दत्ता पाटील व डॉ.पराग घोंगे यांना सर्वोत्कृष्ट संहितेचा पुरस्कार 

0

मुंबई ,दि,३० सप्टेंबर २०२४ –महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट संहितालेखनाचा प्रथम पुरस्कार “अंधार उजळण्यासाठी” या नाटकासाठी डॉ. पराग घोंगे यांना व ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संहितालेखनाचा प्रथम पुरस्कार नाशिकचे दत्ता पाटील यांना “कृष्णविवर” या संहितेसाठी जाहीर झाला आहे.

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत संहितालेखनाचा द्वितीय पुरस्कार “अखेर ती वेळ आली आहे” या नाटकासाठी जयप्रकाश कुलकर्णी यांना व  तृतीय पारितोषिक “एकरात्र पावसाळी” या नाटकासाठी स्वानंद देशपांडे यांना जाहीर झाले.

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत संहितालेखनाचा द्वितीय पुरस्कार “पुरुष गाळणाऱ्या बायकांचा गाव” या नाटकासाठी श्याम पेठकर यांना व  तृतीय पुरस्कार “गम्मत असते नात्याची”  या नाटकासाठी रविशंकर झिंगरे यांना जाहीर झाले आहे.

६२ व्या राज्य नाटय स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (शिवाजी पार्क,दादर) येथे होणार आहे.

काय आहे कृष्णविवर?
“कृष्णविवर” हे वेगळ्या विषयावरील हे दोन पात्री नाटक एकाच वेळी समकालातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक व्यवस्थेवर भाष्य करताना दुसऱ्या बाजूला स्त्रीपुरूष नातेसंबंधातील गुंतागुंतही मांडत जातं. समकालातील मध्यमवयीन पत्रकार आणि मध्यमवयीन अभिनेत्रीच्या अनवट भेटीतून हे नाटक प्रभावीपणे पुढे जात राहतं. अस्वस्थ करतानाच तर्कसंगत मांडणीतून समकालाची विलक्षण चिकित्सा करत राहतं.

वेगळ्या विषयाचा सन्मान -पाटील
पुरस्काराबद्दल सन्माननीय परीक्षकांना धन्यवाद देतो. या संहितेला राज्य शासनाच्या नाट्यस्पर्धेंतर्गत लेखनाचा पुरस्कार मिळाल्याचे श्रेय प्रयोगशील दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव आणि त्याच्या टीमला देतो. कारण कृष्णविवर हे नाटक रंगमंचावर साकारणं हो मोठं आव्हान होतं. समकालिन सामाजिक भाष्य आणि संवेदनशीलतेतून एका अनोख्या नात्याचे पदर उलगडताना स्त्रीपुरूष संबंधाचा एक वेगळा पैलू मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. 
– दत्ता पाटील (लेखक “कृष्णविवर”)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.