस्थापित केला, त्याला वाकून मानवंदना दिली. त्यासाठी आवश्यक गुणवत्ता, शिस्त, अपार मेहनत, त्याग,आहार आणि फिटनेस या सगळ्या बाबींचा अभ्यास, प्रगती, सातत्य यासोबतच निश्चय आणि आत्मविश्वास बाळगून केलेली मेहनत फळाला आली. यातील सगळ्यात महत्वाची ‘शिस्त’ आहे. ती जर नसेल तर विराटचा कांबळी व्हायला जराही वेळ लागला नसता. काही काळ ‘बॅडपॅच’ चा सामना त्यालाही करावा लागला होता. परंतु थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद, निवड समितीची भक्कम साथ त्याला लाभली आणि ‘विराट संपला’ अशा वावड्या उठवणाऱ्याना त्याने सणसणीत चपराक मारली.

भरवशाची फलंदाजी
अर्थात अशा बिनधास्त खेळीसाठी आवश्यक ‘वातावरण आणि रन’ याची निर्मिती करण्याची जबाबदारी ‘कर्णधार रोहित आणि शुभमन गिल’ यांनी नेहमीच पार पाडली आहे. त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या वैयक्तिक खेळीच्या रेकोर्डचा अजिबात विचार न करता जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांना आपल्या आत्मविश्वासी ‘चौकार-षटकार’ चा प्रसाद देत सदैव नामोहरम केले. त्याच्या या खेळीची तुलना केवळ अन केवळ वनराजाशीच होऊ शकते. आपल्याला सापडलेली शिकार आपल्या पंजांनी अर्धमेली करायची आणि आपल्या बछड्यांच्या हवाली करायची, हा शिरस्ता ‘रोहितने’ ‘२०२३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप’ आपल्या खेळीने दाखवून दिला. त्याने भल्याभल्या गोलंदाजांची आणि त्यांच्या आत्मविश्वासाची अक्षरशः वाट लावली. कर्णधारबरहुकूम ‘शुभमन गिल’ रोहित बरोबर बघ्याची भूमिका निभावतांना रोहितच्या मारांनी जराजर्जर झालेल्या गोलंदाजांना मधून-मधून चोकारांचा फटका आणि एखाद दुसरा रन काढत खेळी रोहीतकडे सोपवण्याचा सोपस्कारही पार पाडतो.

रोहितला कंटाळा आला आणि पॅव्हेलियन कडे परतला की, आतापर्यंत बघ्याच्या भूमिका आणि बराचसा आराम करत असलेला शुभमनला विराट एकेका रनसाठी पळायला लावतो. इथेही आपली बदललेली भूमिका स्वीकारून तो बराचसा रोहितचा अप्रोच ठेवत चेंडूंना सीमापार धाडायला  सुरुवात करतो.

या नंतरची विराट-श्रेयसची भागीदारी, मग श्रेयस –राहुलची भागीदारी फलंदाजांची जबाबदारी पार पाडतात. इतकी तगडी आणि भरवशाची फलंदाजाची फळी भारताला अंतिम सामन्यात पोहोचवण्यास पुरेशी असते. गत दहा सामन्यांमध्ये या फळीने बोल्ट, रबाडा, शाहीन, रऊफ आणि तत्सम तमाम गोलंदाजांना घाम फोडला आहे आणि अविश्वसनीय खेळी करत प्रत्येक सामन्यात धावांचा डोंगर उभारला आहे. परिणामस्वरूप शेड्युल, पिच, टॉस, चेंडू आणि डीआरएस अशा प्रत्येक सहयोगी बाबींवर शंका निर्माण करून आरोप सुरु झाले आहेत.

गोलंदाजाची जादू
त्यानंतर गोलंदाजांची टीम म्हणजे एकेकाळचा ‘वेस्ट इंडीजचा तुफानी हल्लाच’. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी, केवळ या तिघांनी तीच दहशत निर्माण केली आहे. नंतर कुलदीप आणि रवींद्र जडेजा आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवायची कामगिरी स्वीकारतात. यातील ‘मोहम्मद शामी’ हा पहिले चार सामने ११ मध्ये नव्हता हे विशेष! प्राधान्याने निवडलेला ‘हार्दिक पंड्या’ अपघातग्रस्त झाला आणि शामीला प्रवेश मिळाला. आज त्याच्या कामगिरीबद्दल बोलतांना अहमहमिका सुरु झाली आहे. आज तो गोलंदाजीचा कणा बनला आणि त्याने मारलेली मुसंडी धडकीच भरवते आहे. विराट प्रमाणे त्यानेही इतिहास रचला आहे.

निवडा-निवडी
खरंतर फलंदाजांची तगडी फळी असतानाही केवळ फलंदाजीचा विचार करून शामी ऐवजी शार्दुल ठाकूरची झालेली निवड आणि त्याच्या अपयशाला स्वीकारून पुन्हा-पुन्हा खेलवणं कितपत समर्थनीय होतं? हे केवळ अनाकलनीय आहे. आज लागोपाठच्या यशामुळे संघनिवडीवर ताशेरे ओढले जात नाहीत, हे त्यांचं नशीब! परंतु आता वारंवार अपयशी ठरूनही बेभरवशाचा सुर्यकुमार यादव अजूनही खेळतो आहे, हे काही पटत नाही. तुम्हाला जर फलंदाजच हवा असेल तर इशान किशन हा चांगला पर्याय उपलब्द्ध आहे. पण या बदलाची रिस्क घेणार कोण, हाच मोठा सवाल आहे. असो आता किमान शामी तर आला आहे, यात समाधान मानायला हरकत नाही. सहावा बोलर गरजेचा वाटतो आहे.

रणनीतीचा अभाव
आता बदलाची किंवा बदल करण्याचा विचार गरज निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियन टीम बलाढ्य, कणखर आणि कावेबाज आहे. सलग आठ सामने’ जिंकून त्यांनी दबदबा निर्माण केला असल्याने त्यांना कमी लेखण्याची चूक आपल्याकडून होता कामा नये. आपली टीम केवळ आपल्या गुणवत्तेनुसार अंतिम सामन्यात प्रवेशती झाली आहे. परंतु ऑस्ट्रेलियन टीमचा कावेबाजपणा आपल्यामध्ये नाही. न्युझीलंडच्या मधल्या फळीने आपल्या तोंडचे पाणी पळवले होते तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर केवळ हतबलता स्पष्टपणे दिसत होती. तो सामना केवळ अन केवळ शामीने एकहाती जिंकून दिला, हे संपूर्ण जगाने बघितले आहे. मनोनिग्रह, कणखरपणा आणि कावेबाजवृत्ती हा कप उंचावणार, हे निश्चित! इंग्लंड(१९८७),  श्रीलंका(१९९६),  ऑस्ट्रेलिया(२०१५) आणि न्यूझीलंड(२०१९) या चार उपांत्यफेरीत शिवाय ऑस्ट्रेलिया (२००३) विरुद्ध अंतिम सामन्यात आपल्या संघाच्या हाराकिरीचा इतिहास आजही बोचतो आहे. गुणवत्ता असूनही आपण मोक्याच्या क्षणी ‘प्रोफेशनल अप्रोच’ नसल्याने गमावलेल्या सामन्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. गत दहा सामन्यात प्लान ए यशस्वी ठरला आहे, हे निश्चित. परंतु रोहित-विराट आणि शामीच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर प्लान बी तयार असणे क्रमप्राप्त ठरते.

अर्थात ऑस्ट्रेलियन संघाला कमी लेखून अजिबात चालणार नाही. हा संघ प्रत्येक सामना वेगवेगळ्या कल्पना लढवून खेळत असल्याने त्यांचा एकुणात अप्रोच कधीच कळत नाही आणि प्रतिस्पर्धी संघ त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, हा इतिहास आहे. तसा हा संघ पूर्ण भरात आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रत्येक सामन्यागणिक बदलत असतं.
……. यू जस्ट कान्ट जज अँड अंडर एस्टीमेंट देम ……
कठीण समय येता शामी कामास येतो हे उपांत्य सामन्यात आपण बघितले पण त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्याचे रंग उडालेले होते. तशी परिस्थिती आल्यास खांदे पाडून चालणार नाही, रणनीती तयार हवी. आपल्या संघाची घोडदौड अशीच सुरु राहो, उत्तम फलंदाजी,  गोलंदाजी सोबत उत्तम क्षेत्ररक्षण आणि वेळोवेळी रणनीती बदलण्याचा कावेबाजपणा भारताला हा कप उंचावण्याची संधी देवो, हीच ईशचरणी प्रार्थना!
एनसी देशपांडे
मोबाइल -9403499654

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.