नाशिक,दि,११ एप्रिल २०२४ –नाशिक ही सांस्कृतिक भूमी म्हणून संपूर्ण भारतात परिचित आहे. या भूमीला धार्मिक, ऐतिहासिक, साहित्यिक असा वैविध्यपूर्ण वारसा लाभला असून तोच पुढे नेण्याच्या हेतूने ‘दक्षिणगंगा संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘शब्दमल्हार’चे संपादक स्वानंद बेदरकर आणि ‘म्युझोमिंट’चे संचालक समृद्ध वावीकर यांनी दिली.
महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असून नाशिकचे ओळख ठरेल हा महोत्सव करण्याचे करण्यासाठी तयारी सुरू असून शनिवार दि. २७ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. युवा कलावंत प्रतीक श्रीवास्तव यांच्या सरोद वादनाने महोत्सवाला प्रारंभ होणार असून त्यांना कल्याण पांडे (तबला) साथ करणार आहेत. त्यानंतर जयपूर- अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आणि लखनऊच्या भातखंडे विद्यापीठाच्या कुलगुरू विदुषी डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन होईल. त्यांना नितीन वारे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांची साथ लाभणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. २८ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता किराणा घालण्याचे ज्येष्ठ गायक आणि भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन होईल. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांची साथ लाभेल.
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दोन्ही भारतीय संगीत विश्वातील श्रेष्ठ कलावंत असून खूप वर्षांनी त्यांचे गाणे नाशिकमध्ये होत आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कौस्तुभ जोशी, समीर बेदरकर, प्रशांत वाखारे प्रयत्न करीत आहेत. तरी रसिकांनी संगीत महोत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा; असे आवाहन ‘शब्दमल्हार’ आणि ‘म्युझोमिंट’ च्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम सशुल्क असून अधिक माहितीसाठी ९९७५०९५३६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.