उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौर्यावर रवाना
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, तैलचित्राचे अनावरण
मुंबई, १३ सप्टेंबर२०२२- स्वातंत्र्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या आणि अन्याय व पराधीनतेविरूध्द संघर्ष सिध्द झालेल्या जागतिक समुदायाची स्पंदने टिपणाऱ्या व त्यातून ‘लेनिनग्राडचा पोवाडा’ या सारखी प्रतिभासंपन्न काव्य निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे येत्या १४ सप्टेंबर ला मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात समारंभपूर्वक अनावरण होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच तैलचित्राचे अनावरण अशा दोन कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर हे काल रात्री रशिया दौर्यावर रवाना झाले.भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे हे सुद्धा या दौर्यात सहभागी आहेत.
या दौर्यात आज, दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवेंद्र फडणवीस हे रशियातील भारतीय समुदायासोबत एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधतील. दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर, मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे ते लोकार्पण करतील, तर त्याचदिवशी सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दुतावासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करतील. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद लोमोनोसोव्ह मॉस्को युनिव्हर्सिटी, द इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडिज ऑफ द रशियन अॅकडमी ऑफ सायन्स, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, पुश्किन रशियन लँगवेज इन्स्टिट्युट, सेंट पिटसबर्ग युनिव्हर्सिटी अशा अनेक संस्था या आयोजनात सहभागी आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत-रशिया संबंधांची ७५ वर्षे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव, असे सर्व योग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबत सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौर्यात भेटीगाठी होणार आहेत.
अण्णा भाऊंच्या लेखणीने भाषेच्या आणि देशाच्या सीमासुद्धा ओलांडलेल्या आहेत. युद्धांच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध आपण ज्याला स्टालिनग्राडचा लढा म्हणतो, ही दुसर्या महायुद्धातील सर्वात मोठी लढाई होती. आपण तिला युद्धाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणू शकतो, अशी ती लढाई होती. याच घटनेवर आधारित स्टालिनग्राडचा पोवाडा नावाचे एक दीर्घ काव्य साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी रचलेले आहे. या युद्धाला त्यांनी मानवतेच्या मुक्तीचे युद्ध असे नाव दिले आहे, रशिया या राष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यावर लिहिलेले, त्यातील सर्वसामान्य लोकांचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग यावर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच अण्णा भाऊंची रशियातील लोकप्रियता वाढली होती.
यापूर्वी लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते.आता अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियात होत असल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा गौरवाचा विषय आहे आणि त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.