मुंबई,दि,३ जानेवारी २०२४ – उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदारा कडून शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटने मुळे एकच खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेतील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुखावर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यामध्ये काल शुक्रवारी (२ फेब्रुवारी) एका वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात बैठक सुरू होती. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाले. हा वाद वाढल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जखमी अवस्थेतील महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील भाजपा विरुद्ध शिंदे गट वाद शिगेला पोहचला आहे.
नेमकं हा वाद कशामुळे झाला असा प्रश्न गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना,त्यांनी सांगितले “मी १० वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. मी दोन ते तीन वेळा त्यांना पैसे दिले. मात्र नंतर ते सह्या करण्यासाठी येत नव्हते. मग आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात केस जिंकलो आम्ही. केस जिंकल्यानंतर ७/१२ आमच्या कंपनीच्या नावे झाला. त्यावेळेस महेश गायकवाडने त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला. मी त्यांना परवा विनंती केली होती की जबरदस्तीने कब्जा घेऊन नका. तुम्ही कोर्टात जा. कोर्टातून ऑर्डर आणली तर आम्ही लगेचच जागा देऊन टाकू. दादागिरी करु नका.महेश गायकवाड परवाही दादागिरी केली. आजही कंपाऊंड तोडून आले ते. आजही पोलीस स्टेशनसमोर ४००-५०० लोक घेऊन आले होते ते तिथे. माझा मुलगा पोलीस स्टेशनच्या बाहेर जात होता. त्याने त्याला धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही,” असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं.
याप्रकरणी पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.