कराची –अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठी बातमी समोर आली आहे.मुंबई १९९३ मध्ये झालेल्या सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकारांनी केला आहे. पत्रकाराने आपल्या यू ट्यूब चॅनल वर दावा केला विषप्रयोगाच्या बातम्यामुळे दाऊद पाकिस्तानामध्येच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत बिघडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, यासंदर्भात भारत आणि पाकिस्तानात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नसून विष कोणी दिले याचीही माहिती मिळू शकली नाही. कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन शहरांमधे इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याची देखील माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार दाऊदला कडेकोट सुरक्षेत रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. दाऊदवर रुग्णालयाच्या एका खास वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबीयांनाच येथे येण्याची परवानगी आहे. मुंबई पोलीस अंडरवर्ल्ड डॉनच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा दाऊद मास्टरमाईंड आहे.मुंबईत या स्फोटांच्या मालिकेत तब्बल २५०हून अधिक नागरिकांना मृत्यू झाला होता. या घटनेत हजारो लोक जखमीही झाले होते. या घटनेनंतर त्याला भारताचा वाँटेड दहशतवादी घोषित करण्यात आले.